विभाग नववा : ई-अंशुमान
ओ, अ र्थ - (१) ब्रह्मदेव. (२) महापद्म (संख्या). (३) हांकेस उत्तर, जसें ओ देणें. (४) ओकारी, जसें ओ होईपर्यंत जेवणें. इत्यादि.
अ क्ष र वि का स.- ‘अ’ पासून ‘ओ’ वर्ण तयार झाला असावा ही साहजिक सुचणारी कल्पना चुकीची ठरते. कारण अशोकाच्या गिरनार लेखांत ‘ओ’ ची आकृति स्वतिकांतील उभ्या भागाप्रमाणें आहे. इ. स. पहिल्या शतकांतील कुशानवंशी राजाच्या वेळच्या मथुरा येथील लेखांत वरील ‘ओ’ च्या वरच्या आडव्या रेघेला बराच बांक आहे. पुढील शतकांतल्या नासिकच्या वासिष्ठीपुत्र पुलुमायीच्या लेखांत खालच्या रेघेलाहि बांक आहे. काली लेण्यांत सुद्धां असाच ‘ओ’ दिसतो. पांचव्या शतकांतील जयनाथच्या दानपत्रांत हल्लींच्या ‘उ’ च्या सारखी ‘ओ’ ची आकृति दिसते प्रतिहार कक्कुकाच्या घटिआला लेखांत (इ. स. ८६१) हें साम्य अधिकच पटतें. १२व्या शतकांतील एका हस्तलिखित पुस्तकांत ‘ओ’ हा ‘अ’ ला मात्रा देऊन काढल्यासारखा दिसतो. आज आपण काढतो तसा ओ कोठेंच आढळत नाहीं. पूर्वी अक्षराच्या डाव्या हाताला काना काढून मात्रेचें काम भागवीत असत.