विभाग नववा : ई-अंशुमान

ओरिसा कालवे (१) - बंगालमधील कटक जिल्ह्यामध्यें व कांहींसे बलासोर जिल्ह्यांत असलेले कालवे. ह्या कालव्यांत महानदी, ब्राह्मणी व वैतरणी नद्यांचें पाणी येतें. कालव्याच्या द्वारें ओरिसा व मिदनापूर जिल्ह्यांतील नद्यांचा उपयोग करून घेण्याची शक्कल पाहिल्यानें १८५८ मध्यें सर आर्थर कॉटननें काढली. अशा रितीनें ३५१६ चौ. मै. जमीन भिजणें शक्य होतें. खर्चाचा अंदाज साधारणपणें १३० लाख रूपयांचा होता. शिवाय पात्रांतून नौका व होड्यांच्या मदतीनें मालाची ने आण करावयाची सोय झाली असती ती निराळीच. ह्या योजनेप्रमाणें १८६० मध्यें ईस्टइंडिया इरिगेशन व कॅनाल कंपनी’ अस्तित्वांत आली व १८६५ मध्यें तिनें आपल्या कामास सुरूवात केली. तदनंतर कंपनीजवळून सरकारनें हें सर्व काम १०९ लाखांस विकत घेतलें व १८६९ मध्यें कम्पनी मोडली.

पहिल्यानें काम जरा रेंगाळत चाललें होतें. पण अखेरीस ओरिसामधील १७८१ चौ. मै. जमीन भिजविण्याचा विचार कायम ठरला.

एकंदर मुख्य चार कालवे आहेत. त्यांचीं नांवें:- १ हायलेव्हल कालवा २ केन्द्रपार कालवा ३ तालदंडकालवा व ४ माचगांव कालवा.

हायलेव्हल कालवा करण्यांत कलकत्ता व कटकमधील व्यापाराचा मार्ग सुलभ करणें हा मुख्य उद्देश होता. भोंवतालच्या प्रदेशांत पाणी खेळविणें हा उद्देश दुय्यम होता. ओरिसाचें क्षेत्र नद्यांनीं विभागलेलें आहे. महानदी व ब्राह्मणी नद्यांच्या प्रदेशामध्यें उत्तरेस पटामुन्डई कालवा व दक्षिणेस केन्द्रपार कालवा आहे. ह्या दोघांस जोडणार्‍या कालव्यास गोब्री कालवा म्हणतात.

सारा वाढवण्याच्या भितीनें पहिल्यानें लोक ह्या कालव्यांच्या पाण्याचा फायदा घेईनात. पण हळू हळू पट्टी कमी करीत गेल्यामुळें त्यांनां विश्वास आला. नंतर मक्त्यानें कांहीं वर्षेंपर्यंत पाणी देण्याची युक्ति अमलांत आणण्यांत आली. कालव्यापासून उत्पन (१९०३-४) ४.३ लाख झालें.

(२) बलासोर जिल्ह्यांतील एक नाव्य (नौकागमनार्ह) कालवा. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यांतहि हिजिली तिडल कालव्यांत ह्याचा भाग आहे. लांबी १३० मैल. ह्या कालव्याच्या योगानें रसूलपूर व सुवर्णरेखा नद्या जोडल्या गेल्या आहेत. हा कालवा नेआणीकरितां १८८५ सालीं उघडण्यांत आला.