विभाग नववा : ई-अंशुमान
ओरछा. सं स्था न.- बुंदेलखंड एजन्सी खालील मध्यहिंदुस्थानांतील एक संस्थान. क्षेत्रफळ २०८० चौ. मै. उत्तरेस व पश्चिमेस संयुक्त प्रान्ताचा झांशी जिल्हा; दक्षिणेस मध्यप्रांताचा सागर जिल्हा, बिजावर व पन्ना संस्थानें; पूर्वेस चरखारी व बिजावर संस्थानें आणि गरौली जहागीर. ह्या संस्थानांत औरंगाबादजवळील पाहारपूर परगण्याचा समावेश होतो. पूर्वी ओरछा हेंच राजधानीचें शहर होतें; पण १७८३ पासून टिकमगड हें राजधानीचें शहर करण्यांत आलें. बेटवा धसान दुआबामधील सपाट प्रदेशांत हें संस्थान आहे. बलदेवगड, लधौरा, जटार व बिर्सागड येथें मोठे मोठे तलाव आहेत.
बराच भाग जंगलमय आहे. पण जंगल विरळ असल्यामुळें चांगली शिकारें सांपडत नाहीं. माळव्यापेक्षां येथील हवा उष्ण आहे. उत्तर भागांतील हवा रोगट असून मलेरिया नेहमीं असतो. पावसाचें मान ४५ इंच. ओरछाचे संस्थानिक राजे हे बनारसच्या गहरवारचे वंशज असून जातीनें बुंदेले रजपूत आहेत. १३ व्या शतकांत कोणी सोहनपालानें येथें येऊन आपली सत्ता स्थापित केली. त्याचा पिता अर्जुनपाल याशीं त्याचें पटत नव्हतें म्हणून तो घरून निघाला असावा. तो गढकुरारच्या खंगार राण्याविरूद्ध लढला होता. सोहनपालानें खंगारांचा पराजय करून गडकुरार येथें आपलें राज्य स्थापिलें. ह्यानें आपली मुलगी पवानीय अधिपती पोंवार यास दिली. एव्हांपासून पोंवार, बुन्देले व धन्डेले हे एकमेकांशीं मिळून मिसळून वागूं लागले. पित्याच्या मरणानंतर सोहनपालास महोनी संस्थानाची गादी मिळाली. १२६९ ते १५०१ चे दरम्यान आठ राण्यांनीं राज्य केलें. ह्यांपैकीं प्रत्येकानें राज्यविस्तार केला. १५०१ मध्यें रूद्रप्रताप गादीवर आला. हा मोठा धाडशी स्वभावाचा होता. त्यास बहलोल व शिकंदर लोदीशीं वैमनस्य करण्याचे बरेच प्रसंग आले होते व बाबरच्या स्वार्यांच्या धामधुमीच्या कालांत त्यानें आपला राज्यविस्तार केला. तो १५३१ सालीं मृत्यु पावला व त्याच्या पश्चात त्याचा ज्येष्ठ पुत्र भारतीचंद हा गादीवर आरूढ झाला. शीरशाहनें ज्या वेळीं (१५४५) कालींजरवर स्वारी केली तेव्हां भारतीचंदानें त्यास अडथळा केला. पण त्यांत त्यास यश आलें नाहीं १५५४ मध्यें त्याच्या मरणानंतर त्याचा कनिष्ठ बंधू मधुकरशाह हा गादीवर आला व येथपासून ह्याच्या राज्यास उतरती कळा लागली. मोंगलांनीं ओरछा संस्थानावर पहिल्यानें १५७७ सालीं स्वारी केली. त्यावेळीं सदिकखान ह्यानें जोराचा हल्ला करून ओरछा घेतलें. ह्या चकमकींत मधुकराचा ज्येष्ठ पुत्र होरलदेव मारला गेला. १५९१ मध्यें बुंदेले राण्यानें ग्वाल्हेरजवळील कांहीं परगणे हस्तगत केले. पण नरवरजवळ मोंगल सैन्यानें त्याचा पराभव केला. तदनंतर मधुकर हा अरण्यांत पळून गेला व तिकडेच मरण पावला. त्याचा पुत्र रामसाह (१५९२-१६०४) हा शरण गेला. पण रामसाह हा दुर्बल असल्यामुळें त्याचे बंधू सिहदेव, इंद्रजित व प्रताप ह्यांनीं त्यास फार त्रास दिला. ग्वाल्हेर संस्थानांत अन्त्रि येथें १६०२ मध्यें ‘ऐनी अकबरी’ चा प्रसिद्ध लेखक अबुल फजल ह्याचा वीरसिंहदेवानें सलीमच्या सांगण्यावरून खून केला. अकबरानें त्याला पकडण्याकरितां तात्काळ सैन्य पाठविलें. पण जरी त्याच्या सैन्यानें ओरछा संस्थान काबीज केलें तरी वीरसिंहदेव हा पळून गेला. १६०५ मध्यें जहांगिर हा गादीवर आल्या. नंतर त्यानें वीरसिंहदेव ह्यास ओरछाचा राजा नेमलें व रामशहा ह्यास चन्देरी व बानपूरची जहागिरी दिली. ओरछाच्या सर्व राज्यांत वीरसिंहदेवाची फार प्रसिद्धि आहे. गादीवर आल्यानंतर ह्यानें बराच राज्यविस्तार