विभाग नववा : ई-अंशुमान
ओल्डहॅम थॉमस (१८१६-१८७८)-एक ब्रिटिश भूस्तरशास्त्रज्ञ. हा डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजमध्यें अभ्यास करून १८३६ त बी. ए. झाला. पुढें एडिंबरो येथे एंजिनिअरिंगचा अभ्यास करीत असतां भूस्तरशास्त्र व खनिजशास्त्र यांत त्यानें पारंगतता मिळविली. १८३९ त डब्लिनला परत येऊन भूस्तरखात्याचा (ऑर्डनन्स सर्व्हेचा) अधिकारी कॅप्टन पोर्टलॉक याचा मुख्य मदतनीस झाला व ‘रिपोर्ट ऑन दि जिऑलॉजी ऑफ लंडनडेरी एट्सेट्रा’ तयार करण्याच्या कामीं चांगली मदत केली. १८४६ त आयर्लंडच्या भूस्तरशास्त्रीय पाहणीचा (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ आयर्लंड) तो चालक झाला. यापूर्वीं डब्लिनच्या विश्वविद्यालयांत भूस्तरशास्त्राचा प्रोफेसर म्हणून त्याची नेमणूक झाली होती. १८४८ त त्याला रॉयल सोसायटीचा फेलो (एफ. आर. एस.) निवडण्यांत आलें पुढील सालीं ब्रेहेड येथील केब्रियन खडकांत त्यानें “ओल्डहॅमिया” नांवाचा प्रस्तरावशेष शोधून काढला. १८५० मध्यें हिंदुस्थानच्या भूस्तरशास्त्रीय पाहणीच्या खात्याच्या (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा) ताबा घेण्यास त्याला बोलविण्यांत आलें. त्यानें त्याची नीट व्यवस्था करून ठेऊन टिपणें (मेमॉइर्स) भारतीय प्रस्तरावशेष (पॅलीआँटॉलॉजिआ इंडिका’) व नोंद (रेकॉर्ड्स) हीं नियतकालिकें सुरू करविलीं. त्यांतून त्याचे लेख प्रसिद्ध होत. ‘ऑन दि कोल रिसोर्सेस ऑफ इंडिया’ हा हिंदुस्थानांतील कोळशासंबंधींचा अहवाल त्यानें १८६४ त प्रसिद्ध केला. १८७६ त यानें नोकरी सोडली व पुढें दोन वर्षांनीं रूग्बी येथें मरण पावला.