विभाग नववा : ई-अंशुमान

ऐतरेयब्राह्मण - ब्राह्मण ग्रंथासंबंधीं सामान्य विवेचन वेदविद्या या विभागांत सहाव्या प्रकरणांत केलेंच आहे. तेथें ऐतरेय ब्राह्मणासंबंधीहि कांहीं विवेचन आढळेल. ऐतरेय ब्राह्मण हा ऋग्वेदाचा ब्राह्मणग्रंथ आहे. या ब्राह्मणाला ऐतरेय ब्राह्मण हें नांव पडण्याचें कारण, सायणाचार्यांनी आपल्या उपोदघातांत यासंबंधीं जी आख्यायिका दिली आहे, तिजवरून असें दिसून येतें. ‘अत्यंत तपस्वी असे कोणी एक महर्षि होते. त्यांनां अनेक स्त्रिया होत्या. त्यांपैकीं एकीचें नांव इतरा असें होतें. या इतरेला महिदास नांवाचा एक बुद्धिमान पुत्र होता पण महिदासाच्या पित्याची महिदासावर त्याच्या सावत्र बंधूइतकी प्रीति नव्हती. एकदां महिदासाचा बाप आपल्या सर्व मुलांसमवेत एका यज्ञाला गेला होता. यज्ञ चालला असतां, सहज त्याला पुत्रवात्सल्याचा उमाळा येऊन त्यानें महिदासाखेरीज सर्व मुलांना आपल्या मांडीवर घेतलें. हा अपमान महिदासाला सहन न होऊन, तो त्या यज्ञांतून उठून रडत रडत आपल्या मातेकडे गेला व तिला त्यानें सर्व हकीकत सांगितली. तेव्हां आपल्या पुत्राचा कळवळा येऊन तिनें आपली कुलदेवता जी भूमाता तिचा धांवा केला. तो धांवा ऐकून भूमाता प्रगट झाली, व महिदासाला आपल्या हातीं धरून ती यज्ञसभेंत आली व त्याला एका उत्कृष्ट सिंहासनावर बसवून ‘हा महिदास सर्व कुमारामध्यें श्रेष्ठ आहे’ असें तिनें सर्वांनां सागितले. तसेच ‘ब्राह्मणसंज्ञक वेदवाङ्‌मयाचा तूं द्रष्टा होशील’ असा तिनें त्याला वर दिला. त्या वरप्रसादानें महिदासाच्या अंत:करणांत ‘अग्निवैं देवानामवम:’ येथपासून ‘स्तृणुतेस्तृणते’ येथपर्यंत चाळीस अध्यायांनीं घटित असा ब्राह्मणग्रंथ स्फूर्तिरूपानें प्रगट झाला.’ याप्रमाणें इतरानामक ऋषिपत्‍नीचा पुत्र ऐतरेय महिदास यानें प्रचलित केलेल्या ब्राह्मणग्रंथास ‘ऐतरेय ब्राह्मण’ असें नांव वैदिक संप्रदायांत रूढ झालें.

हल्लीं उपलब्ध असलेल्या ऐतरेय ब्राह्मणाचे चाळीस अध्याय असून पांच पांच अध्यांयांची मिळून एक अशा याच्या आठ पंचिका आहेत. यज्ञांत होता नामक ऋत्विजानें करावयाचें जें होत्रकर्म त्यासंबंधीं ऋग्वेदांतील ऋचा कोणत्या यागांत कोणत्या म्हणावयाच्या हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. या ब्राह्मणाचा प्रमुख भाग सोमयागविषयक आहे. त्याच्या पहिल्या १-१६ अध्यांयांत ‘अग्निष्टोम’ यज्ञाचा उहापोह केला आहे. या अग्निष्टोम नामक सोमयागाचे चार प्रकार वर्णिलेले आहेत. १७-१८ या अध्यायांत ३६० दिवस चालणार्‍या ‘गवामयन’ विधीचा विचार केला गेला आहे. १९-२४ या अध्यायांत ‘द्वादशाह’ म्हणजे बारा दिवस चालणार्‍या यागाचें विवरण आहे. व २४-३२ या अध्यायांत अग्निहोत्रविषयक चर्चा आलेली आहे. ३३-४४ या अध्यायांत राज्याभिषेकाचा विधि व राजपुरोहिताच्या पदवीचा उल्लेख आलेला आहे. अशारीतीनें सर्व कतूंचें वर्णन असून ठिकठिकाणीं कांहीं प्रासंगिक गोष्टीहि सांगण्यांत आलेल्या आहेत.

