विभाग नववा : ई-अंशुमान
ओट - (धान्य व गवत) हें गवत पश्चिमेस बलुचिस्तान व अफगाणिस्तानपासून काश्मॉर कुमाऊन व नेपाळमधून सिकीमच्या अगदीं पूर्वेच्या भागापर्यंत सर्वत्र आढळतें. परंतु तें कोठेंच पुष्कळ प्रमाणांत दिसत नाहीं. हिमालयाच्या समशीतोष्ण प्रदेशांत हें बहुधा आढळतें. या गवताच्या तेरा जाती आहेत. त्यांपैकीं ‘ए. साटीव्हा’ या गवताची लागवड केली जाते. आफ्रिका, अरबस्तान, इजिप्त, इराण, जपान व चीन यांमध्येंहि या गवताची लागवड करितात. कासपर बौहिननें या गवताच्या आलबा व मुडा अशा दोन जाती दिलेल्या आहेत. आलबा गवताला अरब लोक चुरतल म्हणत असत.
चेंगिझखानाच्या बरोबरच ओट गवत हिंदुस्थानांत आलें व तें सर्व मोंगलबादशहांनां माहीत होतें असें कांहीं लेखक म्हणतात.
ऐनी अकबरीमध्येंहि या गवताचा उल्लेख केलेला आहे. वॉरनहोस्टिंग्सनें मोथुझील येथें त्याची लागवड करविली होती असें म्हणतात. यावरून या गवताची लागवड निदान १९ व्या शतकातच्या आरंभीं झाली असली पाहिजे हें स्पष्ट दिसतें. अलीकडे ओट गवताची लागवड महत्त्वाचीं नसली तरी सर्व हिंदुस्थानभर होते. याचा दाणा चांगला भरत नाहीं. यामुळें धान्य मनुष्याच्या खण्याच्या कामाचें नसतें. शिवाय दाणा पक्व झाल्यावर तो कणसांतून गळून पडतो; यामुळें याची कापणी लवकर करावी लागते ओटचा चारा तांदूळ व गहूं यांच्या चार्यापेक्षां पौष्टिक असतो.
ला ग व ड :- ओट गवताची लागवड जव बालींप्रमाणेंच करितात. पाण्याचा पुरवठा भरपूर असल्यास हिरवा चारा तीनदां कापतां येतो. व नंतर धान्याचें पातळसें पीकहि होतें. दर एकरी २० मण धान्य व ३० मण गवत होतें. हिमालयाच्या खालच्या उतरणीवरील प्रदेशांत ओट धान्य सर्वांत उत्तम होतें. दिल्ली, हिस्सार व मीरत जिल्ह्यांत हें गवत पुष्कळ होतें. पुणें, अहमदनगर, सातारा व अहमदाबाद या जिल्ह्यांत हें गवत थोड्या प्रमाणावर होतें. सपाटीच्या प्रदेशांतील धान्य लांबट व बारीक असून त्यांवर टरफलाचा भाग जास्त असतो व एक बुशेल धान्याचें वजन १५ ते ३७ पौंडांपेक्षां बहुधा अधिक नसतें. मुंबई प्रांतांत ओट हें रब्बी पीक आहे. ओटचें पीक भुसभुशीत व निचरा असलेल्या जमिनींत फार चांगलें होतें. चिकणमातीच्या व हलक्या जमीनींत हें होत नाहीं. ओटला लागणारी जमीन व इतर परिस्थिति हीं गहू व जव यांच्याप्रमाणेंच असावी लागतात. या गवताचें बीं फेकून पेरावें लागतें. एक एकर जमीनीस सुमारें १०० पौंड बी लागतें. पेरणीपासून पीक तयार होण्याला ३|| ते ४ महिने लागतात. याची भाताप्रमाणें झोडून किंवा त्यावर बैल फिरवून मळणी करतात. चांगल्या एक एकर जमीनींतील पिकाचें प्रमाण १८०० ते २२०० पौंड व चार्याचें प्रमाण २५ हंड्रेडवेट आहे. ओट धान्य बहुधा भरडून व इतर धान्यांबरोबर मिसळून घोड्यांनां देतात.
ओट धान्य व गवत यांची आयात थोडीबहुत होते. परंतु त्यासंबंधीं स्वतंत्र आंकडे मिळत नाहींत. गवताची निर्गत बरीच मोठी आहे. गेल्या २० वर्षांत निर्गतीचें प्रमाण सरासरी ५० हजार ते ८० हजार हंड्रेडवेट यांच्या दरम्यान होतें. व पाठविलेल्या मालाची किंमत १|| ते ४ लक्ष रूपयांपर्यंत होते. १९०६-७ सालीं २,२६,०२२ रू. किंमतीचें ५५,५१८ हंड्रेडवेट गवत परदेशीं पाठविलें गेलें. हा व्यापार मुख्यत्वेंकरून बंगाल व मॉरिशस यांच्या दरम्यान चालतो.