विभाग नववा : ई-अंशुमान
ओट्टो - (पहिला जन्म ९१२; मृत्यू ९७३) हा ओट्टो दि ग्रेट या नांवानें इतिहासांत प्रसिद्ध आहे. हा रोमचा बादशहा जर्मनीचा राजा पहिला हेनरी याचा ज्येष्ठ पुत्र होय. त्याच्या बालपणींच्या वृत्तान्ताविषयीं फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याचा इंग्लंडचा राजा एडवर्ड दि एल्डर याच्या मुलीशीं विवाह झाला. लहानपणीं यानें आपल्या बापाबरोबर निरनिराळ्या लढायांत भाग घेतला होता व त्यामुळें युद्धांतील डावपेंचांचें त्याला उत्तम ज्ञान प्राप्त झालें होतें. ९३६ मध्यें तो जर्मनीचा राजा झाला व त्याला मेंझचा आर्चबिशप हिलेबर्ट यानें मोठ्या समारंभानें राज्याभिषेक केला. हेनरीनें आपल्या मांडलिक सरदारांशीं जी सौम्य वृत्ति ठेवली होती ती ओट्टोनें टाकून देऊन, आपल्या हाताखालील शेफारून गेलेल्या मांडलिकांनां शासन करण्यासाठीं यानें चंग बांधला. ९३७ मध्यें फ्रँकोनियाचा ड्यूक एबरहार्ड याला शासन करून त्यानें त्याच्याकडून बव्हेरिया प्रांत काढून घेतला. बोहेमियन व इतर स्लाव जातीच्या लोकांनीं जर्मनीच्या पूर्व सरहद्दीवर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली होती. त्याबद्दल त्यांचें पारिपत्य करण्याकरितां त्यानें आपल्या सरदारांनां पाठविलें. ठंकमर या नांवाचा त्याचा सावत्र भाऊ होता. त्यानें त्याच्याजवळ कांहीं मुलूख मागितला पण ओट्टोनें त्याला तो देण्याचें नाकारलें. त्यामुळें चिडून जाऊन त्यानें वुइचमन नांवाचा एक सरदार व फँकोनियाचा ड्यूक एबरहार्ड यांच्या साहाय्यानें बंड उभारून ऐरसबर्गचा किल्ला ताब्यांत घेतला. व ओट्टोचा धाकटा भाऊ हेनरी याला बंदिवान केलें. पण ओट्टोनें त्याच्यावर स्वारी करून त्या बंडाचा मोड केला. पुढें ९३९ मध्यें त्याचा भाऊ हेनरी यानेंच बंड पुकारलें. या बंडांत एबरहार्ड व लोरेनचा ड्यूक गिसेलबर्ट यांचें हेन्रीला साहाय्य होतें. अर्थातच ओट्टोला त्यांच्यावर पुन्हां स्वारी करणें भाग पडलें. त्यानें क्सँटन येथें आपल्या भावाचा पराभव केला. पण अद्यापि फ्रँकोनिया व लोरेन येथील ड्यूकांनीं पुंडाई चालविलीच होती. तशांतच लोरेनचा ड्यूक यानें फ्रान्सच्या राजाचें मांडलिकत्व पत्करल्याचें जाहीर केलें. ओट्टोवर आणीबाणीचा प्रसंग येऊन ठेपला. पण सुदैवानें अडरनाक येथील लढाईंत ओट्टोचा जय होऊन एबरहार्ड व गिसेलबर्ट हे दोघेही प्राणाला मुकले. हेनरीला त्याच्या अपराधांची क्षमा करून त्याला त्यानें लोरेनचा ड्यूक केलें; पण तेथील व्यवस्था त्याला चांगली ठेवतां न आल्यामुळें ओट्टोनें त्याला पदच्युत केलें. यामुळें हेनरीला चीड येऊन ओट्टोचा खून करण्याची त्यानें मसलत केली; पण ती उघडकीस आल्यामुळें ओट्टोचा जीव बचावला. यानंतर ओट्टोनें बरींच मांडलीक संस्थानें आपल्या खास देखरेखीखालीं घेतलीं. लोरेनच्या ड्यूकला मदत केल्याच्या सबबीवर फ्रान्सवर स्वारी करण्याचें ओट्टोनें ठरविलें; पण लुईनें आपण होऊनच ओट्टोशीं तह केला. पुढें लुईलाच ज्या वेळेस लुईच्या एका मांडलिकानें तुरूंगांत टाकून लुईची सत्ता बळकाविली त्या वेळीं लुईच्या वतीनें ओट्टोनें त्या मांडलिकावर स्वारी करून लुईची सुटका केली.
