विभाग नववा : ई-अंशुमान
एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट (१७७९-१८५९) पेशवाई अखेरचा पुण्याचा रेसिडेंट. हा स्कॉटलंडचा रहिवासी असून तेथील एका सरदाराचा सर्वांत धाकटा मुलगा होता. जेव्हां सोळाव्या वर्षी बंगालमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या खात्यांत लेखक म्हणून त्याला नेमण्यांत आलें तेव्हां त्याचें फारसें शिक्षण झालें नव्हतें. त्याचा चुलता त्यावेळीं ईस्ट इंडिया कंपनीचा एक डायरेक्टर असल्यामुळें त्याच्या वशिल्यानें एल्फिन्स्टनला ही जागा मिळाली एल्फिन्स्टनच्या आईनें तेव्हां हिंदुस्थानचा गव्हर्नरजनरल असलेला लॉर्ड मॉनिंगटन याच्याजवळ आपल्या मुलाविषयीं रदबदली करण्याकरितां डंडासचें मन वळविलें. तेव्हां साहजीकच डंडासच्या शिफारसीवरून मॉनिंगटननें एल्फिन्स्टनकडे आपलें लक्ष पोंचविलें, आणि त्याला १८०१ मध्यें पुण्यास कर्नल क्लोज या रोसेडेंटचा एक मदतनीस म्हणून मुत्सद्दीपणाच्या कामावर नेमलें. इंग्रजांच्या मराठ्यांशीं झालेल्या (आसईच्या) युद्धांत एल्फिन्स्टन हा सर आर्थर वेलस्लीच्या मदतनीस माणसांतील एक होता. त्या जागेवर असतांनाच वेलस्लीच्या शिक्षणाप्रमाणें त्यानें आयर्न ड्यूकपासून हिंदुस्थानच्या इतिहासांत मुत्सद्देगिरी व राजकारण या नांवाखालीं मोडली जाणारी कुटिल संपादन केली.
युद्धानंतर एल्फिन्स्टनची नागपूर येथें रेसिडंट म्हणून नेमणूक झाली. तेथें तो चार वर्षांहून अधिक दिवस होता. हिंदी संस्थानिकांच्या दरबारीं रेसिडंट नेमण्याचा ईस्ट इंडिया कंपनीचा हेतु, गुप्त कट व अंत:कलह बळावून तीं संस्थानें शेवटीं स्वत:च्या घशांत टाकण्याला मार्ग करून देण्याचा असे. नागपूर येथें एल्फिन्स्टनची कामगिरी म्हणजे असा कट चालू ठेवणें व हेराचा धंदा करणें हीच असे. त्याचा धनी सर आर्थर वेलस्ली त्याला पत्रांत असें लिहितो कीं, “बातमी मिळविण्याकरितां तुम्हाला जें योग्य वाटेल तें कांहींहि तुम्ही करा जर तुम्हांस असें वाटत असेल कीं जयकिसनराम तुमच्याकरितां तें काम करील किंवा तुम्हास बातमी देईल तर गव्हर्नरजनरलजवळ तुझी शिफारस करीन असें त्याला वचन द्या आणि याविषयीं त्यांनां कळवा.”
ही शिफारस म्हणजे काय हें सर आर्थर वेलस्लीनें एल्फिन्स्टनला दुसर्या लिहिलेल्या पत्रांत सांगितलें आहे. “रामचंद्र निघून जाण्यापूर्वी त्यानें आपण चाकरी करण्याला तयार आहों असें सांगितलें. त्याच्याविषयीं तुमच्याजवळ मी शिफारस केली. तो हुषार मनुष्य दिसतो व राजानें त्याला अतिशय महत्त्वाच्या दळणवळणाच्या कामगिरीवर नेमलेलें आहे. सालाला सहा हजार रूपये पेनशन देण्याबद्दल गव्हर्नरजनरलजवळ मी त्याची शिफारस केली आहे. मला वाटतें कीं तो तुम्हांस उपयुक्त बातम्या पुरवीत जाईल.”
