विभाग नववा : ई-अंशुमान
ऐनू - जपानच्या अगदीं उत्तरेकडील बेटांत वस्ती करून राहणारी ही एक प्रागैतिहासिक लोकांच्या वंशजांची जात आहे. प्राचीन काळीं या जातीचे लोक सायबेरियापासून जपानच्या अगदीं दक्षिणेकडील भागपर्यंतच्या प्रदेशांत पसरले होते. हे लोक जपानचे मूळचे रहिवाशी होत असें कांहीं ग्रंथकार प्रतिपादन करतात. पण खरा प्रकार तसा नाहीं. हे लोक मूळ कुराइल्स बेटांत राहणारे असून, ते हळूहळू जपानच्या उत्तर भागांत येझो या ठिकाणीं आले व नंतर तेथून त्यांनीं सर्व जपानभर पसरण्यास सुरूवात केली असें हल्लीं निरनिराळ्या शोधांवरून सिद्ध झालें आहे. पुढें दक्षिणेकडून ज्यावेळीं सध्याचे जपानी लोक जपानमध्यें आले तेव्हां जपानी लोकांच्या युद्धकलेपुढें व त्यांच्या संस्कृतीपुढें या ऐनूंचा टिकाव न लागल्यामुळें त्यांनीं पुनरपि येझो बेटांत, कुराइल्स बेटांत व साघलिनच्या दक्षिणभागांत वस्ती करण्यास प्रारंभ केला. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत जपानी लोकांनीं त्यानां पूर्णपणें जिंकून टाकिलें. ऐनू लोक हे प्राचीन काळीं चांगले शूर व कडवे होते पण हल्लीं मात्र ते चैनी, व्यसनी व आळशी बनलेले आहेत. त्यांची लोकसंख्या सुमारें १६ हजार ते १७ हजार असावी. जपानी लोकांपेक्षां ते राकट बांध्याचे असू त्यांचा चेहरा रूंदट नाकें चपटीं व डोळे काळेभोर असतात. त्यांच्या पायांचीं व हातांचीं कांहीं हाडे फारच चपटीं असतात, व या बाबतींत त्यांचें साम्य यूरोपमधील दर्याखोर्यांत राहणार्या कांहीं जातीशीं दिसून येतें. ते अत्यंत केंसाळ लोक आहेत. कांहीं विवक्षित वयोमर्यादेनंतर त्यांच्यांत हजामत करण्याची चाल नसल्यानें त्यांनां मोठ्या मिशा व कल्ले असतात. ऐनू बायकांमध्यें हातांवर, कपाळावर व चेहर्यावर गोंदून घेण्याची चाल आहे. ओठाच्या वरच्या भागावर पुरूषांच्या सारख्या मिशा गोंडून घेण्याची चाल यांच्यांत आढळून येते.
पोषाख - ऐनू लोकांचा पोषाख म्हटला म्हणजे एल्म वृक्षाच्या सालीचा तयार केलेला पायघोळ अंगरखा हा होय. या अंगरख्यावर कमरेभोंवतीं त्याच वृक्षाच्या सालीपासून तयार केलेला पट्टा गुंडाळण्याची चाल आहे. बायका मात्र या आंगरख्याच्या आंत एक अंतर्वस्त्र परिधान करितात. हिंवाळ्यामध्यें चामड्याचे कपडे वापरण्याची पद्धत आढळून येते. कर्णभूषणें घालण्याची चाल बायकांप्रमाणेंच पुरूषांतहि सरसहा दिसून येते. बायकांनां मण्यांची माळ गळ्यांत घालून मिरवणें फार आवडतें.
अन्न - या लोकांचें मुख्य अन्न मांस व मासे हें होय. अस्वल, कोल्हा, लांडगा, घोडा, बैल वगैरे कोणत्याहि प्राण्याचें मांस हे खातात. कंदमुळें व वनस्पती यांच्यावरहि हे उदरनिर्वाह करूं शकतात. मांस अगर मासे कच्चे मात्र खाण्याची वहिवाट यांच्यात नाहीं. मांस शिजवून व मासे तळून खाण्याची यांची चाल आहे.
