विभाग नववा : ई-अंशुमान
ओव्हिड - (पब्लिअस ओव्हिडियस नॅसो) जन्म. ख्रि. पू. ४३-मृत्यु इ. सन. १७. आगस्टस या रोमच्या बादशहाच्या अमदानींत जे प्रसिद्ध कवी होऊन गेले त्या कविमंडळापैकीं ओव्हिड हा शेवटचा रोमन कवि होय. ज्या वर्षीं हा जन्मास आला त्याच वर्षीं लोकसत्ताक राज्याची इतिश्री होऊन साम्राज्यसत्तेची स्थापना झाली. त्याच वर्षीं वाङ्मयक्षेत्रांत आपल्या लेखणीनें अजरामर किर्ति मिळविणारा सुप्रसिद्ध वक्ता सिसरो हा मरण पावला. अब्रजी पर्वताच्या रांगांमध्यें निसर्गरम्य अशा जागीं वसलेल्या पेलिग्नी तालुक्याच्या सुलमोना नामक एका शहरीं ओव्हिड याचा जन्म झाला. अर्थातच अशा निसर्गसुंदर स्थानाचा व त्या स्थानाभोंवतीं पसरलेल्या रमणीय प्रदेशाचा ओव्हिडच्या मनावर फार परिणाम झाला असावा यांत नवल तें काय ? ओव्हिडचें घराणें हें पेलिग्नीमधील प्रतिष्ठित जहागिरदार घराण्यांपैकीं एक असून रोमच्या तत्कालीन इतिहासामध्यें त्या घराण्यानें महत्वाचा भाग घेतला होता. त्या वेळच्या रूढीला अनुसरून ओव्हिडच्या बापानें ओव्हिडला व त्याच्या भावाला रोम येथें विद्याभ्यासाकरितां ठेवलें. त्या ठिकाणीं ओव्हिडनें आरेलियस फिस्कस व पोर्टियस लॅट्रो यांच्यापाशीं साहित्य व वक्तृत्व या शास्त्रांचा अभ्यास केला. तत्त्वज्ञानशास्त्र अगर तर्कशास्त्र यांसारख्या रूक्ष व क्लिष्ट अशा शास्त्राची त्याला मुळींच आवड नव्हती. वक्तृत्वशास्त्रापेक्षां काव्याकडेच त्याचें मन धांव घेत असे. बालपणापासूनच त्याला कविता करण्याचा नाद असे. यापासून त्याला परावृत्त करण्याचा त्याच्या बापानें बराच प्रयत्न केला व सद्य:फलदायी अशा कायदेशास्त्राचा अभ्यास करण्याकडे त्याचें मन वळविलें पण ‘स्वभावस्तु प्रवर्तते’ या न्यायानें ओव्हिडचें चित्त काव्यक्षेत्रांतच रममाण होत असे. अनेक विषयांवर कविता करावयाच्या, चांगल्या साधल्या नाहीत तर पुन्हां त्याच विषयावर नवीन कविता रचावयाच्या असा त्याचा क्रम असे.
लहानपणींच ‘आमेरेस’ व ‘हेरॉइडीस’ हीं काव्यें त्यानें प्रसिद्ध केलीं होतीं. प्रसिद्ध कवि व्हर्जिल याचीं काव्यें व्हर्जिलचा मित्र मेसर याच्या तोंडून त्यानें भक्तिपूर्वक श्रवण केलीं होतीं. होरेस कवीचें काव्य वाद्यांच्या साथीवर गाइलें जात असतां तें ऐकण्यांत त्याला अत्यानंद होत असे. आपल्या समकालीन कवींशीं त्यानें ओळख करून घेतलेली होती व त्या सर्वांचा त्यानें अदरबुद्धीनें आपल्या काव्यग्रंथांत व पत्रांमध्यें उल्लेख केला आहे. त्यानें आपला शिक्षणक्रम संपविल्यानंतर अथेन्स, सिसिली व आशियांतील मुख्य मुख्य शहरें मेसर कवीबरोबर प्रवास करून पाहिलीं. अथेन्स म्हणजे विद्यादेवीचें माहेरघर. हें पाहिल्यावर ओव्हिडसारख्या तरूण व रसिक माणसाला किति आनंद झाला असेल याची कल्पनाच करणें बरें. या प्रवासांत त्याला जीं प्रेक्षणीय व इतिहासप्रसिद्ध स्थळें पहावयास मिळालीं त्याचा त्याच्या मनावर अतिशय परिणाम झाला होता हें त्या स्थलांसंबंधीं त्यानें आपल्या पत्रांत व काव्यांत जें बहारीचें वर्णन केलें आहे त्यावरून निदर्शनास आल्यावांचून रहात नाहीं.
