विभाग नववा : ई-अंशुमान
ओस्टीयाक - पश्चिम सैबेरियांत ऑब नदीच्या कांठीं रहाणार्या एका जातीला ओस्टिआक म्हणतात. त्यांचा व्होगल लोकांशीं संबंध आहे. ते ठेगणे असून त्यांचे केंस काळे व मऊ, डोळे काळे, नाक रूंद व चपटें, व ओठ जाड असतात. ही जात मिश्र उत्पत्तीची आहे. ओस्टीयाक लोक सौम्य, शांत स्वभावाचे असून प्रामाणिक असतात. या लोकांत चोरी व दंगेधोपे होत नाहींत. लांकडांवर नकशीकाम करणें व कातडीं कमावणें या कामांत ते फार वाकबगार आहेत. यांची थोडीशी माहिती बुद्धोत्तर जग (पृ. ४०३) या विभागांतहि दिली आहे.