घरें -यांचीं घरें, बांबूचीं झोंपडीवजा असतात. या घरांनां खोल्या वगैरे पाडलेल्या नसतात. झोंपडीच्या मध्यभागीं स्वयंपाकगृह असतें. घराला कोपर्यांत हवेसाठीं छिद्रें पाडलेलीं असतात. पूर्वेकडे फक्त एकच खिडकी असते व दोन दरवाजे असतात. भोजनगृहें, उपहारगृहें, सभागृहें अगर मोठमोठीं देवळें यांच्यामध्यें आढळून येत नाहींत. घरामध्यें लांकडी सामान जवळ जवळ नसतें म्हटलें तरी चालेल, चट्या आंथरून त्याच्यावर ते निजतात. ऐनू लोक अत्यंत घाणेरडे असतात. त्यांच्यामध्यें स्त्रान करण्याची चाल अजिबात नाहीं. घरची स्वयंपाकाचीं भांडीं देखील ते दररोज घासतांना आढळत नाहींत.
भाषा - ऐनू लोकांची भाषा साधी कर्णमधुर व सुरेल आहे. भाषेंतील वाक्यरचेनेचें जपानी भाषेंतील वाक्यरचनेशीं साम्य आहे पण इतर बाबतींत जपानी भाषेंत व या भाषेंत पुष्कळच फरक आहे. ऐनूंची भाषा अगदीं दरिद्री असून त्यांतील शब्दसंग्रह फारच थोडा आहे. उच्च विचार व्यक्त करण्याला यांची भाषा निरूपयोगी आहे असें लँडार नांवाचा एक लेखक म्हणतो; पण ते सर्वांशीं खरें नाहीं. डेब्रोव्हास्कीं नांवाच्या ग्रंथकारानें ऐनू भाषेंतील १०,९३० शब्दांचा संग्रह केलेला आहे. व बॅचलरनें आपल्या ऐनू-इंग्लिश-जपानी कोशांत १४,००० शब्द दिलेले आहेत. त्यावरून लँडारच्या म्हणण्यांत वास्तविक तथ्य नाहीं हें सहज दिसून येईल. लेखनकला मात्र यांनां अवगत नसल्यामुळें यांच्यामध्यें वाङ्मयाची बरीच वाण दिसून येते. कांहीं पौराणिक गोष्टी व परंपरेनें चालत आलेलीं गाणीं एवढेंच काय तें यांचें वाङ्मय होय. यांची अंक मोजण्याची पद्धत फारच चमत्कारिक व घोंटाळ्याची आहे. अशा रीतीनें ते भाषेच्या व वाङ्मयाच्या दृष्टीनें जरी बरेच मागसलेले आहेत तरी ते कमी बुद्धिमान् आहेत असें मात्र मुळींच म्हणतां यावयाचें नाहीं. जपानी लोकांनीं ऐनूंच्यासाठीं ज्या शाळा काढल्या आहेत त्यांमधील अनुभवावरून ऐनू लोक बुद्धिमान आहेत असें सिद्ध होतें. जपानी लोकांच्या भाषेशीं व वाङ्मयाशीं तरूण ऐनूचा परिचय होत असल्यामुळें आपल्या जातीच्या भाषेकडे हे तरूण लोक दुर्लक्ष करीत असलेले आढळून येतात.
शासन पद्धति. - हल्लींच्या काळांत ऐनू लोकांनां जपानी कायदेच लावले जातात व जपानी कायद्याप्रमाणेंच ऐनूमधील गुन्ह्यांचा निकाल लावला जातो. पण प्राचीन काळीं त्यांची शासनपद्धति निराळी होतीं. आपल्या ताब्यांतील प्रदेशाचे त्यांनीं सरू, उसू, व इशिकरी असे तीन भाग पाडले असून, सरूचा सर्व प्रदेशावर ताबा असे. प्रत्येक खेड्याची व्यवस्था, तीन पिढीजाद सरदारांकडे असे. पण या सरदारांकडे न्यायदानाचें काम मात्र नसें. गुन्हेगारांच्या अपराधांचा निकाल देण्याचें काम, त्या त्या जातींतील महाजनांच्या सभेकडे असे. गुन्ह्यांबद्दल देहांत शिक्षा कधींच दिली जात नसे. फक्त फटकें देण्याचीच चाल सरसहा अस्तित्वांत होती. खुनाच्या गुन्ह्यांबद्दल मात्र गुन्हेगाराचे नाक, कान, डोळे, पाय वगैरे छाटले जात असत.
