विभाग नववा : ई-अंशुमान
ॐ (ओम् ) - या अक्षराचा उद्भव कसा झाला असावा याबद्दल निश्चित अशी कांहींच उपपत्ति लागत नाहीं. “ॐ” या अक्षराचा उद्भव कसा झाला असावा ह्याबद्दल मॅक्समुलर ह्या प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञाच्या मतें “अव्” ह्या सार्वनामिक मूलरूपापासून हें अक्षर उत्पन्न होऊन “अवम्” ह्याचें संप्रसारण क्रियेनें “अउम्” असें रूप होऊन त्याच्यापासून सामान्य ध्वनीच्या संधिनियमाप्रमाणें “ॐ” अक्षर बनलें.
परंतु बोथलिंग व राथ ह्या दोघां शास्त्रज्ञांनीं शास्त्रीय पुराव्याच्या अभावीं वरील उपपत्ति त्याज्य ठरविली. ह्यांच्या मतें “ॐ” वर्ण “ओ” ह्या ध्वनीचें सानुनासिक असें उद्गारस्वरूप असून “आ” ह्या ध्वनीशींहि त्याचा संबंध आहे. ह्या उपपत्तीस वैदिक ग्रंथांतहि असा पुरावा सांपडतो कीं “ॐ श्रावय” ह्या वैदिक वाक्याबद्दल सूत्रग्रंथांत वारंवार “ओश्रावय” व “आश्रावय” हीं वाक्यें वापरण्यांत येतात, आणि उच्चार करतांना ध्वनींनां अनुनासिकत्व प्राप्त होणें ही वैदिक भाषेची सर्वमान्य रूढी आहे. प्रणव या ॐ कारवाचक संज्ञेपासूनहि कदाचित ह्या वर्णाच्या उत्पत्तीवर प्रकाश पडण्याचा संभव आहे. कारण श्रौतांत “पुरोनुवाक्या” मंत्र म्हणत असतां शेवटच्या अक्षराचा दीर्घ सानुनासिक उच्चार करणें व त्यांत “ओ” हा वर्ण मिळविणें असा प्रणव ह्या संज्ञेचा मूलार्थ आहे आणि ह्यावरूनच प्रणव संज्ञेनें दिग्दर्शित केलेला “ॐ” वर्ण उत्पन्न झाला असावा. व पाणिनीकृत अष्टाध्यायींतील “ओमाङोश्च” (पाणिनी ६. १, ९ ५) सूत्रामध्येहि असाच नियम घालून दिला आहे कीं “ॐ” पूर्वींचा र्हस्व किंवा दीर्घ अ यांत “अउम्” असा बदल न होतां ॐ कारच कायम राहून पूर्वींचा ‘अ’ नाहींसा होतो.
ॐ हा उद्गारवाचक वर्ण फार प्राचीन नाहीं. हा उत्तरकालीन वैदिक वाङ्मयांतच दिसूं लागतो. ऋग्वेद व अथर्व वेद या दोन्ही वेदांत हा आढळत नसून प्राचीन यज्ञप्रकरणीं व मंत्रतंत्र वगैरे लौकिक गोष्टींत हा प्रणव प्रचारांत असल्याचें दिसत नाहीं. तैत्तिरीय संहितेंतील कोणत्याहि मंत्रांत ॐ आला नसून फक्त एकदांच “प्रणव” या संज्ञेचा उल्लेख आला आहे; व त्या ठिकाणचा अर्थ उपरिनिर्दिष्ट पाणिनी सूत्राप्रमाणें आहे. वाजसनेयी संहितेमध्येंहि हा (२-१३) “ॐ प्रतिष्ठ” ह्या वाक्यांत आढळतो. त्याचप्रमाणें मैत्रायणी संहितेंत (४. १,११) “ॐ श्रावय” या वाक्यांत व दुसर्या ठिकाणीं ॐ कार आला आहे. परंतु ॐ वर्णाचा वाक्यांत प्रतिज्ञापूर्वक विधान म्हणून उपयोग प्रथम ब्राह्मण ग्रंथांतच दिसून येतो. यज्ञप्रसंगीं होकारार्थी ॐ चा उपयोग शतपथ ब्राह्मणामध्यें सामान्यत: पुष्कळ वेळां करण्यांत आला आहे.
