विभाग नववा : ई-अंशुमान
ओवेन, रॉबट (१७७१-१८५८)- इंग्रज समाजसुधारणावादी, याचा बाप न्यूटौनमध्यें जिनगराचा व लोहाराचा धंदा करीत असे. तेथल्या शाळेंत ओवेनचें शिक्षण ९ व्या वर्षापर्यंत झालें. नंतर एका कापडवाल्याच्या दुकानांत कांहीं वर्षे नोकरी करून त्यानें मॅन्चेस्टर येथें स्वतंत्र दुकान काढलें. १९ व्या वर्षी तो एका कापसाच्या गिरणीचा मॅनेजर झाला व स्वत:च्या हुषारीनें व मेहनतीनें त्यानें ती ग्रेटब्रिटनमधील पहिल्या प्रतीची गिरणी बनविली. १७९४ मध्यें तो मॅन्चेस्टर येथील चॉर्लटॉन टिविस्ट कंपनीचा मॅनेजर व भागीदार झाला. टिवस्ट कंपनीच्या भागीदारांनीं न्यू लॅनार्क मिल्स विकत घेतल्या व तेथला मॅनेजर व पातीदार होऊन ओवेन ग्लासगोला १८०० पासून राहूं लागला. त्या गिरणीमध्यें सुमारें दोन हजार कामकारी होते. त्यांपैकीं पांचशें मुलें होतीं. तीं बहुतेक ग्लासगो व एडिनबरो येथील अनाथालयांतून पांचव्या सहाव्या वर्षीं आणून कामावर लावलेलीं होतीं. त्यांची सुधारणा करण्याचें काम ओवेननें हातीं घेतलें. लहान वयाच्या मजूर मुलांनां शिक्षण देण्याच्या रात्रीच्या शाळा वगैरे नव्या पद्धती त्यानें काढल्या. १८१३ मध्यें त्यानें मोफत शिक्षणासंबंधानें स्वत:चे कांहीं निबंध प्रसिद्ध केले. तत्कालीन धार्मिक आचाराविचारांवरहि त्याची श्रद्धा नव्हती. मनुष्याचा स्वभाव व संवयी तो ज्या परिस्थितींत वाढतो तिच्यावर अवलंबून असतात; म्हणून चांगल्यावाईट आचरणाबद्दल मनुष्य स्वत:स्तुतिनिंदेस पात्र नसून तत्संबंधीं सर्व जबाबदारी परिस्थितीवर आहे. म्हणून सद्वर्तनी बनविण्याकरितां मुलांनां अगदीं लहान वयापासून सत्संगतींत ठेवणें जरूर असतें हीं ओवेनच्या शिक्षणविषयक व सामाजिक मुधारणेचीं मुख्य तत्त्वें होत. त्याच्या न्यू लॅनार्क येथील संस्थेचें महत्त्व इंग्लंडलाच नव्हे तर सर्व यूरोपला वाटूं लागलें.
आतांपर्यंत ओवेन सर्व कार्य परोपकार या एकाच बुद्धीनें करीत होता; परंतु १८१७ मध्यें तो समाजसत्तावादी बनला. नेपोलियनबरोबरच्या युद्धानंतर व्यापाराला मंदी आल्यामुळें मजूर बेकार होऊन त्यांची उपासमार होऊं लागली. त्याकरितां मजुरांनां काम मिळून उपासमार टळावी म्हणून त्यानें पुढील योजना सुचविली. १००० ते १५०० एकर जमीन घेऊन तेथें १२०० पर्यंत लोकांची एक वसाहत करावी. सर्वांनीं एका इमारतींत राहून एकत्र जेवणखाण करावें. जमीनीची लागवड त्यांनीं समाईकप्रमाणें करावी व उत्पन्नाचा उपभोग एकत्र घ्यावा. शेतकी हा मुख्य धंदा असला तरी इतर प्रकारचे धंदे करून समाजाच्या सर्व गरजा तेथें भागवाव्या. यंत्राचाहि उपयोग करावा. येणेंप्रमाणें सर्व देशांत व सर्व जगांत वसाहती किंवा समाज वसवावे. १८२५ मध्यें ग्लासगोनजीक ओवेनच्या एका अनुयायानें प्रयोगादाखल अशी एक वसाहत वसवली व खुद्द ओवेननें अमेरिकेंत जाऊन न्यू हार्मनी येथें दुसरा प्रयोग आरंभिला. दोन वर्षें हे प्रयोग चालून अखेर त्यांत पूर्ण अपयश आलें. सदरहू वसाहतींत चांगले उच्च दर्जाच्या व ध्येयाच्या इसमांबरोबरच भटके, अनाचारी, उतावळे, धाडसी अशा अनेकांची खिचडी झाल्यामुळें कोणाचा कोणाशीं मेळ बसेना. यामुळें तें कार्य सोडून देऊन व स्वत: पदराला बराच मोठा चट्टा लावून घेऊन ओवेन इंग्लंडांत परत आला; व तेथेंच राहून त्यानें पुन्हां कांहीं समाजसत्ताविषयक योजनांचे प्रयोग सुरू केले. १८३२ मध्यें त्यानें न्याय्य श्रमविनिमय (एक्विटेबल लेबर एक्सचेंज) पद्धति सुरू करून श्रमदर्शक नोटा (लेबरनोट्स) काढल्या; व अशा रीतीनें नेहमींचीं चलनें व दलाल वगैरे मध्यस्थींची आवश्यकता नाहींशी करण्याची मोठी चमत्कारिक योजना पुढें मांडली. १८३५ मध्यें सर्व राष्ट्रांतील सर्व वर्गांची असोसिएशन त्यानें काढली, व त्या संस्थेंतील वादविवादांतच सोशॉलिझम (समाजसत्तावाद) हा शब्द प्रथम प्रचारांत आला. विवाहसंबंधांविषयींचीं त्यांचीं मतें कडक नीतिनिर्बंधन पोषक नव्हतीं; व तीं त्यानें या सुमारास प्रसिद्ध केल्यामुळें तो एक समाजाला धक्का बसला. सामाजीक पंथी वसाहतींचे आणखी प्रयोगहि त्यानें चालू केले. त्यांतून खरें उपयुक्त व टिकाऊ असें सहकारी धंद्यांचें तत्त्व मात्र जोरांत पुढें आलें. ओवेनहि अखेर नास्तिकपणा टाकून देऊन अध्यात्मवादी बनला.