विभाग नववा : ई-अंशुमान
ओवा - ओव्यास संस्कृतांत धनानी, गुजराथींत यवान, हिंदींत अजवान, बंगालींत यमानी वगैरे नांवें आहेत.
ओव्याची लागवड सर्व हिंदुस्थानांत व मुख्यत्वेंकरून बंगाल्यांत करितात. मिसर, इराण व अफगाणिस्तानांतहि ओव्याचें झाड उत्पन्न होतें. यूरोपांत याची लागवड अलीकडे सुरू झाली आहे.
फ्रान्सच्या १४ व्या लुईच्या पदरीं असलेल्या पोमेट राजवैद्यानें उत्तम ओंवा अलेक्झांड्रिया व क्रीटमधून येतो असें लिहिलें आहे (१७१२).
ला ग व ड.-हिंदुस्थानांत ओव्याची लागवड आक्टोबर व नव्हेबर या महिन्यांत बांधांवरून प्रत्येक रोपामध्यें ६ इंचांचें अंतर ठेवून करितात. खतापासून याला बराच उपद्रव होतो व याला पाणी मुबलक लागतें.
ओवा बागाइतांत होतो. याचीं झाडें सुमारें हात दीड हात उंच वाढतात. ओंव्याचा अर्क काढितात. त्यास ओंव्याचें फूल म्हणतात. हें मध्यहिंदुस्थानांत उज्जनी, इंदूर येथें काढतात. हें फूल तयार करण्याचें कारखाने मुंबई, कलकत्ता वगैरे ठिकाणीं नवीन पद्धतीवर सुरू आहेत. मुंबई इलाख्यांत ओव्याच्या पिकाखालीं दरसाल सुमारें ५००-६०० एकर क्षेत्र असतें. मध्यप्रांतांत नेमाडांत याची लागवड जुजबी आढळते. मद्रास इलाख्यांत नंदियाल खोर्यांत व तिनवेल्ली जिल्ह्यांत काळ्या जमिनींत ओव्याचा उतवडा टाकितात. मुंबई इलाख्यांत खेडा जिल्ह्यांत याची लागवड हिंवाळ्यांत जिर्याबरोबर करितात. खेडा जिल्ह्यांत ओवा मार्च महिन्यांत म्हणजे जिरें काढल्यावर महिन्यानें अगर सव्वा महिन्यानें तयार होतो. पुणें जिल्ह्यांत ओवा जून जुलई महिन्यांत भुईमुगांत टाकितात. तो जानेवारींत तयार होतो. दर एकरी सरासरी उत्पन्न १२० पौंड होतें.
१९०३ सालीं मुंबईहून ८६४१ हंड्रेडवेट ओंवा परदेशीं गेला. त्यापैकीं ८४४३ हंड्रेडवेट जर्मनीनें खरेदी केला व बाकीचा अमेरिका व ईजिप्त (मिसर) येथें गेला. ओव्यांतील अर्क व पाणी काढून टाकलेल्या ओव्यांत शेंकडा १५ पासून १७ पर्यंत ओजस द्रव्य असून शेंकडा २५ पासून ३२ पर्यंत चरबी असते म्हणून गुरांनां तो चारतात ओंव्या पासून पुढील जिन्नस तयार करतात.
ओ व्या चें ते ल.- ओव्याचें ताजें तेल अगदीं स्वच्छ व रंगरहित असतें, परंतु लौकरच तें किंचित पिवळसर होतें. ओव्याप्रमाणेंच त्यास वास असून रूचि तिखट व तीव्र असते हें एक थेंबापासून तीन थेंबांपर्यंत साखरेवर टाकून अथवा डिंकाच्या पाण्यांत मिसळून देतात.
ओ व्या चें पा णी:- ठेंचलेला ओवा २० औंस व पाणी २ ग्लालन घेऊन रितीप्रमाणें त्या पाण्याची वाफ करून १ ग्लालन पाणी काढावें. पोटांत घेण्याचें प्रमाण:- १ औंसपासून २ औंसापर्यंत एरंडेलासारखीं घाण, वास, व रूचि असलेलीं सारक औषधें ह्या पाण्यांत मिसळून घेतली असतां त्यांची रूचि व वासहि न समजून त्यांपासून जी मळमळ व पोटांत कळ वगैरे लक्षणें उद्भवतात तींहि उद्भवत नाहींत. शिवाय, ह्याच्या अंगीं वायुहारक असे उत्तम गुण आहेत.
ओ व्या चें फू ल.- मध्यप्रदेशांत उज्जनी वगैरे ठिकाणीं, मुख्यत: थंडीच्या दिवसांत हें तेल तयार करितात. हें सर्व ठिकाणीं बाजारांत मिळतें. वाफ करून ओव्याचें जें पाणी तयार करतात. त्याच्यावर आपोआप ओव्याचें फूल जमतें. ह्याचे चकचकीत व अमळसे पिवळसर खडे असतात. हें जंतुमारक व दुर्गंधनाशक असतें. यानें ज्वर व हगवण कमी होते (अजमोदल पहा).
ओ व्या चें चू र्ण:- ओवा, शेंधेलोण, पादेलोण, यवक्षार, हिंग व हिरडा हीं समभाग घेऊन वस्त्रगाळ चूर्ण तयार करावें. प्रमाण १०-२० ग्रेनपर्यंत. हें ऊन पाण्याच्या घोटाबरोबर अगर मधांत मिश्र करून घेतलें असतां पोटदुखीवर चांगला उपयोग होतो.