केला व संपत्ति मिळविली. हा योद्धा असून ह्यानें मोठमोठ्या इमारती बांधविल्या. ओरछा व दतिया येथील भक्कम राजवाडे व चतुर्भुज देवालय ह्यानेंच बांधलें. ओरछा येथील त्याच्या छत्रीवरून ह्या राजाची कलाप्रियता दृग्गोचर होते. ह्याच्या नंतर झुंजहारसिंग गादीवर आला; पण हा निर्बल असल्यामुळें सर्व राज्यांत अंदाधुंदी माजली. १६२८ मध्यें ह्यानें आपल्या राज्यांतून खानजहान लोदी पळून जात असतां त्याजकडे दुर्लक्ष केल्यामुळें ह्यावी फार नाचक्की झाली. पण १६३० मध्यें खानजहान जेव्हां परत संस्थानांतून जाऊं लागला तेव्हां झुंजहारसिंगनें त्याजवर हल्ला केला. झुजहारसिंगनें त्यास क्षमा करून त्यास दख्खनमध्यें नोकरीवर पाठविलें. आपल्या गैरहजीरींत आपल्या बायकोचा हरदौल नांवाच्या भावाशीं संबंध असल्यामुळें त्यानें हरदौलास वीष पाजलें. १६३४-३५ मध्यें झुजहारसिंगलनें बंडावा केला तेव्हां मोंगल सैन्यानें त्यावर हल्ला केला; त्यास व त्याच्या पुत्रास गोंडवणच्या जंगलांत हांकून लावलें व तेथें ते दोघेहि मारले गेले.
सन १६३५ ते १६४१ त ओरछा संस्थानांत सत्ताधारी राजाच नव्हता. त्यामुळें तें असून नसून सारखेंच होतें. या अवधींत बुंदेले ज्ञातीचे मुख्य दतिआचा राणा, चंदेरीचा राणा व पन्नाटा चंपतराय हे होते. सन १६४१ मध्यें वीरसिंहदेव ह्याचा पुत्र पहाडसिंग (१६४१-५३) ह्यास शहाजहाननें ओरछाच्या गादीवर अधिष्ठित केलें. त्याच्या नंतर चार राणे गादीवर आले. त्यांचीं नांवें. (१) सुजानसिंग (१६५३-७२) (२) इंद्रमणी (१६७२-७५) (३) जसवंतसिंग (१६७५-८४). (४) भगवंतसिंग (१६८४-८९). बुंदेलखंडच्या राजांनीं सार्वभौम मोंगल पादशहाची नोकरी इमानें इतबारें बजाविली व त्यास बदकशानवर स्वारी करण्यांत मदत केली. महाराजा उदोनसिंगा (१६८९-१७३५) च्या कारकीर्दींत मराठ्यांनीं बुंदेलखंडावर स्वार्या केल्या. १७२९ मध्यें छत्रसालनें पेशव्यास मदतीस बोलाविल्यावरून बुंदेलखंडाचा बराच भाग मराठ्यांकडे आला. उदोनसिंगानंतर पृथ्वीराज (१७३५-५२) गादीवर आला. ह्याच्या कारकीर्दींत तर सर्व राज्य मराठ्यांनीं बळकावलें. त्याच्या नंतर सानवतसिंगास (१७५२-६५) दुसर्या अलमगीर बादशहाकडून महेन्द्र हा किताब मिळाला. ह्याच्या नंतर हातीसिंग (१७६५-६८) हा गादीवर आला. हातीसिंगानंतर मानसिंग (१७६८-७५), त्याच्यानंतर भारतीचंद्र (१७७५-७६) त्याच्यानंतर विक्रमाजित-( १७७६-१८१७ ) असे अनुक्रमें राजे गादीवर आले.
विक्रमाजितानें ब्रिटिशांशीं १८१२ मध्यें तह करून मैत्री जोडली. १८१७ मध्यें त्याचा पुत्र धरमपाल हा गादीवर आला. पण तो १८३४ मध्येंच मरण पावला. नंतर ह्याचा चुलता तेजसिंह (१८३४-४१) हा गादीवर आरूढ झाला. याच्यानंतर सुजानसिंह (१८४१-५४) व सुजान सिंहानंतर हमीरसिंग आला (१८५४-७४). ह्यास १८६२ मध्यें दत्तक घेण्याची परवानगी मिळाली. याच्यानंतर ह्याचा बंधु प्रतापसिंह हा गादीवर आला. हाच सध्याचा राजा होय. १८८० मध्यें ह्यानें आपल्या संस्थानांत मालावरची जकात बंद केली. बंडाच्या सालीं ह्यानें सरकारास चांगली मदत केल्यामुळें ब्रिटिश सरकारनें ह्यास तहरौली परगण्याबद्दल त्याच्याकडे फिरत असलेली खंडणी माफ केली. येथील राजास “हिज हायनेस सरामद-इ-इ-राजाह-बुंदेलखंड महाराजामहेंद्र सवाईं बहाद्दर” हीं पदवी असून १७ तोफांची सलामी आहे
लोकसंख्या (१९११) ३३००३२ टिकमगड हा राजधानीचा गांव असून खेडीं ७६३. भाषा बुंदेलखंडी. शेंकडा ४० लोक शेतकीवर उपजीविका करतात, चांभार, कच्छि, ब्राह्मण, लोधी, धीवर, छत्री, बुंदेले, रजपूत वगैरे ज्ञातींचे लोक आहेत.
