विभाग नववा : ई-अंशुमान
ओर्मेरॉड एलिअनॉर (१८२८-१९०१)- ही प्रसिद्ध किटकशास्त्रज्ञ बाई. ‘हिस्टरि ऑफ चेशायर’ या ग्रंथाचा कर्ता जॉर्ज ओर्मेरॉड एफ्. आर. एस. याची मुलगी होती. ग्लूसेस्टर परगण्यामधील सेडबरी पार्क या ठिकाणीं हिचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिला या कीटकशास्त्राचा नाद होता व तिची घरची परिस्थिति चांगली असल्याकारणानें तिला या शास्त्राचा खोल अभ्यास करण्याला चांगली संधि मिळाली. किड्यांपासून शेतकीला नुकसानकारक असे कोणते कोणते रोग उत्पन्न होतात याची माहिती मिळविण्यासाठीं रॉयल हॉर्टिकलचरल सोसायटीनें प्रयत्न सुरू केले. या कार्यांत, ओर्मेरॉड बाईची त्या संस्थेला फार मदत झाली व त्या संस्थेनें ओर्मेरॉडला एक पदक बक्षीस दिलें. १८७७ मध्यें तिनें ‘नेट्स फॉर ऑबझर्वेशन्स ऑन इंज्यूरियस इन्से. क्ट्स’ यासंबंधीं एक छोटेसें पुस्तक प्रसिद्ध केलें व या शास्त्राविषयीं आवड असणार्या प्रसिद्ध लोकांकडे त्याच्या प्रती फुकट पाठवून दिल्या. या शास्त्रातील इतर तज्ज्ञांनींहि आपापले शोध आर्मेरॉजला कळविले; व अशा रीतीनें या विषयासंबंधींची चर्चा करणारें दर वर्षीं एक अहवालात्मक पुस्तक तयार होऊं लागलें. १८८१ सालीं ‘टर्निपफ्लाय’ (टर्निप नांवाच्या झाडाला लागणारी माशी) यासंबंधीच्या माहितीचें एक पत्रक तिनें प्रसिद्ध केलें. १८८२ सालीं रॉयल अॅग्रिकलचरल सोसायटीच्या कीटकशास्त्र खात्याच्या बाबतींत सल्लागार म्हणून हिची नेमणूक झाली. सिरेन्सेस्टर येथील रॉयल अॅग्रिकलचरल कॉलेजमध्यें तिला कीटकशास्त्रावर व्याख्यानें देण्यासाठीं नेमण्यांत आलें. पण तिची कीर्ति केवळ इंग्लंडमध्येंच पसरली होती असें नाहीं. तिला मॉस्कोच्या विश्वविद्यालयानें तिच्या कीटकशास्त्रनैपुण्याबद्दल पुष्कळ पदकें बहाल केलीं. तिनें दक्षिणआफ्रिकेमधील उपद्रवी कीटकांसंबंधीं एक छोटेसें पुस्तक प्रसिद्ध केलें. इ. स. १८९९ मध्यें फ्रान्समधील एका शास्त्रीय संस्थेनें तिला एक मोठें चांदीचें पदक अर्पण केलें. कॉबडेन जर्नल्स, मॅन्युअल ऑफ इंज्यूरियस इनसेक्ट्स, हँडबुक ऑफ इनसेक्ट्स इंज्यूरियस टु ऑर्चर्ड अँड बुशफ्रूट्स इत्यादि तिचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या शास्त्रांतील तिच्या नैपुण्याबद्दल तिची अत्यंत स्तुति करून एडिंबरो विश्वविद्यालयानें तिला एलएल् डी ची पदवी बहाल केली. एलएल. डी. ची पदवी या विश्वविद्यालयाकडून मिळविणारी पहिली बाई हीच होय. १९०१ मध्यें सेंट अल्बन्स या ठिकाणीं ती मृत्यू पावली.