विभाग नववा : ई-अंशुमान
ऐतरेय आरण्यक - हें ऋग्वेदाचें आरण्यक आहे. याचे पांच भाग असून अठरा अध्याय आहेत. वरील पांच भांगांपैकीं प्रत्येकासहि आरण्यक हेंच स्वतंत्र नांव आहे. ऐतरेय आरण्यक हा ऐतरेय ब्राह्मणापैकींच अवशेष भाग असावा. कारण यांत आरण्यक विचारापेक्षां यज्ञविषयक विवेचन जास्त आहे. हौत्र कर्मापैकीं ब्राह्मणांत व आश्वलायन श्रौतसूत्रांत न आलेल्या अशा महाव्रतनामक श्रौतविधीच्या हौत्रासंबंधीं या ग्रंथांत पहिल्या, चौथ्या व पांचव्या आरण्यकांत विवेचन आलें आहे. दुसरें आरण्यक आध्यात्मिक विचाराचें असून पहिल्या तीन अध्यायांत पुरूष या नांवानें विश्वात्म्याचा विचार केला आहे. त्यापुढील चार अध्यायांसच ऐतरेय उपनिषद् म्हणतात. तिसर्या अरण्यकांत ऋग्वेद संहिता, पदपाठ व क्रमपाठ या तीन पठनक्रमांच्या गूढ अर्थासंबंधीं व रूपकमय अर्थासंबंधीं आणि अक्षर, वर्ण, स्वर संधि यांच्यासंबंधीं रूपकात्मक विवेचन असून सृष्टींतील कांहीं चमत्कार प्रत्यक्ष अथवा स्वप्रांत पाहिल्यास त्यासंबंधीं शांत्यर्थ कांहीं विधी सांगितले आहेत. ऐतरेय आरण्यक हें त्याच्या नांवावरून ऐतरेय ऋषीनेंच रचलें असावें असें वाटतें परंतु यांत महिदास ऐतरेयाचा उल्लेख (२. १,८) आल्यावरून शंका येते.