विभाग नववा : ई-अंशुमान
एस्किमो - उत्तर अमेरिकेंतील इंडियन लोकवस्ती. ग्रीनलंडपासून अलास्कापर्यंतचा अमेरिकेचा आर्क्टिक किनारा व आशियामधील बेरिंग स्ट्रेटचा कांहीं भाग, डेव्हिस स्ट्रेट आणि बॅफिन बे यांच्या देन्ही बाजूंनां केवळ एस्किमोचीच बस्ती आहे. एल्युशियन लोक भाषा आणि संवयी या बाबतींत एस्किमोसारखेच आहेत. एस्किमो फार उंच नसून त्यांची उंची ५ फूट ४ इंच ते ५ फूट १० इंच यांच्या दरम्यान बहुतेक असते. स्त्री पुरूष दोघेंहि चांगलीं मांसल व चपळ असतात. देघांचेहि चेहेरे आनंदी, आल्हाददायक व कधीं कधीं सुंदर असतात. तोंडाची ठेवण चपटी व उभंट असून गाल फुगीर असतात. कपाळ उंच नसतें; नाक चपटें, डोळे तिरकस, बारीक, काळेभोर व पाणीदार असतात. डोकें मोठें असून त्यावर काळे पण राकट केंस असतात. डोक्याची कवटी रंदीपेक्षां उंच जास्त असते. पुरूषांनां बारीक मिशा असतात, पण कल्ले किंवा दाढी नसते. हातपाय बारीक व नीटस असतात. एस्किमोचा सर्व पोषाख सील, रेनडियर (सांबर), अस्वल, कुत्रा किंवा कोल्हा यांच्या कातड्याचा असतो. बायका पुरूषांच्या सारखाच पोषाख करितात बायकाहि विजार घालतात. थंडीमध्यें दोन कपडे वापरतात. एक आंतून केंस असलेला व दुसरा बाहेरून केंस असलेला. कधीं कधीं ते पक्षांच्या कातड्याचा सदरा व कुत्र्याच्या किंवा सांबराच्या कातड्याचे पायमोजे वापरतात. कपडे शिवण्याला पुष्कळदा हाडाची सुई व स्नायूंचा दोरा घेतात. हे लोक कधींच स्नान करीत नाहींत. आया आपल्या मुलांनां कधीं कधीं चाटून स्वच्छ करितात.
उन्हाळ्यांत एस्किमो शेक्वाकृति कातडी तंबूंत राहातात. हिंवाळ्यांत अर्धवट जमिनींत गाडलेल्या व दगड, माती, गवत आणि हाडें यांनीं बांधलेल्या झोपडींत राहातात. यां झोपड्यांनां रस्ता बोगद्यासारखा असून त्यांतून रांगत जावें लागतें. उपजीविकेसाठीं हे लोक शिकार करितात व मासे मारतात. त्यांच्या प्रदेशांत लागवड करणें शक्य नसतें. सील, रेनडियर आणि देवमासे हें त्यांचें मुख्य भक्ष्य होय. त्यांच्या होड्याहि सीलच्या कातड्याच्या व देवमाशाच्या हाडांच्या केलेल्या असतात. बर्फावरून जाणार्या गाड्यांनां चार ते आठपर्यंत कुत्रीं जोडलेलीं असतात. त्यांचीं शस्त्रस्त्रेंहि पशुपक्षांच्या शरीराचीं पण फार कुशलतेनें व थोड्याशा साधनांत तयार केलेलीं असतात. एस्किमो फार खादाड असतात. दोघेजण एका बैठकींत सबंध सीलचा फडशा पाडतात. एका दिवसांत इतर खाण्याखेरीज सुमारें १० पौंड मांस एकटा मनुष्य खातो. पुरूष उताणा पडून त्याची बायको त्याला मांसाचें जेवण भरविते; व तें इतकें कीं शेवटीं त्याला हालवत सुद्धां नाहीं. असे प्रकार नेहेमीं पाहावयास सांपडतात.
