विभाग नववा : ई-अंशुमान

ओसाका अथका ओझावा - हें शहर जपानमधील सेस्सु प्रांतांत आहे. याची लोकसंख्या इ. स १९०८ सालीं १२२६५९० होती. हें ओसाका आखातावरील सपाट मैदानावर वसलें आहे. याच्या आखाताकडील बाजूस विवा तळ्याचा एक सांड वाहत असून त्याच्या दोन्ही तर्फा उंच टेकड्यांची रांग आहे. या शहरांतून नदीचे फांटे व कालवे इतके गेले आहेत कीं, नवीन पाहणारास एखाद्या डच शहराचा भास होतो. हें एक आगगाडीचें महत्त्वाचें केंद्रस्थान असून येथून कोबे शहरास आगबोटी जातात. येथील बहुतेक घरें लांकडी आहेत. १९०९ सालीं या शहरास आग लागली व त्यामुळें सुमारें १२००० घरें व इतर इमारती जळाल्या. येथील किटाहमा नांवाच्या राजमार्गावर एक झुलता लोखंडी पूल बांधला आहे. येथील कावागूची भागांत कांहीं परदेशस्थ धर्मप्रसारक लोकांची वस्ती आहे. येथे बौद्ध व शिंतो पंथाचीं पुष्कळ देवालयें आहेत. याच्या शिवाय येथील पाहण्यासारख्या इमारती म्हटल्या म्हणजे, किल्ला, टांकसाळ व शिलेखाना (दारूगोळ्याची कोठी) ह्या होत. येथील किल्ला हिडेयोशी यानें सन १५८३ त बांधला. सध्यां याचा लष्करी छावणीकडे व शिलेखान्याकडे उपयोग होतो. येथील टांकसाळ इ. स. १८७१ त यूरोपियन लोकांनीं स्थापली व सध्यांहि तिची व्यवस्था त्यांकडेसच आहे. येथें लोखंडी काम करण्याचे, साखर शुद्ध करण्याचे व कापूस पिंजण्याचे कारखाने आहेत. येथें जहाजें बांधण्याचेंहि काम होतें. येथील व्यापार व लोकसंख्या वाढत्या प्रमाणांत आहेत.

हें शहर शिनशु घरण्याच्या ८ व्या पुरूषानें म्हणजे रेमीओ शोनिन यानें १४९५-९६ च्या दरम्यान वसविलें. १५८३ त हिडेयोशी यानें येथें आपली राजधानी केली. १८६८ पासून याचा परदेशाशीं व्यापार सुरू झाला.