ल ग्न वि धी व चा ली री ती.-प्राचीन काळीं ऐनूलोकांत मिश्र विवाहाची पद्धत नव्हती. पण हल्लीं ती प्रचारांत आढळून येते. जपानी लोकांमध्यें व ऐनूंमध्यें हल्लीं बरेच मिश्रविवाह झालेले दिसून येतात. विशेषत: संबत्सु या ठिकाणीं अशा प्रकारचे विवाह अधिक रूढ झालेले आढळतात. मँचुरियामधील लोकांच्या चालीरीतीशीं यांच्या चालीरीतीचें बरेंच साम्य आढळून येतें. ऐनू लोक हे सहवासप्रिय व मनमिळाऊ असून परकीय मनुष्याशीं ते चांगल्या रीतीनें वागतात. अनेक शतकें लोटलीं असूनहि त्यांच्या चालीरीती फारशा बदललेल्या नाहींत. धर्मविषयक बाबतींत बायकांना एकदोन गोष्टी खेरीज करून ढवळाढवळ करण्याची मनाई आहे. नवर्याचें नांव बायकांनीं घेणें हें पाप आहे. तसेंच घुबड वगैरे प्राण्यांचे आवाज ऐकणें हें दुश्चिन्ह होय अशा यांच्या समजुती आहेत.
धर्म - ऐनूंचा धर्म शिंटो वगैरे धर्माप्रमाणें फारच प्राचीन आहे. ऐनू लोकांनां धर्म नाहीं, त्यांच्यांत नीतिविषयक कल्पनांचा अभाव आहे हें म्हणणें बरोबर नाहीं. ऐनूंचा धर्म मुळांत एकेश्वरी असावा असें दिसतें. ईश्वरवाचक ‘कामुई’ हा शब्द आहे. पुढें ज्यावेळीं यांच्या धर्मांत अनेक देवतांची कल्पना रूढ झाली त्यावेळीं मुख्य ईश्वराला ‘पसे कामुई’ असें नांव देण्यांत आलें. या परमेश्वराचें वर्णन ‘टुंटू’ म्हणजे ‘सर्व वस्तूंचा आधार’ व ‘शिंडा’ म्हणजे ‘निर्माता’ अशा शब्दांनीं करण्यांत येतें. पंचभूतात्मक प्रकृति ही अनाद्यंत असून त्या प्रकृतीपासून हें जग निर्माण झाहें असें ऐनूंचे मत आहे या प्रकृतिपासून जग कसें विकास पावलें यासंबंधीं मात्र बर्याच अस्वाभाविक कल्पना यांच्यांत आढळून येतात.
मृता संबंधींच्या कल्पना.- मनुष्य मरण पावल्यानंतर त्याचा आत्मा त्याच्या पापपुण्याप्रमाणें स्वर्गांत अगर पाताळांत जाऊन रहातो अशी ऐनूंची समजूत आहे. या दृष्टीनें त्यांनीं सहा प्रकारचे स्वर्ग व सहा प्रकारचे नरक मानलेले आहेत. मृत मनुष्याला परमेश्वरापुढें पापपुण्याचा झाडा द्यावा लागतो व त्याप्रमाणें त्याला परमेश्वर स्वर्गांत अगर नरकांत ढकलतो अशी यांची कल्पना आहे. मरणोत्तर मनुष्याला स्वर्गांत अगर पाताळांत रहाण्याकरतां घर, शिकारीसाठी धनुष्यबाण इत्यादि लागतात या समजुतीनें मृताच्या शरीराबरोबरच या वस्तूंचा नाश करण्यांत येतो. हेतु हा कीं या सर्व वस्तु मृताबरोबरच स्वर्गांत अगर पाताळांत जाव्यात. अशा प्रकारच्या मृतासंबंधींच्या कल्पना ऐनूंमध्यें आढळतात.
[ संदर्भ ग्रंथ.-बॅचरल-ऐनू अँड देअर फोकलोअर (लंडन), व ‘दि ऐनू ऑफ जपान; इसाबेला वर्ड-कोरिया अॅड हर नेबर्स (१८९८), व अनबीटन ट्रॅक्स ऑफ जपान (१८८५); डग्लस हॉवर्ड-लाइफ वुइथ दि ट्रॅन्ससैबेरियन सॅव्हेजेस (१८९३); रॉमिन हिच कॉक-दि ऐनूज ऑफ जपान (वॉशिंग्टन १८९२); चेंबरलेन-थिंग्ज जपॅनीज (लंडन १९०२);]