विभाग नववा : ई-अंशुमान
ऐरणी - मुंबई इलाखा धारवाड जिल्हा. राणीबिन्नूरच्या पूर्वेस बारा मैलांवर सुमारें दोन हजार लोकवस्तीचें खेडें. येथें कलिंगडें उत्कृष्ट होतात. इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळापूर्वी येथें कूरूबार लोक घोंगड्या चांगल्या करीत असत. यांच्यापैकीं दुष्काळांत पुष्कळ मेले व कांहीं येथून निघून गेले. त्यामुळें हा धंदा बसला. इ. स. १७९० सालीं टिपूविरूद्ध मराठ्यांच्या मदतीस आलेल्या कॅप्टन मुरनें ऐरणी गांवास लहानसा किल्ला असून गांव देखील बर्यापैकीं आहे असें वर्णन लिहून ठेवलें आहे. इ. स. १८०० (२० जून) सालीं कर्नल वेलस्ली (ड्यूक वेलिंग्टन) हा प्रसिद्ध मराठी लुटारू धोंड्या वाघ याचा समाचार घेण्याकरितां आला असतां त्यानें ऐरणीच्या किल्ल्यावर टेहेळणी करण्याकरितां म्हणून एक तुकडी रवाना केली होती. त्याच्या मनांत लढाई करून किल्ला सर करावयाचा होता; परंतु किल्ल्यांतील सैन्य किल्ला सोडून गेल्यामुळें ता. २१ जून रोजीं क. वेलस्लीच्या ताब्यांत आला. इ. स. १८४२ सालीं कॅ बरगॉइन व ले. बेल यांनीं या किल्याचें वर्णन केलें आहे. तुंगभद्रेच्या वामतीरावर हा किल्ला असून साधारण भक्कम आहे.