विभाग नववा : ई-अंशुमान

ओम्स्क - एक रशिअन शहर. हें आकमोलिंस्क प्रांताचें राजधानीचें शहर आहे. १९०० सालीं याची लोकसंख्या ५३०५० होती. सायबेरियांतील कोसॅक्स लोकांवर येथूनच राज्य करण्यांत येत असे. या ठिकाणीं बिशपहि राहतो. हें इर्टिश नदीच्या दक्षिणतीरावर वसलें आहे. येथील हवा रूक्ष व साधारण समशीतोष्ण आहे. वार्षिक पर्जन्यवृष्टि १२.४ इं. इतकी आहे. या ठिकाणीं एक शिक्षणसंस्था आहे. या संस्थेनें पुस्तकसंग्रहालयें स्थापिलीं असून व्याख्यानद्वारें ती लोकांनां शिक्षण देते. त्याचप्रमाणें, नाट्य, औषध, संगीत इत्यादि शास्त्रविषयक संस्थाहि आहेत.