प्रवास संपवून परत आल्यानंतर रोम हें त्यानें आपलें कायमचें निवासस्थान मोठ्या कुलांत जन्म घेतलेल्या सुसंस्कृत माणसाचा त्यानें मनांत आणलें असतें तर राजसभेंत सहज प्रवेश झाला असता. किंबहुना निरनिराळ्या ठिकाणीं न्यायखात्यांत न्यायाधीश या नात्यानें त्यानें कामहि केलें. तथापि काव्य हा त्याचा आवडता व मुख्य व्यासंग होऊन बसला होता. कवित्व व शील या दोहोंची सांगड क्वचितच आढळते. ओव्हिडहि या नियमाला अपवाद नव्हता. त्याचें काव्य नेहमीं विषयोद्दीपक असे. त्याच्या काव्यांत निष्काम व दिव्य प्रेमाची छटा बिलकुल दिसून येत नाहीं. त्यानें स्वत: तीनदां लग्न करून घेतलें. पहिला विवाह त्याच्या लहानपणींच झाला. पण आपल्या मनाजोगती अशी बायको मिळाली नाहीं या सबबीवर तिच्याशीं घटस्फोट करून त्यानें दुसरीशीं लग्न केलें. तिच्यापासून त्याला एक मुलगी झाली. पण पुढें त्याचें तिच्याशीं पटेनासें होऊन त्यानें फेबिनस मॅक्सिमन नांवाच्या एका बड्या गृहस्थाच्या नातेवाईक तरूणीशीं लग्न केलें. ही तरूणी ऑगस्टस बादशाहाची बायको लिव्हिया हिची मैत्रीण होती, व तिच्या वजनामुळें त्याचा राणीवशांत प्रवेश झाला. त्यामुळें त्याला राणीवशांत कसा सावळा गोंधळ असतो याची पूर्ण माहिति झाली. या तिसर्या बायकोवर त्याची फार प्रीति होती. तरी पण कॉरीन्ना नांवाच्या एका सुंदर मुलीशईं त्याचा चोरटा संबंध होताच. त्या काळचा रोमचा समाजच ख्यालीखुसालीचा भोक्ता असे. साम्राज्यसत्ता स्थापित झाल्यामुळें राजकीय उलाढालींचे दिवस नाहींसे झाले होते. त्यामुळें रोमन लोक ऐदी व खुशालचेंडू बनले होते. नीतीचीं बंधनें शिथिल झालीं होतीं. राजघराण्यांत तर राजकन्या जूलिया इच्याविषयी तिच्या छंदिष्ट स्वभावामुळें सावळागोंधळ माजला होता. या सर्वांचें प्रतिबिंब ओव्हिडनें त्या सुमारास लिहिलेल्या ‘आर्स अॅमेटोरिया’ या काव्यांत दृष्टीस पडतें. हें काव्य अत्यंत उत्तान व बीभत्सशृंगारानें परिपूर्ण आहे. रेनॉल्डच्या ‘मिस्टरीज ऑफ दि कोर्ट ऑफ लंडन’ या ग्रंथाप्रमाणें तें आहे. या कव्यानें तत्कालीन रोमन समाजांत खळबळ दिलीच; पण या काव्यांत खुद्द राजकन्येच्या संबंधींचे अप्रत्यक्ष उल्लेख आल्यामुळें ऑगस्टस बादशहाच्या रोषाला ओव्हिडला कांहीं कालानंतर बळी पडावें लागलें.
