विभाग नववा : ई-अंशुमान
एसर हजन : - (असुर अरबी इद्दिना ‘असुरानें भाऊ दिलेला आहे”), एक असुरराजा आपला बाप सेन्नाचेरिब याचा खून झाला तेव्हां (इ. स. पू. ६८१) अराराटशीं झगडत असलेल्या असुरी सैन्याचा एसर-हडन अधिपति होता. असुर देशच्या योद्ध्यांनीं कटवाल्यांचा पराभव करून एसरला गादीवर बसविलें. तो जसा योद्धा तसा हुषार, मनमिळाऊ व राज्यकर्ताहि होता गादीवर आल्यानंतर यानें प्रथम दक्षिण बाबिलोनमधील खाल्डियनांचें बंड मोडून बाबिलोन शहर पुन्हां भरभराटीस आणिलें, व ती आपली राजधानी केली. पुढें एक दोन वर्षांतच मीडिया मांडलिक बनवून त्यानें आपला मोर्चा पॅलेस्टाईनकडे वळविला. तोहि प्रदेश पादाक्रांत करून असुर देशाच्या सरद्दहीवरच्या किमेरी लोकांवर तो चाल करून गेला. साम्राज्याची दक्षिण सरहद्द ताब्यांत ठेवणें जरूर असल्यानें तो अरबस्तानांत शिरला व अरबी लोकांनां त्यानें मोठी दहशत घातली. आतां तो असुरी साम्राज्याचा जो एकच शत्रु उरला त्यावर चाल करून जाण्यास मोकळा झाला. हा जुना शत्रु म्हणजे ईजिप्त होय. ख्रि. पू. ६७३ व ६७० या दोन सालीं एसरनें ईजिप्तवर मोहिमा केल्या व ईजिप्तचे तुकडे तुकडे केले. ख्रि पू. ६६८ मध्यें जेव्हां ईजिप्तनें वर डोकें काढिलें. तेव्हां त्याला दडपण्यासाठीं एसर निघाला असतां वाटेंतच आजारी पडून मरण पावला. असुर-बनिपाल (पहा) व समास-शुम-युकिन या त्याच्या दोन मुलांत त्याचें राज्य वांटण्यांत आलें. एसरनें स्वत:करितां निनेव्ही येथें एक व असुरबनिपाल याच्या करितां केंला येथें एक असे दोन राजवाडे बांधिले. [बज्-हिस्टरी ऑफ एसर हडन (१८८०); मॅस्पेरो-पासिंग ऑफ दि एंपायर्स.]