परंतु ह्यापेक्षां ‘सर्व वेद व सर्व लोक ह्या सर्वांचा दर्शक’ ह्या गूढार्थांनें ॐ काराचा करण्यांत आलेला उपयोग जास्त महत्त्वाचा आहे. ह्या दृष्टीनें पाहतां प्रथम ऐतरेय ब्राह्मणामध्यें असें म्हटलेलें आढळतें कीं ॐ हा स्वर्गलोक व सूर्यलोक असून अ उ म् अशीं तीन अक्षरें तदंतर्गत आहेत. व हीं तीन अक्षरें ‘भू:भुव:स्व:’ या ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या तीन वेदांपासून उत्पन्न झालेल्या तीन व्याहतीपासून निघालीं आहेत. अशाच प्रकारचे गूढविचार उपनिषद् ग्रंथांत जास्त प्रमाणांत परिणत झाले आहेत. परंतु गोपथ ब्राह्मणापूर्वींच्या दुसर्या कोणत्याहि ब्राह्मणग्रंथांत अशा प्रकारचे प्रणवसंबंधीं गूडविचार आढळून येत नाहींत हे विशेष आहे.
उपनिषदांपैकीं तौत्तिरीय उपनिषद (१.८) यामध्यें ‘ॐ हें ब्रह्म असून सर्व जगाची उत्पत्ति, स्थिति व लय ब्रह्माच्या आश्रयानेंच चालू असतात असें म्हटलें आहे. कठोपनिषदांत म्हटलें आहे कीं:-
“सर्वे वेदा यत्पदमामनंति तपांसि सर्वाणि च यव्ददंति |
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरंति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत् ||
“सर्व वेद ॐ पदाचीच घोषणा करितात व ह्या ॐ पदाकरितांच तपश्चर्या केली जाते” यापेक्षां गोपथ ब्राह्मणांतील प्रणवोपनिषदांत ॐ काराच्या या गूढार्थांची पूर्ण परिणति झालेली आहे. वर ऐतरेयब्राह्मणांत वर्णन केल्याप्रमाणें ह्या गोपथब्राह्मणांतहि असेंच म्हटलें आहे कीं ॐ मधील ‘व्’=(ओ) कारापासून आप, चंद्र, अथर्ववेद, व अनुष्टुभ छंद उत्पन्न झाले. त्याचप्रमाणें ‘म्’ वर्णापासून इतिहासपुराणें व इतर सारस्वत, नाना प्रकारचीं वाद्यें, गीत व नृत्य, बृहती छंद निर्माण झाले. गोपथ ब्राह्मणांत ॐ कारा बद्दल दुसरी एक आख्यायिका आली आहे. तीमध्यें म्हटलें आहे कीं, एकदां असुरांनीं देवांचा पराभव केला त्यावेळीं देवांनीं ॐकारा आपला अग्रणी करून असुरांचा विध्वंस केला. यासाठीं कोणताहि ऋक्, यजु, किंवा साम मंत्र म्हणतांना पूर्वी प्रणवोच्चार केला पाहिजे असा नियम केला. त्याच ठिकाणीं असेंहि म्हटलें आहे कीं, निरनिराळ्या वेदांत प्रणवोच्चार निरनिराळ्या प्रकारें करावयाचा व या प्रणवाच्या चार मात्रा ब्रह्मा, विष्णु, ईशान व शर्व ह्या चार परमेश्वर विभूतींच्या निदर्शक होत.
उत्तरकालीन अथर्ववेदांतर्गत उपनिषदांत ह्या प्रणवाचें महत्त्व इतकें वर्णिलें आहे कीं, “एकवेळ वेदाध्ययन देखील प्रणवध्यानापुढें तुच्छ आहे” असा एकंदर वर्णनाचा रोख दिसतो तरी देखील प्रणवध्यान हें एक कनिष्ठ प्रतीचें साधन आहे हें जागजागीं सांगितलें आहे.