हा कटाचा मार्ग अनुसरल्यापासून राजकारणांत एल्फिन्स्टन पुरा वाकबगार बनला. आणि त्याच्या नीतिधर्माचा र्हास झाला. हें तो एके ठिकाणी स्वत:च कबूल करतो:- तो उतारा असा:-
“नागपूरला आल्यापासून मी फारच निष्ठुर व कठोर हृदयी झालों आहें. माझ्या मतें याचें कारण कांहीं अंशी माझें काम होय. तें मला सुसंस्कृत विचार मनांतून पार घालवून देण्यास भाग पाडतें” तथापि नागपूरला असतांनाच लेखनवाचन यांकडे त्याचें मन जाऊन तो आमरण विद्याव्यासंगी राहीला.
१८०८ मध्यें त्याला अफगाणिस्तानांत पाठविलें पण लॉर्ड मिंटोच्या कारकीर्दीतील त्याची मुत्सद्देगिरी या वकिली कामगिरींत पूर्ण अयशस्वी झाली. अफगाणिस्तानच्या जागरूक असलेल्या बादशहास त्याला फसविता आलें नाहीं (कोलब्रूकनें लिहिलेलें चरित्र, पु १. पा. २१८). या सफरीची आठवण म्हणून त्यानें काबूलसंबंधीं पुढें एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. इतर ब्रिटिश लोकांप्रमाणें आपलें नांव कमविण्याची व हिंदुस्थानांत असलेल्या आपल्या सहकार्यांनां आणि सहधर्मींयांनां मदत करण्याची त्याला महत्त्वाकांक्षा होती. अफगाणिस्तानांत असतांनाच त्यानें गव्हर्नरजनरलला अमिरापासून सिंध हस्तगत करण्याविषयीं लिहिलें होतें (कित्ता, पा. २१८-२०).
त्यावेळीं लॉर्ड भिंटो गव्हर्नर जनरल होता. त्यानें एल्फिन्स्टनची सूचना स्वत:ला पसंत नसल्यानें मान्य केली नाहीं. पण आतां पुण्याचा रेसिडेंट म्हणून त्यास दुसर्या धन्याच्या हाताखालीं वागावयाचें होतें. माक्विस हेसटिंग्ज हा महत्त्वाकांक्षी व बेदिक्कत मनुष्य होता. त्याचें धोरण म्हणजे कपटानें व बळजबरीनें हिंदुस्थानचा जेवढा म्हणून भाग आपल्या हातांत घेतां येईल तेवढा घ्यावयाचा. तेव्हां आपलें धोरण चालू ठेवण्याच्या कामीं एल्फिन्स्टन हा त्याला चांगला मदतगार मिळाला होता. एल्फिन्स्टन हाहि किती बेदिक्कत होता हें त्याच्या एका १८११-१२ मध्यें लिहिलेल्या पत्रावरून दिसतें.
पेशव्यांशीं प्रत्यक्ष संबंध न ठेवतां पेशवे आणि त्यांचा दरबार यांच्याशीं व्यवहार करण्याकरितां सर बॅरी क्लोजनें एक खुश्रु शेटजी जमशेटजी मोदी नांवाचा पार्शीं वकील नेमला होता. हा न्यायी व मोठ्या हुद्याचा असल्यानें त्याची नेमणूक सर्वांनां पसंत होती. पण १८११ मध्यें एल्फिन्स्टन पुण्यास रेसीडेंट म्हणून आला तेव्हां आतांपर्यंत पेशवे आणि ब्रिटिश यांच्यामध्यें कांहीं वांकडें न येतां सुरळीतपणें चाललेली क्लोजनें केलेली व्यवस्था त्यानें मोडून टाकली. (‘खुश्रु शेटजी मोदी’ पहा.)