यानंतरच्या पुढील दहा वर्षांत म्हणजे ख्रिस्ती शकाच्या आरंभींच्या सात आठ वर्षांत त्यानें ‘फॅस्टी’ आणि ‘मेटामार्फोसेस’ हे दोन ग्रंथ निर्माण केले. रोमन धर्मामध्यें जे धार्मिक विधी, व उत्सव आहेत त्यांचें सुरस व सांगोपांग वर्णन या फॅस्टी नामक ग्रंथांत ओव्हिडनें केलें. व अशा प्रकारें, ‘राष्ट्रीय कवि’ हें पद त्यानें प्राप्त करून घेतलें. पण ओव्हिडची प्रतिभा व कल्पनाशक्ति जर कोणत्या ग्रंथांत प्रामुख्यानें दृष्टीस पडत असेल तर तो ग्रंथ म्हणजे ‘मेंटामार्फोसेस’ हा होय रोमन देवांनीं यक्षकन्या व पृथ्वीवरील सुंदर स्त्रिया यांची प्राप्ति व्हावी म्हणून प्रेमासाठीं किती अचाट साहसें केलीं याचें अद्भुत व काव्यमय वर्णने त्यानें या ग्रंथांत केलें आहे. हा ग्रंथ प्रकाशित होण्याच्या अगोदर त्यावर पुन्हां एकदा आपला हात फिरवावा अशी त्याची इच्छा होती. पण तत्पूर्वी ऑगस्टसनें त्याला हद्दपारीची शिक्षा ठोठावल्यामुळें त्या आपमानाच्या भरांत त्यानें या ग्रंथाची प्रत जाळून टाकली. पण सुदैवानें या ग्रंथाची दुसरी एक प्रत त्याच्या एका मित्राजवळ होती ती त्या मित्रानें प्रकाशित केली.
ओव्हिडला हद्दपारीची शिक्षा होण्याचें काय कारण असावें याविषयींहि निश्चित कांहींच सांगतां येत नाहीं. राणीवशांत जो सांवळागोंधळ माजून राहिला होता त्याच्याशीं ओव्हिडचा नसता संबंध जोडण्यांत येऊन ऑगस्टस बादशाहानें ओव्हिडसंबंधींच्या द्वेषाचें उट्टें काढलें असावें हे एक अगदीं विश्वसनीय नाहीं, तरी संभवनीय कारण असावें असें दिसतें. या शिक्षेमुळें ओव्हिडला डान्यूब नदीच्या मुखाशीं असलेल्या एका शहरीं रहाण्याचा हुकूम झाला. त्याची मालमत्ता मात्र त्याच्याकडे बादशहानें राहूं दिली हे टोमी शहर रानटी लोकांचें ठिकाण होतें. या शहरावर रानटी व डोंगराळ लोकांचे नेहमीं हल्ले होत असत. अशा शहरीं ओव्हिडसारख्या, सुधारलेल्या शहरांत काळ घालविण्याची संवय झालेल्या रसिकाला चैन कसें पडावें ? आपली शिक्षा रद्द करण्याविषयीं बादशहाला विनंति करण्याकरतां त्यानें रोममधील अधिकार्यांनां व आपल्या मित्रांनां काव्यमय पत्रें लिहिलीं. पण त्यांचा कांहीं उपयोग झाला नाहीं. हीं पत्रें मात्र वाङ्मयाच्या दृष्टीनें फार सुंदर अशीं आहेत. या पत्रांत ओव्हिडच्या इतर काव्यांत दिसून येणारी प्रतिभा जरी दृग्गोचर होत नाहीं, तरी त्याला आलेले अनुभव व त्याच्या मनाची तळमळ हीं मात्र या पत्रांत पूर्णपणें नजरेस पडतात. या पत्रसंग्रहाचे दोन ग्रंथ असून त्यांचीं नांवें ट्रीस्टिया व एपिस्टुला एक्स पॉंटो अशीं आहेत.
