विभाग नववा : ई-अंशुमान
ओक - एक वृक्ष. याच्या अनेक जाती असून, आकारहि निरनिराळे असतात. याचें फळ सुपारीसारखें असून खालच्या बाजूस एका लांकडी खवलेदार पेल्यांत ठेवल्यासारखें दिसतें. यूरोप, आशिया, उत्तर आफ्रिका व उत्तर अमेरिका या खंडांच्या समशीतोष्ण भागांतून ओक वृक्ष जिकडे तिकडे आढळतात. ब्रिटिश-ओक ज्याला म्हणतात तो समशीतोष्ण प्रदेशांत अतिशय मौल्यवान् असा मानला जातो. पाण्यांत असला म्हणजे तो इतर बहुतेक लांकडांपेक्षां जास्त टिकतो व हवेंत बदल झाला तरी त्याच्यांत बदल होत नाहीं. याचें वजन दर घनफुटांस ४८ ते ५५ पौंड असतें. सालीच्या आंतलें लांकूड जास्त हलकें व फार कमी टिकाऊ असतें. तरी पुष्कळशा स्वस्त जिन्नसा करण्याच्या कामीं तें चांगलें उपयोगी पडतें. जहाजें बांधण्याच्या कामीं मागें ब्रिटनचें ओक लांकूड फार वापरीत. पण हल्लीं सागवानानें त्याची जागा पटकाविली आहे. लांकूड कृत्रिम रीतीनें वांकविण्याची कला माहीत नव्हती तेव्हां ओकच्या वांकलेल्या फांद्या व बुंधे नौकाबंधनाला फार महत्त्वाचे वाटत यांत शंका नाहीं. अजूनहि खेड्यांतील कारागीर गाड्या वगैरे तयार करण्याला ओक वापरतात; शिल्पी नक्षीकामासाठी घेतात. एडवर्ड दि कन्फेसरची वेस्टमिनिस्टर येथील (८०० वर्षांपूर्वींची) कबर काळ्या ओक लांकडाची आहे. जळाऊ लांकूड म्हणूनहि याचें महत्त्व आहे. धातू वितळविण्याच्या कामीं याचे कोळसे चांगले असतात. पण यूरोपांतील ओक वृक्षाला किड्यांपासून फार भीति असते. एकानें असें दाखवून दिलें आहे कीं, वनस्पतिजीवि किड्यांपैकीं निम्मे ओक वृक्षावर जगतात. ओकच्या फळांनां मोठें आर्थिक महत्त्व प्राप्त झालें आहे; कारण तीं डुकरांनां नेहमीं खाऊं घालतात; व दुष्काळांत गोरगरीब तीं खाऊन रहातात.
हिं दु स्था नां ती ल ओ क वृ क्षां च्या जा ती.- पूर्व हिमालय, खासिया डोंगर व मणीपूर येथील ओक झाडें पूर्ण वाढलेलीं असतात. हिंदुस्थान व ब्रह्मदेश मिळून यांच्या एकंदर ३१ जाती सांपडतात.
हिरवा ओक :- याला मोरू, तिलंगसा, किलोंज, रामशिंग, कालीराग, चोरा, परूंगा, बान, कर्शझै इत्यादि नांवें आहेत. हा मोठा परंतु पानें गाळणारा वृक्ष पश्चिमेस अफगाणिस्तान व सफेदकोह आणि पूर्वेस नेपाळपर्यंत आंतील हिमालयाच्या ७ ते ९ हजार फूट उंचीच्या प्रदेशांत होतो. या झाडाचें लांकूड टिकाऊ असून त्याचा इमारती, शेतकीचीं आउतें, कुर्हाडीचे दांडे वगैरे करण्याकडे उपयोग होतो. टॉन्सव्हॅली स्लीपरच्या कारखान्यांत ह्या लांकडाच्या बिनचाकी गाड्या करून त्यांचा उपयोग देवदार काढण्याकडे करतात. सिमला जिल्ह्यांत ह्या लांकडाचे कोळसे करतात. पानें व कोंवळ्या फांद्या गुरांनां खाण्यासाठीं तोडतात.
करडा ओक :-(ग्रे ओक), बंज, सिला, सुपारी, रिन, भारू, कर्शु, शिंदर, सेरै, दघुनबान इत्यादि नांवें या जातीला आहेत. हें मोठें व नेहमीं हिरवे असणारें झाड सिंधू नदीपासून नेपाळपर्यंतच्या २ ते ८ हजार फूट उंचीच्या हिमालयाच्या प्रदेशांत होतें. शान डोंगर व ब्रह्मदेश यांत सुद्धां हें झाड होतें. हिंदुस्थानांतील ओक वृक्षाची ही जात अत्यंत सुप्रसिद्ध आहे हीं झाडें सिमला, मसूरी, नैनीताल वगैरे थंड हवा खाण्याच्या ठिकाणांजवळ फार दिसतात. इमारतीचें लांकूड म्हणून या झाडाच्या लांकडांचा उपयोग क्वचित करतात. हें लांकूड सरळ नसतें. कधीं कधीं मात्र याचा घरें बांधण्याकडे व शेतकीचीं आउतें करण्याकडे उपयोग करतात. जाळण्यासाठीं व कोळसे पाडण्यासाठीं याचा मुख्य उपयोग होतो. झाडाच्या सालीपासून हरणाच्या तांबूस रंगासारखा रंग निघतो. त्याचा उपयोग कातडीं कमविण्याकडे होतो. परीक्षणाअंतीं या झाडाच्या वाळलेल्या सालींत टॅनिक अम्ल ओक झाडांमध्यें सर्वांत जास्त म्हणजे शेंकडा २३.३६ या प्रमाणांत निघालें.
लामेलोसा ओक :- शलसी, फरतसिंधली, बुदग्रन, बूक अशीं याचीं नांवें आहेत. हें फार मोठें व नेहमीं हिरवें असणारें झाड पूर्वहिमालयांत नेपाळ ते डाफला टेंकड्यांपर्यंतच्या ५-९ हजार फूट उंचीच्या प्रदेशांत होतें. मणिपूर भागांत हें झाड ७ ते ८ हजार फूट उंचीच्या प्रदेशांत वाढतें. दार्जिलिंगच्या जंगलांतील हें सर्वांत सुंदर व महत्त्वाचें झाड असून कधीं कधीं १०० ते १२० फूटांपर्यंत याची उंची असते. ओलसर जागेंत जर फार ठेवलें नांहीं तर या झाडाचें लांकूड फार टिकाऊ असतें. घराचे व पुलाचे खांब व तुळ्या, खिडक्यांच्या चौकटी वगैरे या लांकडापासून करतात. ह्याचा जाळण्यास फार चांगला उपयोग होतो. दार्जिलिंगमध्यें ह्याच्या सालींचा कातडीं कमाविण्याकडे उपयोग होतो.
पंगट ओक :- नांवें-घेसी, कर्शू, खरेड, बर्चर, जंगल, कापरूंगी, केरू, सौज इत्यादि. पश्चिमेस सफेत कोह आणि अफगाणिस्तान व पूर्वेस भूतान आणि मणिपूर डोंगर यांमधील सर्व क्षेत्रांत हें झाड होतें या जातीच्या ओकाला फारशी मागणी नाहीं, तरी हें भक्कम व टिकाऊ असतें. याचे कोळसे चांगले पडतात. पानें चारा म्हणून उपयोगी पडतात. चिनी रेशमाचे किडे या पानांवर रहातात. [वॅट. अग्नि. लेजर, १९०२ नं. २,५५. इंडियन फॉरेस्टर २०.२१].