पेशव्यांचा अंत पाहण्याची व त्यांची मैत्री झुगारून देण्याची एल्फिन्स्टननें अतोनात खटपट केली. कोलब्रूकनें दिलेल्या एल्फिन्स्टनच्या डायरींतील एका उतार्यावरून असें दिसतें कीं, पेशव्यांशीं आणि त्यांच्या कारभार्यांशीं बोलतांना एल्फिन्स्टन राग दाखवीत असे व गुरकावणीचा आवाज काढीत असे. पेशव्यांनीं निजाम आणि गायकवाड यांच्याकडे आपलें असलेलें देणें घेणें मिटवून टाकण्यासाठीं रेसिडेंटकडे एकसारखी मागणी केली होती. या गोष्टीचा निकाल लावण्यांत एल्फिन्स्टननें आपली नेहमीची तत्परता दाखविली नाहीं. या बडोदें प्रकरणांत गंगाधरशास्त्र्याची वकिली पेशव्यांनां मान्य नव्हती. पण एल्फिन्स्टननें ती त्यांवर मुद्दाम लादली. पुढें बाजीरावानें शास्त्र्याला आपल्याकडे ओढून घेण्याकरितां दिवाणगिरी देऊं केली. पण एल्फिन्स्टनच्या सल्ल्यावरून त्यानें ती नाकारली. एल्फिन्स्टननें जर शास्त्र्याच्या जीविताची हसी घेतली होती तर त्याच्याबरोबर पंढरपूरला संरक्षक सैन्य धाडावयास पाहिजे होते. तसें कांहीं न करतां शास्त्र्याला पेशव्यांबरोबर एकटे सोडून आपण वेरूळचीं लेणीं पहावयास गेला. शास्त्र्याच्या खुनानंतर कांहीं गुप्त चौकशी करून त्यानें असें ठरविलें कीं, त्रिंबकजी डेंगळे यानें हा खून केला. व लगेच पेशव्यांनां तंबी देऊन त्रिंबकजीला पकडलें. पेशव्यांशीं आकस धरून एल्फिन्स्टननें त्याचे खुश्रु शेटजी व त्रिंबकजी हे दोन चांगले कारभारी धुळीला मिळविले. पेशव्यांशीं वागतांना एल्फिस्टन फार निष्ठुर व स्वार्थी असे. १८१७ चा पुण्याचा तह व पेशवाईचा अंत या गोष्टींत एल्फिस्टनचें प्रमुख अंग असून त्याचें सविस्तर विवेचन मराठ्यांच्या इतिहासांत येईलच. बाळाजीपंत नातू व यशवंतराव घोरपडे हे त्याचे हस्तक होते. पेशवाई गेल्यावर याला त्या प्रांताचा कमिशनर नेमलें. पुढें १८१९-१८२७ पर्यंत हा मुंबई प्रांताचा ले. गव्हर्नर होता. यानें शिक्षणविषयक बरीच खटपट केली. तिचें स्मारक म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेज होय. यानें अफगाणिस्तानचा व हिंदुस्थानचा असे दोन इतिहास लिहिले आहेत. हा १८५९ नोव्हेंबर २० ला मेला. हा जसा मुस्तद्दी होता तसा थोडाफार शिपाईहि होता.
एल्फिन्स्टन इतका महत्त्वाकांक्षी होता कीं, मराठ्यांशीं झालेल्या तिसर्या युद्धानंतर हिंदुस्थानांत त्याच्या महत्त्वाकांक्षेला वाव नव्हती म्हणून पुढें त्याला दोन वेळ देऊं केलेली गव्हर्नरजनरलची जागा त्यानें पत्करली नाहीं. (त्याची रोजनिशीं ता. १ सप्टेंबर १८३४).
[सं द र्भ ग्रं थ.- कॉटन- मौंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन; कोलब्रूक-लाईफ ऑफ मौंट स्टुअर्ट एल्फि. फॉरेस्ट-ऑफिशीअल राइटिंग्ज ऑफ मौंट स्टु. एल्फि.].