उपनिषदांतील प्रणवाच्या गूढार्थपर विकासाबरोबरच श्रौतसूत्रांमध्यें प्रणवाच्या यज्ञसंबंधीं उपयोगाचे विवेचन आलें आहे. ऋग्वेद प्रातिशाख्यामध्यें ॐकार होकारार्थी योजलेला आढळतो व वाजसनेयी संहितेमध्यें ॐ या वर्णाचा अर्थ भाषेंतील “अथ” शब्दासारखा असल्याबद्दल म्हटलें आहे.
धर्मसूत्रांमध्यें ॐकाराचा उपयोग निराळ्या तर्हेनें केलेला दिसतो प्राचीन अशा बौधायन धर्मसूत्रांत म्हटलें आहे कीं प्रत्येक त्रैवर्णिकानें दररोज प्रणवोच्चारपूर्वक सव्याहृति असें वेदाध्ययन करावें, व ह्यलाच “ब्रह्मयज्ञ” असें म्हणतात. त्याचप्रमाणें वानप्रस्थाश्रमीयास वेदपठणाचा अधिकार सांगितला आहेच, परंतु त्याबरोबर वेदवृक्षाचें मूळ असा जो प्रणव त्याचें केवळ ध्यान केलें असतांहि त्याला ब्रह्मप्राप्ति होईल असें म्हटलें आहे. त्याचप्रमाणें वसिष्ठधर्मशास्त्र, मनुस्मृति यांमध्यें प्रायश्चित्तप्रकरणांत प्रणवोच्चारास जास्त महत्त्व दिलें आहे. दररोज प्रणवोच्चारपूर्वक व सव्याहति सोळा प्राणायाम महिनाभर केले असतां ब्रह्महत्येचा दोषहि निघून जातो, इतकें प्रणवोच्चारपूर्वक होणार्या प्राणायामास महत्त्व आलें आहे. त्याचप्रमाणें प्राचीन अभिचार इत्यादिकांचें भांडार असें जें कौशिक सूत्र त्यामध्यें आलेल्या उल्लेखांवरून आभिचारांत देखील प्रणवास किती महत्त्व आलें होतें हें सिद्ध होतें.
भारतीय तत्त्वज्ञानात्मक वाङ्मयांत, ब्रह्मप्राप्ति होण्याकरितां ध्यान करण्यास ॐ हें एक साधन सांगितलें आहे. भगवद्गीतेंत ॐ म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णस्वरूप (ब्रह्मच) होय असें म्हटलें असून, “ॐ तत् सत्” हा ब्रह्माचाच त्रिविध निर्देश होय” असें म्हटलें आहे. बादरायण सूत्रांत (४.३,१४) प्रणवध्यानाची योग्यता परब्रह्म प्राप्ति करून देणारी नसून अवांतर फल देणारी आहे असें म्हटलें आहे, परंतु हें सूत्रकाराचें मत प्रश्नोपनिषदाविरूद्ध आहे, कारण प्रश्नोपनिषदांत तर असें स्पष्ट म्हटलें आहे कीं “प्रणवाच्या तिन्ही मात्रांचें ध्यान करणारा मनुष्य देवयान मार्गानें जाऊन ब्रह्मैक्य पावतो.” परंतु प्रणवाविषयीचें हें मत तत्त्वज्ञानांत रूढ झाल्याचें दिसत नाहीं
पातंजल योगसूत्रांत मात्र (१.२७,२९) ‘तस्य वाचक:प्रणव:” इत्यादि सूत्रांमध्यें प्रणव हा ईश्वराचा वाचक वर्ण होय असें स्पष्ट म्हटलें आहे, व ह्या प्रवणाची पुन:पुन: आवृत्ति करावी व प्रणवाच्या अर्थाचें सतत अनुसंधान करावें, कारण त्या योगानें यथार्थ तत्त्वज्ञान होतें असें स्पष्ट सांगितलें आहे. ह्यानंतर एकंदर योगदर्शनांत प्रणवाचें महत्त्व फारच वाढलें आहे.