ऋग्वेदाचे दोन ब्राह्मणग्रंथ आहेत. ऐतरेय व कौषीतकी या कौषीतकी ब्राह्मणाला शांखायन ब्राह्मण असेंहि नांव आहे या ब्राह्मणाचे तीस अध्याय असून ऐतरेयाच्या पहिल्या २५ अध्यायांत जो प्रतिपाद्य विषय आहे तोच याचाहि विषय आहे. ऐतरेय व कौषीतकी ब्राह्मण यांचा सूक्ष्म तर्‍हेनें विचार केल्यास, असें आढळून येतें कीं ऐतरेय ब्राह्मण निदान त्या ब्राह्मणाचे पहिले पंचवीस अध्याय तरी कौषीतकीपूर्वीचे आहेत. कौषीतकीपूर्वीचे आहेत. कौषीतकी ब्राह्मणांत ज्याप्रमाणें हौत्रकर्माचें पद्धतशीर व सुस्पष्ट असें विवेचन केलेलें आढळतें तसें ऐतरेयांत आढळून येत नाहीं. ऐतरेय ब्राह्मणांत त्यांतील प्रतिपाद्यविषयाशीं साक्षात संबद्ध नसलेल्या अशा बर्‍याच कथा आहेत पण कौषीतकी ब्राह्मणांत तसा प्रकार फारसा दिसत नाहीं, तसेंच ऐतरेयांत, ऋत्विजांचे अंगीं मंत्रसिद्धीचें बळ असून, त्या मंत्रसिद्धीच्या जोरावर ऋत्विज हे यजमानाला अनेक प्रकारचे लाभ प्राप्त करून देऊं शकतात अगर प्रसंग पडल्यास यजमानाचें नुकसान करूं शकतात अशा प्रकारचे उल्लेख आढळतात. पण कौषीतकी ब्राह्मणांत यासंबंधाचा उल्लेख नाहीं. याचें कारण ऐतरेय ब्राह्मणकालीन नीतिकल्पनांमध्यें व तदनंतर झालेल्या कौषीतकी ब्राह्मणकालीन नीतिकल्पनांमध्यें बराच फरक पडला असावा हें होय असें कीथ म्हणतो. याशिवाय कौषीतकीमध्यें इतर ब्राह्मणग्रंथाचा ज्याप्रमाणें उल्लेख आढळतो तसा ऐतरेयांत आढळतो तसा ऐतरेयांत आढळून येत नाहीं. एका ठिकाणींच (७.११) पैंग्य व कोषीतकीचा उल्लेख ऐतरेयांत आढळतो, यावरून हा अध्याय मागाहून ऐतरेयांत अंतर्भूत झाला असावा असें कीथचें मत आहे.

ऐतरेय ब्राह्मणांत व कौषीतकी ब्राह्मणांत जरी बराच फरक दिसतो तरी पुष्कळ बाबतींत ऐतरेय व कौषीतकी यांच्यात साम्यहि पण दिसून येतें. दोहोंमध्यें प्रतिपाद्य विषय एकाच प्रकारचा आहे. फक्त त्या विषयाच्या निरनिराळ्या प्रमाणांत कमी अधिक जोर दिलेला आहे. म्हणजे हे दोन्ही ब्राह्मणग्रंथ एकाच वैदिक शाखेचे असून त्या त्या ब्राह्मणाच्या प्रणेत्यांनीं आपापल्या मताप्रमाणें हौत्रकर्माचें निरनिराळ्या पद्धतीनें विवेचन केले आहे.

अंतर्गत पुराव्यावरून पहातां ऐतरेय ब्राह्मणग्रंथ कौषीतकीच्या अगोदर रचिला गेला असें दिसून येतें. ऐतरेय ब्राह्मणांत रूद्रदेवतेला बरेंच महत्त्वाचें स्थान मिळालें आहे. कौषीतकी ब्राह्मणांत, त्याच्याहिपेक्षां अधिक महत्त्व रूद्रदेवतेला प्राप्त झालेलें दिसतें. या दोहोंतहि जन्मांतरासंबंधीं म्हणजे कर्मानुसार पुनर्जन्म प्राप्त होणें या कल्पनेचा अभाव दिसतो परंतु कौषीतकी ब्राह्मणांत पुनर्मृत्यूची कल्पना एका ठिकाणीं उल्लेखिलेली आढळते. यावरूनच पुढें पुनर्जमाची कल्पना निघाली असावी व या विचाराची वाढ ऐतरेयापेक्षां कौषीतकीकालां जास्त झालेली असावी.

