विभाग नववा : ई-अंशुमान

ओकेन, लॉरेन्झ (१७७९-१८५१)-एक जर्मन सृष्टिशास्त्रज्ञ. वुर्झबर्ग व गॉटिन्जन विश्वविद्यालयांत वैद्यक व सृष्टिशास्त्र या विषयांचा यानें अभ्यास केला. १८०२ त यानें एक लहानसा ग्रंथ लिहून त्यांत कांटनें मानसिक व नीतिशास्त्रांत योजिलेलीं तत्त्वें यानें भौतिक शास्त्राला लाविलीं. अपृष्ठवंशीय, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी व सस्तन प्राणी असे प्राण्यांचे त्यानें पांच वर्ग पाडले. १८०५ सालीं त्यानें उत्पत्तीवर एक पुस्तक लिहिलें. सर्व सेंद्रिय प्राणी पेशींपासून उत्पन्न होतात व ते पेशींचेच बनलेले असतात असें त्याचें म्हणणें होतें. पुढील वर्षीं जो त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला त्यांत आंतडीं नाभिपेशीपासून उगम पावतात असें त्यानें सिद्ध करून दाखविलें. या सुमारास ओकेनची कीर्ति गाएटेच्याहि कानावर जाऊन त्याला येना विश्वविद्यालयांत वैद्यक शास्त्राच्या प्रोफेसरची जागा मिळाली. येना येथील त्याच्या व्याख्यानांत सृष्टितत्त्वज्ञान, निसर्गेतिहास, प्राणिशास्त्र, शारीरविच्छेदन, मनुष्य, प्राणी व वनस्पती यांचे शारीरविज्ञान यांसारखें अतिविस्तृत विषय विवेचिले जात. एकट्या शरीरांत एकंदर विश्वाच्या हालचालींचें केलेलें एकीकरण म्हणजेच सेंद्रियरचना होय हें तत्त्व त्यानें १८०८ मध्यें लिहिलेल्या पुस्तकांत प्रामुख्यानें नजरेस येतें. एखाद्या मध्यवस्तूनें ध्रुवप्रदेशाच्या ठिकाणीं इतर ग्रहांबरोबर घडवून आणलेली ईथरची ओढाताण म्हणजेच प्रकाश; व उष्णता ही या ईथरची गति होय हा सिद्धांत त्याच वर्षीं प्रसिद्ध झालेल्या त्याच्या दुसर्‍या एका ग्रंथांत आहे. खनिज क्षेत्रांतहि त्यानें वेगळी मांडणी केली. त्यानें धातूच्या दगडांचें वर्गीकरण धातूंवरून न करतां त्यांच्या ऑक्सिजन, अम्ल व गंधक यांशीं होणार्‍या संयोगानुसार केलें. १८१६ त त्यानें इसस नांवाचें एक नियतकालिक काढिलें; त्यांत शास्त्राखेरीज काव्यें व जर्मन संस्थानांच्या राज्यकारभारावर टीका प्रसिद्ध होत. त्याच्या राजकीय चर्चेमुळें वीमर दरबारनें त्याला एक तर पत्र बंद करण्याला नाहींतर प्रोफेसराची जागा सोडण्याला सांगितलें. तेव्हां ओकेननें प्रोफेसरी सोडली. पण दरबारनें वीमर येथें इसिस प्रसिद्ध करण्याची बंदी केली. तेव्हां रूडोल्स्टड येथें तें प्रसिद्ध होऊं लागलें. १८४८ पर्यंत तें नियमानें चाललें होतें. एका विश्वविद्यालयांतून दुसर्‍यांत अशा त्याच्या वारंवार बदल्या झाल्या. शेवटीं १८३३ त तो झूरिच येथें कायम झाला. अध्यापनाचें व शास्त्रीय प्रगतीचें काम त्यानें त्या ठिकाणीं आमरण चालविलें. ओकेननें लिहिलेल्या ग्रंथांत १५|१६ सुप्रसिद्ध आहेत. इसिस व इतर नियतकालिकांतून त्याचे अनेक लेख अंतर्भूत झाले आहेत.