विभाग नववा : ई-अंशुमान
एल्युसिस - हें अथेन्सजवळ एक ठिकाण आहे. ग्रीक पंचांगांत बोइड्रोमिऑन नांवाचा एक महिना आहे (बोइड्रोमिऑन व हिंदूंच्या पंचांगांतील भाद्रपद यांतलें साम्य लक्षांत घेण्यासारखें आहे). या महिन्याच्या १३ व्या दिवशीं अथेन्सहून लोक एल्युसिस येथें जात आणि परत येतांना एक देवीची मूर्ती आणीत असत. १६ व्या दिवशीं अथेन्स येथें मोठी जत्रा भरत असे आणि एक धार्मिक व्याख्यान होत असे. या व्याख्यानांत वक्ता “गूढ गोष्टी” सांगत असे. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी व्याख्याता तुम्ही सर्व मनानें शुद्ध व पवित्र आहांत काय ? असें विचारीत असे; आणि एखादा अपवित्र मनुष्य आढळल्यास त्यास घालवून देत असत.
व्याख्यानानंतर सर्वजण समुद्रकिनार्यावर जात; आणि स्नान करून अंगावर डुकराचें रक्त शिंपडून घेत असत. नंतर १९ व्या दिवशीं अथेन्सपासून एल्युसिसपर्यंत एक मिरवणूक निघे. एल्यूसिस येथें गेल्यानंतर तेथें एक पौराणिक नाटक होत असे. ‘डिमीटर (पृथ्वी) इजला कोरी (कणीस) या नांवाची मुलगी होती. तिचे प्लुटो (अधोलोकाधिपति) यानें हरण केलें’ हें या नाटकाचें संविधानक होय.
नाटकानंतर एक धर्माध्यक्ष सर्वांस एक तुटकें कणीस दाखवून मानवजीविताचा क्षणभंगुरपणा आणि आत्म्याचें पुनरूत्कमण व्यक्त करीत असे. यानंतर सर्वजण एके ठिकाणीं जमून आकाशाकडे पाहून “वृष्टि” आणि धरणीकडे पाहून “धारण कर” असें ओरडत. ही चाल ख्रि. पू. १००० वर्षांच्या सुमारास होती.