विभाग नववा : ई-अंशुमान
ओनेगा - हें सरोवर विस्तारांत लाडोगाच्या खालोखाल आहे. सर्व यूरोपांत याचा दुसरा नंबर लागतो. हें रशियांत असून स्व्हर नदीवाटे याचें पाणी लाडोगांत जाऊन पडतें. आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे हे पसरलेलें असून याचा दक्षिणभाग आकारांत व स्वरूपांत व्यवस्थित आहे. परंतु उत्तरभागांत लहान मोठीं बेटें, आखातें, अर्धवट बुडालेले खडक यांची पूर्ण समृद्धि आहे. वायव्य किनार्यावर काळे व ठिसूळ स्लेट दगड आहेत. पूर्व किनार्यावर ग्रेनाइट आढळतो. एके ठिकाणीं तर डायोरिट व डोलोमाइट हेहि दगड सांपडतात. हें सरोवर समुद्रसपाटीपेक्षां १२५ फू. वर आहे. जास्तींत जास्त खोली ३१८ ते ४०८ फूट इतकी आहे. पूर्वेकडून व्होड्का, अॅन्डोमा, व्हिटेग्रा, या नद्या येऊन यास मिळतात. ओनेगा कालवा (४५ मै. लांब) १८१८-५१ त दक्षिण किनार्याच्या बाजूनें काढला आहे. हा स्व्हर व व्हीटेग्रा या दोन नद्या जोडतो. अर्ध्या मे पासून ते अर्ध्या डिसेंबरपर्यंत यांत बर्फ नसतें. मार्चच्या प्रारंभीं पृष्ठभागाची सपाटी बरीच खालीं असते. ती जूनमध्यें २ फू. चढते. या सरोवराच्या भोंवती तुरळक वस्ती आहे. हे लोक इमारतीचें लाकूड, मासे व खनिज पदार्थांचा व्यापार इ. धंदे करतात.