ऐ त रे य ब्रा ह्म णा ची र च ना - सायणानें जी दंथकथा दिली आहे तीवरून पहातां ऐतरेय ब्राह्मणग्रंथ हा सगळा एकाच्याच हातचा आहे असें दिसतें. पण वास्तविक प्रकार तसा नसून या ग्रंथातील बराच भाग मूळचा नसावा असें दिसतें. सोमयाग हा या ब्राह्मणग्रंथाचा मुख्य विषय आहे. अर्थात त्या विषयाला धरून जो मजकूर असेल तोच मूळचा होय व बाकीचा असंबद्ध व अवांतर असा जो मजकूर असेल तो नंतर कोणी तरी त्यांत मागाहून घातला असावा असें म्हणण्यास हरकत नाहीं. वरील कसोटी ग्रंथाला लावून पाहिल्यास, या ग्रंथाच्या सातव्या व आठव्या पंचिका नंतरच्या दिसतात. या दोन्ही पंचिकांमध्यें राज्याभिषेकाच्या वेळचें वर्णन आलें आहे. त्यांत क्षत्रियानें कशा तर्‍हेनें व कोणत्या प्रकारानें राज्याभिषेक करून घ्यावा. सोमपानाच्या ऐवजीं दुसरें कोणतें पान सेवन करावें, याबंधींचें विवेचन आढळून येतें. प्रत्यक्ष सोमयागाशीं याचा कांहीं संबंध दिसून येत नाहीं. शिवाय हें राज्याभिषेकाचें वर्णन, तपथ ब्राह्मणांतील अश्वमेध यज्ञांतील वर्णनाशीं जुळतें आहे. कौषीतकी ब्राह्मणांत देखील सोमयाग हाच प्रतिपाद्य विषय असतां त्यामध्यें या राज्याभिषेकाचें वर्णन आलेलें नाहीं. यावरून या दोन पंचिका, कौषीतकी ब्राह्मणरचनेच्या कालानंतरच्या आहेत असें सिद्ध होतें. सहावी पंचिका ही सातव्या व आठव्या पंचिकांप्रमाणेंच मागाहून अंतर्भूत केली गेली आहे असें’ वेबर, कीथ वगैरे विद्वानांचें मत आहे. सहाव्या पंचिकेमध्यें होत्यानें सोमयागाशिवाय आणखी कोणत्या गोष्टी करावयाच्या याबद्दलचें विवेचन असून पहिल्या पांच पंचिकांनां ही सहावी पंचिका पुरवणीदाखल आहे असें हौगप्रभृति विद्वानांचें म्हणणें आहे. एखादें मत त्याज्य म्हणून ठरवावयाचें असल्यास पहिल्या पांच पंचिकांमध्यें ‘तत्तन्नदृत्यम्’ असा शब्दप्रयोग वापरण्यांत येतो. पण सहाव्या पंचिकेमध्यें ‘तदुपुन:परिचक्षते’ असा शब्दप्रयोग करण्यांत येतो. यावरून ही साहवी पंचिका नंतरची आहे असें हौग म्हणतो. याशिवाय कीथनें भाषा, व्याकरण व अन्य पुराव्यानीं हि पंचिका कशी प्रक्षिप्त ठरते हें विशद केलें आहे (कीथ-‘ऋग्वेद ब्राह्मणाज ट्रॅन्स्लेटेड’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेचीं ३१-३३ पानें पहा.)

ऐ त रे य ब्रा ह्म णा चा र च ना का ल.- ऐतरेय ब्राह्मण केव्हां रचलें गेलें हें दोन तर्‍हेनें ठरवितां येतें. एक बाह्य पुरावा व दुसरा अंतर्गत पुरावा, हे ते दोन प्रकार होत.