गु ण ध र्म व उ प यो ग :- ओव्याच्या अंगीं उत्तम उत्तेजक, पौष्टिक व वायुहारक आणि स्नायूंचा संकोच दूर करण्याचे धर्म आहेत; म्हणजे अनुक्रमें मिरची किंवा मोहरी, काढे चिराईत व हिंग ह्या तिघांच्या अंगचे जे विशिष्ट गु ण ते एकट्या ओव्याच्या अंगीं आहेत. ओव्याच्या माफक प्रमाणापासून लाळेची उत्पत्ति अधिक होते, तसेंच जाठररसहि अधिक उत्पन्न होऊं लागतो; घसा येतो तेव्हां दुसर्या स्तंभक औषधांबरोबर गुळण्या करणें वगैरे बाह्योपचाराच्या कामीं ओव्याचा पुष्कळ उपयोग करितात. घाणेरड्या औषधांची रूचि व गंध हीं समजून न येण्यास ओव्यासारखें दुसरें औषधच नाहीं म्हटलें तरी चालेल.
ओवा कडू, तिखट व उष्ण आहे. उचकी, पोट फुगणें, अरूची, या रोगांस हा घालवितो. अग्नि दिपन करतो. पोटदुखी, नळवात, खोकला अजीर्ण, पडसें मस्तकशूळ इत्यादि विकारांवर ओव्याचा फार उपयोग होतो. पोटदुखी, नळ, खोकला व अजीर्णावर ओवा खाऊन वर ऊन पाण्याचा घोंट घ्यावा. पडसें व मस्तकशूळावर-ओंव्याचें चूर्ण करून तें वस्त्रांत बांधून हुंगण्यास द्यावें किंवा ओव्याची विडी करून ओढावी. बहुमूत्रावर ओवा त तीळ एकत्र करून द्यावें.
कि र मा णी ओ वा.- यास इंग्रजींत वर्मसीड, संस्कृतांत चौर व मराठींत किरमाणी किंवा चौर ओवा असेंहि नांव आहे. काश्मीरपासून कुमाऊनपर्यंतच्या प्रदेशांत व पश्चिम तिबेटांच्या लवणांत हीं झाडें पुष्कळ आहेत. लिव्हॅन्टमधील किरमाणी ओवा, इराण व एशियामायनरमधून व बारबरी किरमाणी ओवा पॅलेस्टाईन व अरेबियामधून हिंदुस्थानांत येतो.
किरमाणी ओव्याच्या फुलाचा वरचा भाग कृमिघ्न व रेचक औषध म्हणून उपयोगांत आणितात. या ओव्यांतून ‘सॅन्टोनाईन’ नांवाचें सत्व १८३० मध्यें एका रशियन वैद्यानें शोधून काढलें. हें सत्त्व पोटांतील जंतविकारावर १ ते ३ गुंजांपर्यंत वयमानाप्रमाणें साखरेबरोबर रात्रीं देतात. व सकाळीं सुंठीचा काढा व एरंडेल तेल यांत देतात. सॅन्टोनिन हें सध्यां जर्मनीमधून हिंदुस्थानांत येतें. रशिया, अफगाणिस्तान व इराण या देशांतूनहि सॅन्टोनिन येतें. बाजारांतील सॅन्टोनिन बहुधा टंकिकाम्लाशीं व गोंदाशीं मिसळलेलें असतें. हिमालयांत घोड्यांनां हीं झाडें खावयास घालतात व ते आवडीनें खातात. किरमाणी ओंव्याच्या इतर जातीचीं झाडें पंजाबांत बकर्यांनां खावयाला देतात.
या झाडांत तंतूपेक्षां श्वेतकल्ककल्प (अल्ब्युमिनस) पदार्थांचें व कार्बोहायड्रेट पदार्थांचें प्रमाण कमी असतें. तरी इतर खाद्य धान्याच्या झाडांपेक्षां एब्युमिनसचा अंश जास्त असतो. हीं झाडें त्यांच्या उग्र वासामुळें व त्यांतील चोथ्यांमुळें घोड्यांनां जरी फारशी उपयोगी नसलीं तरी इतर गुरांनां तीं चांगलीं पुष्ट करणारीं असतात.
ना ग डो णी.- याला फ्ली-बेन, नागडौन, नागडोनी, टाटोर, सुरबन्द इत्यादि नांवें आहेत. हिंदुस्थानांतील सर्व डोंगराळ प्रदेशांत हीं झुडपें समूहानें आढळतात. यूरोप, सयाम, जावा इत्यादि देशांच्या समशीतोष्ण प्रदेशांतहि ही झाडें आहेत. हें जठराग्नि प्रज्वलित करणारें शक्तिवर्धक औषध आहे. हिंदू लोक याचा रेचक व आवर्तजनक औषधासारखा उपयोग करतात. याचा कधीं कधीं तापावरहि उपयोग होतो. चिनी लोक दु:खाच्या जागीं याचा लेप देतात. हा ओवा प्रात:काळीं शिळ्या पाण्याबरोबर किंवा विड्यांतून दिल्यास कृमिरोग (जंतविकार) दूर होतो. [संदर्भ ग्रंथ-पदे. वॅट. भिषग्विलास, पु. १४ व १८.]