विभाग नववा : ई-अंशुमान
ऐयतर - दक्षिण हिंदुस्थानांतील अति प्रसिद्ध व लोकप्रिय ग्रामदेवतांपैकीं ऐयनर ही एक क्षेत्ररक्षक देवता आहे. ती संकटापासून पिकांचें निवारण करून रात्रीच्या वेळीं त्यांचा नाश करणार्या दुष्ट जीवांना हांकून लाविते असें म्हणतात. दक्षिणेच्या वरच्या भागांत या देवाचें नांवहि फारसें माहीत नाहीं; तथापि दक्षिणेंत बहुतेक प्रत्येक गांवांत ऐयनरचें एक तरी देऊळ असतेंच; त्या ठिकाणीं रोग व अवर्षण यांपासून पिकांचें रक्षण व्हावें म्हणून या देवाला अनेक वस्तू व स्तोत्रें अर्पण करण्यांत येतात. देवळाच्या भोंवतीं व गांवाजवळ, तांबड्या भाजलेल्या मातीचे ओबडधोबड घोडे, हत्ती, वगैरे त्या त्या प्राण्यांएवढे मोठाले एकत्र ठेवलेले बहुधा आढळतात. यांवर बसून परिवारासह ऐयनर राक्षसांचा पाठलाग करण्यास जातो असें मानण्यांत येतें. खेडेगांवचा माणूस काळोख पडल्यानंतर ऐयनरच्या देवळाजवळ जाण्याचें टाळतो कारण न जाणों कदाचित राक्षस समजून तो मारला जावयाचा!
या देवतेची मूर्ति मनुष्याच्या आकाराची असून कधीं कधीं मुकुट व राजदंड धारण करून बसलेली तर कधीं अश्वारूढ अशी दाखविलेली असते. पूरणी व पुडकला या त्याच्या दोन बायका कधीं कधीं त्याच्या शेजारीं असतात व दुष्टापसरणाच्या कामीं त्या आपल्या पतीला मदत करितात. संकट किंवा पीडा आली असतांहि ऐयनरला आळविण्यांत येतें. यावेळीं देवळासमोरील दगडांच्या वेदीवर पशुयाग होतो व तर्पण केलें जातें. संस्कार चालविणारा पुरोहित नेहेमीं हलक्या जातींतील असतो. दुखण्यांतून बरा केल्याबद्दल किंवा एखादें व्रत निर्विघ्नपणें पार पाडल्याबद्दल किंवा कोणतेंहि साहाय्य केल्याबद्दल गांवकरी ऐयनरला मातीचे घोडे दान करितात. तथापि हंगामाखेरीज इतर वेळीं या देवतेची जत्रा भरतांना किंवा उपासना होतांना दिसत नाहीं. सर मोनियर विल्यम्सनें आपल्या ब्राह्मणिझम व हिंदुइझम या पुस्तकांत परमगुडीच्या ऐयनरमंदिराला भेट दिल्यावेळचें जें वर्णन दिलें आहे तें बहुतेक दक्षिण हिंदुस्थानांतील पुष्कळशा देवस्थानांना लागू पडण्यासारखें आहे.
ऐयनर हें नांव “हिर-हर” या दोन नांवांचा संधि किंवा अपभ्रंश असावा व विष्णूनें जेव्हां स्त्रीरूप घेतलें त्यावेळीं शिवापासून त्याला झालेला हा मुलगा असें मानण्यांत येतें. ही कदाचित् आद्य द्राविड देवता असून मागाहून आलेल्या आर्यांनीं तिला मान्यता देऊन आपल्या देवांत ओढलें व कुलकथा निर्माण केली, असें दिसतें. कधीं कधीं गणपतीची (म्ह. याच्या भावाची) मूर्ति या ऐयनर शेजारीं असते, पण गणपतीप्रमाणें ऐयनरला मंगलकार्यासाठीं किंवा आशीर्वाद देण्यासाठीं कधीं आहवान केल्याचें आढळत नाहीं.