इ. स. ९४५ त बेरेंगर नांवाच्या एका मांडलिकानें इटलीमध्यें जाऊन तेथील बराचसा भाग जिंकला. ९५० मध्यें इटलीचा राजा निवर्तल्यामुळें त्याची बायको अॅडेलेड इच्याशीं लग्न करण्याची बेरेंगरनें इच्छा दर्शविली. अॅडेलडेनें ओट्टोला ही सर्व हकीकत कळवून त्याच्याजवळ मदतीची याचना केली. ओट्टोनें लगेच इटलीवर स्वारी करून लाँबर्ड आपल्या ताब्यांत घेतलें; व अॅडेलेडच्या संमतीनें तिच्याशीं विवाह केला. बेरेंगर हाहि शरण येऊन त्यानें इटलीचा राजा या नात्यानें ओट्टोचें मांडलिकत्व पत्करलें. ओट्टोचा भाऊ हेनरी याला लुडॉल्फ नांवाचा मुलगा होता. ओट्टो हा निपुत्रिक असल्यामुळें ओट्टो व हेनरी यांच्या पश्चात त्यालाच राज्यपद मिळावयाचें ठरलें होतें. पण अडेलेडाला आतां ओट्टोपासून पुत्र झाल्यामुळें लुडाल्फचें धाबें दणाणलें. त्यानें लगेच लोरेनचा ड्यूक कॉन्राड व मेंझचा फ्रेड्रिक यांच्या साहाय्यानें अकस्मात बंड उभारून ओट्टोला कैद केलें. पण ओट्टोनें त्यांचें म्हणणें मान्य करून युक्तीप्रयुक्तीनें आपली सुटका करून घेतली. नंतर त्यानें या दोघांचीहि जहागीर जप्त केली.
याच सुमारास मग्यार लोकांनीं बंड केल्यामुळें ओट्टोला त्यांच्यावर स्वारी करणें भाग पडलें. ९५५ मध्यें लीचफील्ड येथें त्यांचा ओट्टोनें पराभव केला व त्याच वर्षीं स्लाव्ह लोकांचीहि रग जिरविली व अशा रीतीनें सरहद्दीवरील सर्व धुमाकूळ नाहींसा करून टाकला. मांडलिक राजांच्या बंडखोर स्वभावानें त्रासून जाऊन ओट्टोनें पोपशीं सख्य करण्याचें ठरविलें. त्यानें निरनिराळ्या उपाध्यायांनां जहागिरी दिल्या व मॅगडेबर्ग येथें मुख्य धर्माध्यक्षाचें पीठ स्थापन केलें. याच सुमारास इटली येथील बेरेंगर राजानें पोपला उपद्रव देण्यास सुरूवात केल्यामुळें पोपच्या विनंती वरून ओट्टोनें रोमवर स्वारी केली. तेथें पोपनें त्याला रोमचा बादशहा म्हणून राज्याभिषेक केला व राजनिष्ठेची शपथ घेतली. पण थोडकाच काळ लोटल्यावर पोप हा गुप्त कट करूं लागला. तेव्हां ओट्टोनें धर्मगुरूची सभा बोलोवून या पोपला पदच्युत केलें व त्याच्या जागीं आठवा लिओ याला पोप नेमलें. एवढ्यावरच ओट्टो थांबला नाहीं तर त्यानें आपल्या संमतीशिवाय कोणत्याहि धर्मगुरूला पोप नेमण्याचा अधिकार नाहीं असें रोमन लोकांकडून कबूल करून घेतलें. ग्रीक व सॅरासन लोकांनीं दक्षिण इटलीमध्यें बंडाळी सुरू केल्यामुळें, त्यांनांहि हात दाखविण्याचा त्यानें प्रथम निश्चय केला. पण नंतर तो बदलून त्यानें त्यांच्याबरोबर तह करण्याविषयीं मध्यस्ती करण्याकरितां एका धर्मगुरूला पाठविलें. पण ग्रीक व सॅरासन लोकांनीं ती विनंती झिडकारिली पण पुढें ग्रीसवर नवीन राजा बसल्यामुळें त्यानें ओट्टोशीं सख्य केलें व ओट्टोच्या मुलाला आपली मुलगी देऊं केली. अशा रीतीनें सर्वत्र शांतता झाल्यावर ओट्टो हा जर्मनीस परत आला. पण तेथें जाऊन थोडे दिवस लोटतात न लोटतात तोंच तो आकस्मिक रीतीनें मरण पावला. त्याला मॅगडेबर्ग येथें पुरण्यांत आलें.
ओट्टो हा अत्यंत धडाडीचा व चिकाटीचा मनुष्य होता. चर्चच्या सत्तेला आपल्या ताब्यांत आणून त्यानें आपल्या साम्राज्याला बळकटी आणिली. एकछत्री साम्राज्य स्थापण्याची त्याची महत्त्वकांक्षा असल्यामुळें त्यानें सर्व स्वतंत्र संस्थानांनां आपलें मांडलिकत्व पत्करावयास लाविलें. तो स्वत:फारसा विद्वान नसला तरी त्यानें आपल्या पदरीं अनेक विद्वानांनां आश्रय दिला होता. त्याचा स्वभाव जात्या दिलदार असून तो मृदु अंत:करणाचा होता. ख्रिश्चन धर्माचा त्यानें आपल्या कारकीर्दींत पुष्कळ प्रसार केला.