विभाग नववा : ई-अंशुमान
एसेक्स परगणा - इंग्लंड. पूर्वेकडील एक परगणा. क्षेत्रफळ १५४२ चौ. मै. लो. सं. (भौगोलिक मर्यादेतली) १४६८३४१. या परगण्यांत आठ पार्लमेंट-विभाग आहेत. व प्रत्येक विभागाकडून एकेक पार्लमेंटचा सभासद निवडला जातो. हा परगणा शेतकीच्या दृष्टीनें महत्त्वाचा आहे. एकंदर क्षेत्रफळाचा ४/५ भाग लागवडींत आहे. गंहू, बार्ली, आणि ओट हीं येथील मुख्य धान्यें होत. एसेक्सचा नैर्ऋत्यभाग लंडनच्या बाजूला असल्यानें त्या भागांत निरनिराळे उद्योगधंदे चालतात. रासायनिक व यांत्रिक कारखाने तसेंच रेशीम, दारू, सीमेंट, चुना हीं तयार करण्याचे मोठाले कारखानेहि या परगण्यांत आहेत. येथील लोकरीचा धंदा सॅक्सन काळापासूनचा आहे. ग्रेट ईस्टर्न रेल्वेच्या फांट्यामुळें जिकडे तिकडे दळणवळणाचे मार्ग मोकळे आहेत. जलमार्गहि पुष्कळ आहेत.
एथेलस्टनच्या वेळीं हा परगणा अस्तित्वांत आला असावा. एलिझाबेथच्या वेळेपर्यंत एसेक्स व हर्टफोर्डशायर हे दोन परगणे एकाच मेयरच्या ताब्यांत असत. राजधानीच्या जवळचा प्रदेश म्हणून अनेक राजकीय उलाढालींत एसेक्सला पडावें लागलें. इंग्लंडांत अढळणार्या चार वाटोळ्या देवळांपैकीं एसेक्समध्यें (लिटल मॅपस्टेड येथें) एक आहे. कांहीं देवळांतून सॅक्सन व नॉर्मन बांथकाम दिसतें.