प्रवणाच्या रोजच्या धार्मिक व्यवहारांतील उपयोगाचा विचार करतां असें दिसून येतें कीं एकंदर सर्व भारतीय धार्मिक गोष्टींत वैदिक किंवा लौकिक मंत्राबरोबर प्रणवोच्चाराचा अत्यंत महत्त्वपूर्वक उपयोग केला जातो. हिंदूंच्या धार्मिक कृत्यांतील अत्यंत महत्त्वाचा जो गायत्रीमंत्र त्याजबरोबर प्रणव व व्याहृतींचा उच्चार करावा लागतो, त्याचप्रमाणें विविध तांत्रिक मत्रांतहि प्रणवोच्चार आवश्यक होऊन बसला आहे. प्रणवाच्या ह्या लोकप्रियतेचें कारण थोडेंबहुत प्रणवांतर्गत अ, उ, व म ह्या तीन वर्णांशीं ब्रह्मा, विष्णु व महेश ह्या देवतात्रयाचें साधर्म्य दाखविलें जातें ह्या एका गोष्टीवर अवलंबून आहे. अशा रीतीनें प्रणवाची लोकप्रियता एकंदर धर्मकर्त्यांस दिसून येते तरी देखील महाशिवरात्रीसारख्या उत्सवप्रसंगीं ज्यावेळीं कनिष्ठ जातीचे लोकहि समानदर्जानें धार्मिक कृत्यांत भाग घेतात, व ज्यावेळीं स्त्रियांनां देखील मंत्रोच्चार करण्याचा अधिकार आहे, अशा वेळीं प्रणवोच्चाराचा मात्र त्यांच्या बाबतींत ॐकाराच्या अत्यंत पावित्र्यामुळें पूर्ण निषेध केला आहे. इ. स. ६ व्या शतकापासून महत्त्वाच्या हस्तलिखित ग्रंथांत व धर्मग्रंथांत मंगलप्राप्तीकरितां प्रणवपूर्वक ग्रंथारंभ केलेला आढळतो.
जैनधर्म व बौद्धधर्म ह्या दोन्हींच्या दृष्टीनें ॐ ह्याचा उपयोग करणें म्हणजे ब्रह्मकारणवाद स्वीकारणेंच होय असें प्रथम प्रथम मानण्यांत येत असे. परंतु पुढेंपुढें प्रणवाच्या लोकप्रियतेचा इतका जोरदार परिणाम झाला कीं अवलोकितेश्वर नांवाच्या बौद्ध देवतेच्या सुप्रसिद्ध “ॐ मणिपद्मेहुम्” या मंत्रांत प्रणवाचा अत्यवश्य रीतीनें अंतर्भाव करण्यांत आला. त्याचप्रमाणें ओरिसामधील सोळाव्या शतकांतील गूढार्थवादी बौद्धधर्मांत शून्यापासून प्रणव उत्पन्न झाल्याचें सांगून त्यापासून पुढें विश्वोत्पत्ति झाल्याचें वर्णन आहे. ह्याठिकाणीं प्रणवाचें शून्यतत्त्वाशीं सादृश्य दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
पुराणग्रंथांमध्यें ॐकाराचा भिन्नभिन्न सांप्रदायिकांनीं आपापल्या विशिष्ट तर्हेनें विशिष्ट देवतापर उपयोग केलेला आहे. उदाहरणार्थ लिंगपुराणांत शिवलिंगाचें महत्त्व ब्रह्मा, विष्णूपेक्षां जास्त वर्णिलेलें असून त्याजवर प्रणवाक्षर असल्याचें वर्णिलें आहे. ह्याच्या विरूद्ध दुसर्या पुराणांतून त्र्यक्षरात्मक प्रणव विष्णु, श्री व भक्त ह्या तिहींचा द्योतक असल्याबद्दल वर्णन आहे, त्याचप्रमाणें प्रणव म्हणजेच तीन वेद, तीन लोक, तीन अग्नी, तीन विष्णूचीं पाउलें असून प्रणवध्यानापासून पूर्णब्रह्मप्राप्ति होते असें सांगितलें आहे