विभाग नववा : ई-अंशुमान
ओतारी - ओतकाम करणारांची एक जात. यांची वस्ती वर्हाड-मध्यप्रांतांत फार आहे. १९११ च्या खानेसुमारींत सबंध हिंदुस्थानांत ३१२१ ओतारी नोंदले गेले आहेत. पैकीं वर्हाड-मध्यप्रांतांतच २६३४ होते. तेथें त्यांचे गोंडाद्य व मराठे असे दोन भेद पडतात. या दोहोंत रोटी व बेटी व्यवहार होत नाहींत. मुं. गॅझेटियरवरून पहातां पुणें, सातारा व खानदेश या जिल्ह्यांतून त्यावेळीं १८८५ ओतारी होते असें दिसतें. त्यांची सविस्तर माहितीहि दिली आहे (पु. १८ भा. १) ओतारी आपण क्षत्रीय आहों असें सांगतात. यांच्यांत पोटभेद नाहींत. त्यांचीं आडनांवें म्हणजे अहीर, बेद्रे, धनगर, गोटपागर, मगरघाट आणि महाडिक एकाच आडनांवाच्या माणसांत लग्नें होत नाहींत. हे मराठे शेतकर्याप्रमाणें दिसत असून मराठी भाषा बोलतात. दसर्याच्या दिवशीं तुळजापूरच्या अंबाबाईला बकरा बळी देतात. पैठणची काल्कादेवी ही त्यांची कुलस्वामीनी होय. घरांत बहिरोबा, भवानी, धनाई, जनाई, खंडोबा, मारूती व नागजी यांची पूजा करितात. देशस्थ ब्राह्मण यांचें उपाध्ये असतात. मराठे, महार वगैरेंच्या बायका जीं जोडवीं घालतात तीं ओतार्यांनींच केलेलीं असतात. कांहीं ओतारी देवांच्या मूर्ती ओततात. राक्षसविवाहाचा कांहीं अवशेष यांच्यांतच आहे असें म्हणतात. एखाद्याच्या मुलीला मागणी घालून त्यानें ती दिली नाहीं तर तिला पळवून नेण्यांत येतें; पुढें तिच्या बापास भरपाईदाखल कांहीं देण्यांत येतें. [मुं गॅ. रसेल आणि हिरालाल-कास्ट्स अँड ट्राईब्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया. सेन्सस रिपोर्ट १९११ पु. १ भा. २].