विभाग नववा : ई-अंशुमान
ओषण - प्र३ हा वायू व्हान मॅरम (१७८५) ह्यानें, जर प्राणवायूंत विद्युत्सफुल्लिंग पाठविला तर तयार करितां येतो असें दाखविलें. ह्यानंतर हा वायू निरनिराळ्या पद्धतींनीं तयार करूं लागले. अम्लमिश्रित पाण्यांतून जेव्हां विद्युत्प्रवाह जातो त्यावेळेस जो प्राणवायु उत्पन्न होतो त्यांतहि हा सापडतो. भारद्विप्राणिदावर (बेरिअम पेरॉक्साइड) प्लाविना (ल्फुओरिन) ची क्रिया केली असतांहि हा मिळतो. परंतु या सर्व कृतीमध्यें हा वायु प्राणवायुमिश्रित असा सांपडतो.
ओषणवायूस एक चमत्कारिक वास येतो. व त्याला रंग नसतो, परंतु तो द्रवरूपांत आणतात तेव्हां त्याचा निळा रंग असतो. हा तीव्र प्राणिदीकारक आहे. आणि सेंद्रिय रसायनावर ह्याचा परिणाम फार लवकर घडतो. त्याचा कर्बयुक्त पदार्थांशीं संयोग होऊन निरनिराळीं रासायनिक द्रव्यें होतात.
याची अन्तर्घटना काय असावी हा प्रश्न होता. परंतु ओषणापासून जेव्हां प्राणवायु करतात तेव्हां जें आकारमान वाढतें त्यावरून ओषणाचा परमाणु तीन अणूंचा बनलेला असतो हें सिद्ध करतां आलें. त्याचें परमाणूमूल्य ४७ ७८ आहे असें हेडनबर्गनें दाखविलें.