बाह्य पुरावा :- ऐतरेय ब्राह्मण व कौषीतकी ब्राह्मण हीं यास्काला माहिती होती असें निरूक्तांतील कौषीतकी ब्राह्मणासंबंधींच्या उल्लेखांवरून उघड आहे. यास्कापूर्वी झालेल्या शाकल्यास व तसेंच शौनककालीन आश्वलायन व शांखायन सूत्रांच्या कर्त्यांनाहि ब्राह्मणग्रंथ माहीत होते असें अनेक विधानांनीं सिद्ध करतां येतें. यावरून ऐतरेयब्राह्मणाचा काळ निदान ख्रि. पू. ६०० च्या पूर्वीचा असलाच पाहिजे असें मानावें लागतें.

अंतर्गत पुरावा :- ऐतरेयब्राह्मणामध्यें ज्या ऋत्विजांचा, राजांचा व इतर लोकांचा उल्लेख आला आहे त्यावरून देखील बाह्य पुराव्यावरून ठरविलेल्या ऐतरेयब्राह्मणाच्या रचनाकालालाच पुष्टि मिळते. ऐतरेय ब्राह्मणांत जनमेजयाच्या राज्याभिषेकोत्सवाचें वर्णन आहे. हा जनमेजय राजा संहितीकरणाच्या प्राचीन कालाच्या शेवटीं शेंवटीं झाला. अर्थात् त्याचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत प्रसिद्ध राजा म्हणून येणें साहजिकच आहे. यावरून ऐतरेयब्राह्मण कुरूयुद्धानंतर लवकरच रचलें गेले असावें.

ऐ त रे य ब्रा ह्म णा ची भा षा.- ऐतरेय ब्राह्मणाची गद्य भाषाशैली अपरिणत, बोजड, तुटक अशा स्वरूपाची आहे. कौषीतकी ब्राह्मणाप्रमाणें यांत संक्षिप्ततेचा दोष आढळून येत नाहीं. उपमा अगर उत्प्रेक्षा या ब्राह्मणांत सहसा आढळून येत नाहींत. कांहीं कांहीं ठिकाणीं या ब्राह्मणांतील भाषा सोपी, सरळ व जिवंत अशी वाटते. शुन:शेपाची कथा सुलभ व सुंदर भाषेंत सांगितली आहे. शुन:शेपाच्या कथेमध्यें जे छंदोबद्ध भाग आहेत त्या छंदोबद्ध भागांची अगर गाथांची भाषाशैली फार सुंदर व सोपी अशी आढळते व या दृष्टीनें गद्यापेक्षां यांतील गाथा भाषेच्या दृष्टीने उच्च दर्जाच्या आहेत यांत संशय नाहीं.

ऐतरेयब्राह्मणांत ज्या आख्यायिका आल्या आहेत व तसेच जे ऐतिहासिक अगर इतर परिस्थितिदर्शक उल्लेख आले आहेत त्यांबद्दलची सविस्तर माहिति ‘ज्ञानकोश प्रस्तावनाखंड भाग २ ‘वेदविद्या’ यामध्यें २३५-२४० या पानांत दिलेली आहे. शिवाय ककसंहितेंतील मंत्रांचा ऐतरेय ब्राह्मणानें कसा उपयोग केला आहे हें ज्ञानकोश विभाग दोन ‘वेदविद्या’ यांत शेवटीं परिशिष्टांतील कोष्टकांत दाखविलें असून ब्राह्मणग्रंथकालीं निरनिराळे पक्ष उत्पन्न करण्यासाठीं कोणकोणत्या चळवळी चालत असत याचें विवेचन बुद्धपूर्व जग विभाग ३ पूर्वार्ध पृष्ठ ५०५ येथें दिलें आहे.

[संदर्भग्रंथ:- ऐतरेय ब्राह्मण (आनंदाश्रम संस्कृतसीरीज); हौग-ऐतरेय ब्राह्मण भाग १|२; वेबर-हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर; मॅकडोनेल-हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर; ए. बॅरिडेल कीथ-ऋग्वेद ब्राह्मणाज ट्रॅस्न्लेटेड ( हार्वर्ड ओरिएंटल सीरीज व्हॉल्यूम २५ सन १९२०); ऐतरेय ब्राह्मण-प्रथमपंचिका, भाषांतरकार धुं. ग. बापट संपादक स्वाध्याय-पुणें.].