एस्किमो हे भ्रमणवृत्तीचे आहेत असें म्हणतां येणार नाहीं. शिकारीकरितां मात्र ते नेहमीं फिरत असतात. ते मालमत्ता करण्याच्या भानगडींत पडत नाहींत. जरूर तें सामान व भांडीं आणि एक सालची खाण्याची बेगमी हीच कायती मालमत्ता त्यांच्याजवळ असते. ज्यांच्याजवळ अन्नसामुग्री असेल त्यांनीं ती ज्याच्याजवळ नसेल त्यांच्या समवेत उपभोगिली पाहिजे या जुन्या चालीमुळें एस्किमो समाज दरिद्रीच राहिला आहे. त्यांचीं शस्त्रास्त्रें व लौकिककथा यांच्या वरून एस्किमो बुद्धिमान आहेत हें लक्षांत येते. त्यांना गाण्याची व चित्रकलेची आवड असून परकीयांतील चमत्कारिक गोष्टी उचलण्याची हातोटीहि त्यांच्या आंगीं आहे. करार करणें किंवा देवघेवींत घासाघीस करणें त्यांनां आवडत नाहीं. समाजिक अनीतीचे प्रकार त्यांच्यात कमी आहेत; तथापि त्यांचा खाजगी आयुष्यक्रम उच्च नीतिमत्तेचा दर्शक असेंहि म्हणतां यावयाचें नाहीं. त्यांच्या बायकांचें नेहेमीं वांकडे पाऊल पडत असतें; तरी सुद्धां त्यांनां अपमान किंवा मत्सर वाटत नाहीं. यूरोपियन लोकांशीं व्यवहार करतांना इतर रानटी जातींप्रमाणें एस्किमोहि खोटें बोलतात अशी यूरोपियन लोक तक्रार करीत असतात. एस्किमो वाङ्मय फारसें नाहीं. त्यांच्यांतील पुराणकथा मात्र फार असून त्यांचा संग्रह डॉक्टर रिंकसारख्या यूरोपियनांनीं केला आहे. डेन्मार्कमध्यें एस्किमो भाषेंतले ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. एस्किमो भाषा यूरोपियन भाषांपेक्षां उच्चारांत व घटनेंत अगदीं निराळी आहे. एखाद्या यूरोपियन भाषेंतले एक संबंध वाक्य एस्किमो भाषेंत केवळ एका शब्दानें दर्शविलें जातें.
एस्किमोचा मूळचा वन्यधर्म असून चांगल्यावाईट देवतांवर व स्वर्गनरकावर त्यांचा विश्वास आहे. मनुष्यजात आणि अमानुष शक्ति यांमधील अंतर चेटक्यांनां नाहींसें करितां येते, असा त्यांचा समज आहे. त्यांच्या नेहमीच्या व्यवहारांत उपयोगी पडणारा देवमासा त्यांचें उपास्यदैवत बनलें असल्यास नवल नाहीं. हल्लीं ग्रीनलंड व लाब्राडोर या भागांतील बहुतेक सर्व एस्किमो नांवाला का होईना, ख्रिस्ती आहेत.
एस्किमोचा राजकीय किंवा लष्करी पुढारी कोणी नाहीं. त्यांचा राज्यकारभार कौटुंबिक पद्धतीवर चालतो, गांवागांवांमध्यें राजकीय किंवा सामाजिक असें कांहीं बंधन नाहीं; तरी त्यांच्यामध्यें सलोखा असतो. एस्किमो हे शांतताप्रिय व पड खाणारे लोक असल्यामुळें त्यांच्यात लढाया फारशा होत नाहींत, तथापि ते शूर नाहींत असें नाहीं. त्यांच्यात बहुपत्नीत्वाची चाल दिसत नाहीं पण घटस्फोट व पुनर्विवाह यांनां मुळींच आडकाठीं नाहीं. मिळकतीवरील ताबा आणि पारधीचे हक्क यासंबंधीं त्याचे नियम फार गुंतागुंतीचे वाटतात. एकमेकांनां भेटल्यावेळीं नाकावर नाक घासण्याची जुनी चाल ग्रीनलंडमध्यें बहुतेक बंद पडली आहे. आशियाच्या किनार्यावर जे थोडेफार एस्किमो आहेत तें वगळल्यास त्यांची एकंदर संख्या सुमारें २९,००० भरेल [डॉ. रिंक-टेल्स अँड ट्रॅडिशन्स ऑफ दि एस्किमो; डॅनिश ग्रीनलंड; एस्किमो ट्राईब्स. फ्रिडजोफ नॅन्सेन-एक्सिमो लाईफ.]