विभाग नववा : ई-अंशुमान
ओब्रायन वुइल्यम स्मिथ (१८०३-१८६४).- हा प्रख्यात देशभक्त व मुत्सद्दी सर एडवर्ड ओब्रायन याचा मुलगा होता. याच्या घराण्याचा मूळपुरूष आयर्लंडचा राजा बोरोइम्हे हा होता. ओब्रायन हा क्लेअरपरगण्यामध्यें १७ आक्टोबर १८०३ रोजीं जन्मला. त्याचें शिक्षण हॅरो व केंब्रिज येथें झालें. १८२८ मध्यें तो पार्लमेंटमध्यें एनिस परगण्यातर्फें निवडून आला. आणि १८३५ पासून १८४८ पर्यंत लिमरिक परगण्यातर्फे निवडून आला. ओकोनेलनें चालू केलेली (कॅथोलिक लोकांच्या उद्धारार्थ) चळवळ ही त्याला पसंत होती. तरी पण इतर पुष्कळ बाबतींत त्याचें व ओकोनेलचें पटत नव्हतें. सन १८४३ सालच्या हत्यारांच्या कायद्याविरूद्ध (आयरिश आर्म्स अॅक्टविरूद्ध) चळवळ करण्याकरितां तो ओकोनेलच्या ‘रिपील अॅसोसिएशन’ च सभासद झाला. ओकोनेलच्या खालोखाल ओब्रायन हाच लोकप्रिय पुढारी होता. व या दोघांच्याहि परिश्रमानें ही चळवळ हां हां म्हणतां जिकडे तिकडे पसरली. पण पुढें ओकोनेलच्या वर्तनामुळें हा व याचे इतर स्नेही फुटून त्यांनीं १८४६ सालीं एक तरूणपक्ष स्थापन केला (ओकोनेल पहा). पुढें दुष्काळादि आपत्तीनीं आयर्लंडांतील लोक गांजले व त्यामुळें आयर्लंडमध्यें बंडाळी सुरू झाली. ओब्रायन यानें पॅरिस येथें जाऊन फ्रेचांची कुमक मिळविण्याची खटपट केली पण त्यांत यश आलें नाहीं. १८४८ सालीं राजद्रोहाबद्दल त्याच्यावर खटला करण्यांत आला पण ज्यूरीमध्यें मतभेद होऊन तो सुटला. पुढें पार्लमेंटनें दडपशाहीचे नवीन कायदे सुरू केल्यामुळें ओब्रायन, डिलर वगैरे पुढार्यांनीं लोकांनां बंड करण्याचा उपदेश केला. स्वत:ओब्रायननें त्या बाबतींत पुढाकार घेऊन माणसें व हत्यारें जमविण्यास सुरूवात केली; व बॅलिंगारीच्या शेतकरी वर्गाच्या सहाय्यानें बंडाळी उभारण्याचा निश्चय केला. प्रथम प्रथम त्याला पुष्कळ लोक मिळाले; पण चळवळीमध्यें जितकी संघटना पाहिजे तितकी नसल्यामुळें व जरूर तितका पैसा न मिळाल्यामुळें लोक फुटूं लागले व आपल्यावर शत्रू चाल करून येत आहे एवढ्या नुसत्या बातमीनेंच बरेच लोक पळून जाऊ लागलें. अशा रीतीनें एक दोन दिवसांतच हें बंड मोडलें. ओब्रायननें पळून जाऊन आपला बचाव केला. पुढें तो पकडला जाऊन त्याच्यावर खटला करण्यांत आला व त्याला फांशीची शिक्षा फर्मवण्यांत आली. पण पुढें ती रद्द होऊन त्याला काळ्या पाण्याची शिक्षा देण्यांत आली. ‘आयर्लंडला परत जाऊन मी पुन:कांहींहि करणार नाहीं’ अशी त्यानें शपथ घेतल्यामुळें १८५४ मध्यें त्याची सुटका झाली व १८५६ मध्यें पुष्कळांबरोबर यालाहि पूर्ण माफी मिळाली व तो आयर्लंडला परत आला. १८५६ मध्यें त्यानें ‘राज्यकारभाराचीं तत्त्वें अथवा हद्दपारींतील विचार’ (प्रिन्सिपल्स ऑफ गव्हर्नमेंट ऑर मेडिटेशन्स इन एक्झाइल) हा ग्रंथ लिहिला. आयर्लंडांत आल्यानंतर त्यानें कांहीं विशेष कामगिरी केली नाहीं. पण एक वर्षपर्यंत अमेरिकेमध्यें हिंडून त्यानें आयर्लंडविषयीं खरी माहिती लोकांनां समजावून दिली. तो १८ जून १८६४ सालीं बँगार येथें मरण पावला. त्याला पांच मुलगे व दोन मुली अशीं सात अपत्यें होतीं.
ओब्रायनच्या अंगीं जरी नांवाजण्यासारखें वक्तृत्व नव्हतें तरी पण आयर्लंडांतील इंग्रजी अधिकार्यांविरूद्ध त्यानें आपली चळवळ सुरू केल्यामुळें तो लोकप्रिय पुढारी बनला. तो स्वभावानें मनमिळाऊ व उदार असल्याकारणानें लोकांचें त्याच्यावर फार प्रेम असे. तो स्वार्थत्यागी देशभक्त होता. आजन्म देशसेवेमध्यें त्यानें आपलें आयुष्य खर्चीं घातलें. लेकी यानें ओब्रायनविषयीं आपलें फार चांगलें मत दिलें आहे. तो म्हणतो कीं, ओब्रायनच्या हातून जरी एक दोन चुका झाल्या तरी त्याच परिस्थितींत दुसरा कोणी असतां तरी त्यानें तेंच केलें असतें. तो हाडाचा स्वार्थत्यागी होता. त्याला देशभक्तीची वल्गना करणार्या लोकांची व तसेंच स्वत:च्या पोटाची खळगी भरण्याकरतां देशाचें नुकसान करण्यास तयार असलेल्या लोकांची फार चीड असे.