विभाग नववा : ई-अंशुमान

ऐहोळ - विजापुर जिल्हा. हुनगुंद तालुक्यांतील एक गांव. उ. अ. १६० १’ व पू. रे. ७५० ५२’ हें मलप्रभा नदीवर हुनगुंदच्या नैर्ऋत्येस १३ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें दोन हजार. नदीकिनार्‍याला एक कुर्‍हाडीच्या आकाराचा खडक दाखवितात. विष्णूचा सहावा अवतार जो परशुराम त्यानें सर्व क्षत्रियांचें निर्मूलन केल्यावर आपला परशु येथें धुतला अशी दंतकथा आहे; व त्याचें स्मृतिचिन्ह म्हणजे परशूच्या आकाराचा हा खडक व नदीमध्यें खडकावर परशुरामाच्या पादुका आहेत व जवळच रामलिंगाचें देऊळ आहे.

गांवाच्या समोरच्या डोंगरावर मेगुतीचें मंदिर आहे. त्याची बांधणी द्रविड पद्धतीची आहे. या देवळाच्या पूर्व भिंतींत चालुक्यकालीन एक शिलालेख आहे. तो इ. स. ६३४ मधील आहे त्यांत “महाराष्ट्र” असा शब्द या देशाला प्रथमच लाविलेला आढळतो. सध्यां तें दुर्गा देवीचें मंदीर म्हणून प्रसिद्ध आहे व त्यावरून बौद्धांचीं डोंगरांतील लेणीं पहिल्यानें जैन व तदनंतर ब्राह्मणमंदिरें होण्यापूर्वी कोणत्या स्थित्यंतरांतून गेलीं हें चांगलें दिसून येतें. येथें डोंगरांत कोरलेलीं दोन लेणीं आहेत, एक जैन व दुसरें ब्राह्मणी यांखेरीज दुसरीं देवालयें म्हणजे हूचिमल्लिगुडी, लाडखान व  कोडदेव. याहि देवळांवर शिलालेख आहेत. यास अइवल्लि असेंहि नांव आहे [इं. गॅ. ५, १९०८ व मुं. गॅ विजापूर १८८४].