जमीन साधारणपणें सुपीक आहे. माती लाल व पिंवळसर रंगाची आहे. मोट, काबर, परूआ, व शन्कर अशीं चार तर्हेची जमीन आहे. उत्तरेकडील तहरौली परगण्यांत जमीन फार उत्तम प्रकारची आहे. १६१४ चौ. मै. जमीन खालसा आहे. व ४६६ चौ. मै. जहागिरींत गुंतली आहे. ९९४ चौ. मै. जमीन पिकाऊ आहे. १६६ चौ. मै. जमीन जंगल आहे. कुरणें पुष्कळ आहेत. मुख्य पीकें:- ज्वारी, तांदूळ, जव, तीळ, चणे, गहूं, कडधान्य. पाटाच्या पाण्याचा बागाईतीकरितां उपयोग करितात. इमारतीच्या उपयोगाचीं लांकडें असलेल्या जंगलाचा कांहीं भाग राखून ठेवलेला आहे. जंगलांतील काम सहारिया लोकांकडे सोंपविलें आहे.
अलीकडे व्यापाराची बरीच वाढ झाली आहे. येथून मुंबई व कानपुरास धान्य, तूर, व जाडें भरडें कापड जातें. येथें पूर्वी लोखंड गाळून बंदुका तयार करीत असत. टिकमगड येथें संस्थानाच्या मालकीचा एक बंदुकीचा कारखाना आहे. झांशी-भोपाळ व झांशी-मणिकपुर ह्या रेल्वे शाखा ह्या संस्थानांतून जातात. १८९५ पावेतों संस्थानांत डाकेची कांहीं व्यवस्था नव्हती.
ह्या संस्थानाचे पांच परगणे केले असून प्रत्येक परगण्यावर एका तहशीलदाराची नेमणूक आहे. बलदेवगड, जटार, ओरछा, तहरौली व टिकमगड हीं तहसिलीचीं पांच मुख्य ठाणीं होत. जटार ही सर्वांत मोठी तहसिल आहे.
संस्थानाच्या प्रधानास मदार-उल महाम म्हणतात. जातिविषयक तंटे पंचायत सोडविते. संस्थानाचें उत्पन्न ७ लाख. शिवाय जहागिरदारांचें उत्पन्न १.५ लाख रूपये. सारा गोळा करण्याचें काम गांवच्या पाटलाकडे सोंपविलेलें असतें. सरकार कास्तकार लोकांस मक्तयानें जमीनी लावून देतें. खर्च ६.५ लाख रूपये. अबकारीचा मक्ता दिला आहे. अजून संस्थानाच्या शिक्याचें नाणें पाडलें नाहीं. गजशाही रूपया चालतो. राजधानीच्या गांवांत टांकसाळ आहे. सोन्याचीं रूप्याचीं व तांब्याचीं नाणीं येथें पाडतात. सैन्य:-२५० घोडदळ, १००० पायदळ व ९० तोफा. टिकमगड येथें मुख्य तुरूंग आहे. शिक्षणाच्या बाबतींत इत संस्थानांप्रमाणें हें संस्थान फारच मागसलेलें आहे. शिक्षणखात्याकडे वार्षिक खर्च सुमारें ३३०० रू. होतो.
गां व - मध्य हिंदुस्थानांतील ओरछा संस्थानाची पूर्वीची राजधानी. लोकसंख्या (१९०१) १८३०. भारतीचंदानें १५३१ मध्यें हा गांव वसविला. हा बेटवा नदीच्या किनार्यावर आहे. भोंवताली जंगल आहे. सन १७८३ मध्यें विक्रमाजितानें राजधानी टिकमगड येथें बददली. वीरसिहदेवाच्या वेळच्या येथें मोठमोठ्या इमारती आहेत. येथील राजमंदीर व जहांगीर महाल प्रसिद्ध आहेत. चतुर्भुज वगैरे बरींच देवालयें आहेत. देवळांत नकशी काम वगैरे कांहीं नाहीं. येथें भारतीचंद मधुकरसाह, वीरसिंहदेव, पहाडसिंग, सानवंतसिंग व त्यांच्या राण्या ह्यांच्या किल्ल्याच्या पायथ्याशीं भव्य छत्र्या आहेत. चतुर्भुज देवालयानजीक हरदौलाचें थडगें आहे. ओरछा हें एका तहसिलीचें मुख्य ठिकाण आहे.