विभाग नववा : ई-अंशुमान
ओकुमा, कौंट - एक जपानी मुत्सद्दी. (जन्म १८३८) लहानपणीं यानें चिनी वाङ्मयाचा अभ्यास करून इंग्रजी व डच भाषांचेंहि चांगलें ज्ञान मिळविलें. या भाषांतलीं शास्त्रीय व राजकीय विषयांचीं पुस्तकें वाचून त्याच्या मनांत मोठी क्रांती झाली. बापानें त्याला लष्करांत घालण्याचें ठरविलें होतें; पण आपली सर्व शक्ति सरंजामी पद्धत मोडून त्या जागीं सनदशीर राज्यपद्धति स्थापण्यांत खर्च करावयाची असा त्यानें निश्चय केला. त्यानें लवकरच आपलीं मतें जाहीर केलीं व १८६८ च्या जपानमधील राज्यक्रांतींत त्याचें मुळींच अंग नव्हतें तरी त्याच्या विचारांचा लोकांवर बराच परिणाम झालेला दिसला. भिकाडोच्या कारकीर्दींत त्याला परराष्ट्रीय कारभाराच्या खात्यांत दुय्यम अधिकार्याची जागा मिळाली. १८६९ त तो अंतर्व्यवहार व फडणिसी खातें यांवरचा चिटणीस झाला. यापुढील १४ वर्षें त्यानें निरनिराळ्या हुद्यांवर काम करून राजकारणांत घालविलीं. एकदां लोकमत त्याला अगदीं प्रतिकूल होऊन त्याच्या जिवावर बेतलें होतें. आपल्या सार्वजनिक आयुष्यांत त्यानें विद्यावृद्धीची जरूरी पाहून त्या दिशेनें खटपट केली होती. त्यानें आपल्या खर्चानें विशिष्ट विषयांकरितां एक शाळा चालविली होती. १८९८ त मार्क्विस इटोच्या मृत्यूनंतर त्यानें परराष्ट्रीय मंत्री व मुख्य प्रधान या जागेवर काम केलें. पण मंत्रिमंडळांत बेबनाव उत्पन्न होऊन थोड्या दिवसांतच त्याला राजीनामा देऊन घरीं बसावें लागलें. टोकिओशेजारीं वासेडा येथें असलेल्या आपल्या सुंदर बगीचाची व्यवस्था करण्यांत तो राहीलेला काळ कंठीत असे.