विभाग नववा : ई-अंशुमान
ओडोनेल हेनरी जोसेफ (१७६९-१८३४)-हा बॉयनेच्या लढाईनंतर आयर्लंड सोडून स्पेनमध्यें गेलेल्या ओडोनेलांचा वंशज होता. याचा जन्म स्पेनमध्यें झाला. पुढें मोठा झाल्यावर त्यानें स्पेनच्या लष्करी खात्यांत नोकरी धरली. १८१० मध्यें तो जनरल होऊन कॅटेलोनियामधील लष्कराचा अधिकारी झाला येथेंच असतां त्याला फील्ड मार्शल हा किताब मिळाला. १८२३ त स्पेन सोडून त्यास फ्रान्समध्यें जावें लागलें. येथेंच तो १८३४ त मरण पावला.
२ याचा मुलगा लिओपोल्ड ओडोनेल (१८०९-१८६७) याचा जन्म सन्टाक्रूझ येथें १२ जानेवारी १८०९ रोजीं झाला. हा ख्रिश्चानिया राणीच्या सैन्यांतील एक अंमलदार होता. याचें एस्पॅर्टेरोच्या विरूद्ध १८४३ त झालेल्या राज्यक्रांतींत अंग होतें. १८४४-४८ पर्यंत यानें क्यूबामध्यें चाकरी बजावली. पुढें परत आल्यावर याला सेनेटचा सभासद नेमलें. १८५४ त हा युद्धमंत्री झाला. १८५६ त यानें मुख्य प्रधानपद मिळविलें. १८५९ त याला मोरोक्कोच्या मोहिमेवर पाठविलें, व टेटूअन शरण आल्यावर ड्यूक केलें. १८६६ त याला आपल्या जागेचा राजीनामा द्यावा लागला. हा ५ नोव्हेंबर १८६७ रोजीं मरण पावला.