विभाग नववा : ई-अंशुमान
एल्बा - इटलीच्या पश्चिमेकडील एक बेट. लो. सं. (१९०१) २५०४३ (पिआनोसा धरून) व क्षे. फ. १४० चौ. मै. आहे. एल्बाचें सुप्रसिद्ध लोखंड तृतीयावस्थाक युगांतील आहे; तेथील ग्रॅनाईट रोमन लोक काढून नेत. पोर्टोफेराइमो हें एल्बाचें राजधानीचें ठिकाण असून प्राचीन काळापासून उत्तम बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. बंदराच्या वरच्या बाजूस पहिल्या नेपोलियनचा राजवाडा व तेथून नैर्ऋत्येस चार मैलांवर त्याची वाडी आहे. यांखेरीज दुसरी कांहीं इतिहासप्रसिद्ध गांवें या बेटावर आहेत.
प्राचीन काळापासून धातूंच्या खाणीसंबंधीं एल्बाचें नांव ऐकूं येतें. १८०२ मध्यें एमीन्सच्या तहान्वयें हे बेट फ्रान्सकडे आलें. पदच्युतीनंतर नेपोलियनला हें बेट व येथला सर्व राज्याधिकार देण्यांत आला. तो या ठिकाणीं ५ मे १८१४ पासून २६ फेब्रुवारी १८१५ पर्यंत राहिला. १८६० त हें पुन्हां इटलीकडे आलें. [सर आर्. कोल्ट होरे ए टूर थ्रू दि आयलंड एल्बा (लंडन १८१४)]