आपली हद्दपारीची शिक्षा रद्द होत नाहीं असें त्याला पक्कें समजून आल्यामुळें त्याच्या मनाला धक्का बसल्यासारखें झालें. तशा स्थितितहि त्यानें आपल्या फॅस्टी या काव्यामध्यें थोडी सुधारणा करून तें पुस्तक प्रकाशित केलें. पुढें तो फार दिवस जगला नाहीं. आपल्या वयाच्या ६१ व्या वर्षीं तो मरण पावला.
ओव्हिडनें रचिलेल्या काव्यग्रंथाचे तीन भाग पडतात, (१) ऐन तारूण्यांतील ग्रंथ:- हे म्हणजे त्याचें प्रेमपात्र जें कॉरीन्ना तिला उद्देशून लिहिलेले शृंगारविषयक ‘अमोरेस’ हे काव्य, मेडिकॉमिना, फॅसी व प्रणयी लोकांनीं परस्परांचे प्रेम कसें संपादन करावें यासंबंधीचें ‘आर्स अमेटोरिया’ हें काव्य; व रेमेडिया अॅमोरिस. (२) मध्यवयांतील ग्रंथ:-१५ भागांत लिहिलेलें ‘मेटामॉर्फोसिस’ व सहा भागांत लिहिलेले फॅस्टी. (३) उतारवयांतील ग्रंथ:- पांच भागांत लिहिलेलें ट्रिस्टिया काव्य, इबिस एपिस्टुला एक्सपाँटो हेल्यूटिका.
ओव्हिडनें आपली कविता द्विचरणवृत्तांत व षट्चरणी वृत्तांत लिहिली. द्विचरणवृत्तांत त्याचा हातखंडा असे. या वृत्तांत लिहिलेलें त्याचें काव्य सहजमनोहर व जिवंत असें आहे. ग्रीक पुराणांतील निरनिराळ्या अद्भुत कथा व स्वत:च्या अप्रतिहत कल्पनाशक्तीच्या जोरावर निर्माण केलेल्या कथा काव्यामध्यें सांगण्याच्या कामीं या वृत्तांत त्यानें फार उपयोग करून घेतला व त्या बाबतींत त्याला पूर्ण यशहि प्राप्त झालें. व्हर्जिल सोडून दिल्यास यूरोपमध्यें व इंग्लंडमध्यें याच्या काव्याइतकी दुसर्या कोणत्याहि रोमन कवीच्या काव्यांत लोकप्रियता नाहीं. काव्यांचा व्हर्जिलच्या एक प्रकारचा ध्येयवाद व त्याबरोबरच पावित्र्य व विचारगांभीर्य दिसून येतें. ओव्हिडच्या काव्यांत तत्कालीन रोमन समाजाच्या चालीरीतींचें प्रतिबिंब स्पष्टपणें नजरेस पडतें. त्याच्या काव्यांत अद्भुत रस ओतप्रोत भरलेला असून त्याच्या भाषेंत मूर्तिमंत ओजस्वीपणा दिसून येतो. त्याच्या कवितेंत रूक्ष तत्त्वज्ञानाचा उहापोह कधींहि आढळावयाचा नाहीं. मनुष्याला अज्ञात अशा गूढ विषयांचें विवरण त्याच्या काव्याला अपरिचित आहे. व्यवहारांतील साध्या गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या साहाय्यानें चटकदार रीतीनें लोकांपुढें मांडण्यांत त्याचें कौशल्य दृष्टीस पडतें. जगांत असलेल्या गोष्टींचा उपभोग घेणें, त्यांत रममाण होणें एवढेंच जीविताचें कर्तव्य अशी त्याची समजूत असल्याकारणानें या गोष्टींचेंच वर्णन त्यानें आपल्या काव्यांत केलेलें आढळतें. तात्पर्य त्याची कविता स्वातंत्र्योद्दीपक नाहीं, तत्त्वविवेचनात्मक नाहीं, उच्च विचारांच्या क्षेत्रांत मनुष्याचें मन तल्लीन करणारी नाहीं. तर ती अगदीं साधी पण ओजस्वी व प्रासादिक अशी आहे.
[ संदर्भ ग्रंथ- ट्यूफील-हिस्टरी ऑफ रोमन लिटरेचर (इंग्रजी भाषांतर)].