विभाग नववा : ई-अंशुमान
औट्रम (सर जेम्स) - (१८०३-१८६३). हा प्रसिद्ध इंग्लिश सेनापति बेंजामिन औट्रम या एंजिनीयरचा मुलगा होता. त्याच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या आंतच त्याचा बाप वापल्यामुळें त्याची आई त्याला घेऊन अबर्डीन येथें रहावयास गेली. तेथेंच त्याचें प्राथमिक शिक्षण झालें. १८१८ सालीं अबर्डीन येथील मॅरिस्कल कॉलेजमध्यें त्याला ठेवण्यांत आलें. १८१९ सालीं हिंदुस्थानच्या लष्करी खात्यांत उमेदवारीची जागा त्याला मिळाली. अर्थात त्यासाठीं मुंबईस यावें लागलें. मुंबईस असतांना त्यानें आपले गुण तेथील अधिकार्यांच्या नजरेस आणल्यामुळें त्याला १८२० च्या जुलै महिन्यांत १२ व्या पलटणीच्या पहिल्या तुकडीवर तात्पुरतें (अॅडज्यूटंट) जनरल म्हणून नेमण्यांत आलें. या जागेवर असतांना त्याला पुष्कळ प्रकारचे अनुभव आले; व त्याचा त्याच्या पुढील आयुष्यांत त्याला फार फायदा झाला. १८२९ सालीं त्याची खानदेश येथें बदली झाली. खानदेश येथें असतांना तेथील भिल्ल लोकांवर त्यानें आपल्या अंगच्या कर्तबगारीनें चांगली छाप बसविली. व त्यांचें एक पथक निर्माण करून शास्त्रीय पद्धतीनें त्या पथकाला त्यानें चांगलें लष्करी शिक्षण दिलें. या पथकाच्या साहाय्यानें खानदेशांतील लुटारूंचा त्यानें चांगला बंदोबस्त केला. त्याला शिकारीचा विलक्षण नाद असल्यामुळें व शिकारीवर असतांना आणीबाणीच्या वेळीं जीं त्यानें अनेक अचाट साहसें केलीं त्यामुळें या भिल्ल लोकांची त्याच्यावर अतिशय भक्ति जडली होती. लहानपणीं तो फार अशक्त असे पण पुढें त्यानें चांगलेंच शरीर कमावलें व तो तारूण्यांत पुर्या सहा फूट उंचीचा जवानमर्द बनला. १८३५ मध्यें त्याला गुजराथमध्यें धाडण्यांत आलें व तेथें असतांना कांहीं काळ त्यानें ‘पोलिटिकल एजंट’ या नात्यानें काम केलें.
१८३८ मध्यें पहिलें अफगाण युद्ध सुरू झालें. त्या वेळीं सर जॉन कीन याचा ए. डी. सी. म्हणून त्याची नेमणूक झाली. या कामावर असतांना त्यानें पुष्कळ शौर्याचीं कृत्यें केलीं. त्यांतल्या त्यांत गझनीजवळील झटापटींत शत्रूंचें निशाण काबीज करण्यांत त्यानें जी मर्दुमकी गाजविली ती खरोखर वाखाणण्यासारखी होती. या त्याच्या धाडसी कृत्यामुळें त्याला मेजरचा हुद्दा प्राप्त झाला. १८३९ मध्यें त्याला लोअर सिंधचा पोलिटिकल एजंट नेमण्यांत आलें. नंतर थोड्याच दिवसांत अपर सिंधचा पोलिटिकल एजंट म्हणूनहि त्याची नेमणूक झाली. या जागेवर असतांना त्याचा वरिष्ठ अंमलदार सर चार्लस नेपीयर हा होता. नेपीयरच्या मनांत अपर सिंध खालसा करावयाचा होता. या गोष्टीला ओट्रम हा प्रतिकूल होता. त्यानें नेपीयरच्या कृत्यावर निर्भिडपणें सणसणीत टीका केली. पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. पुढें कांहीं दिवस लोटल्यानंतर ८००० बलूंची लोकांनीं हैद्राबाद येथील गोर्या लोकांच्या छावणीवर छापा घातला. त्यावेळीं औट्रम यानें आपल्या शौर्याची पराकाष्ठा करून आपल्या छावणीचें संरक्षण केलें. या वेळीं त्याची सर्वांनीं फारच तारीफ केली. खुद्द नेपीयर साहेबानेहि ‘हिंदुस्थानचा बायार्ड’ असें यास उपनांव दिलें.
१८४३ मध्यें त्याला मराठी मुलुखांत धाडण्यांत आलें. या वेळीं त्याला लेफ्टनंट कर्नल असा हुद्दा मिळालेला होता. १८४७ त त्याला बडोदा येथें पाठवण्यांत आलें. बडोद्यास असतांना, त्यानें इंग्रज अधिकार्यांनीं चालविलेल्या लांचलुचपतीच्या प्रकारावर उघड टीका केली. त्यामुळें मुंबई सरकारचा त्याच्यावर कांहीं काळ रोष झाला. १८५४ मध्यें लखनौच्या रेसिडेंटच्या जागीं त्याची नेमणूक झाली. १८५६ सालीं त्यानें अयोध्या प्रांत इंग्लिशांच्या राज्याला जोडला व तो त्या प्रांताचा कमिशनर झाला. १८५७ मध्यें तो लेफ्टनंट जनरल झाला व त्याला पर्शियावर स्वारी करण्यास धाडण्यांत आलें. खूशाब येथें त्यानें शत्रूंची कत्तल करून त्यांनां शरण यावयास लावलें. या त्याच्या पराक्रमाबद्दल त्याला ‘ग्रँड क्रॉस ऑफ दि बाथ’ हा बहुमानाचा किताब देण्यांत आला.
पर्शियामधून त्याला पुन्हां हिंदुस्तानांत बोलावण्यांत आलें, व कलकत्त्यापासून तो कानपूरपर्यंतच्या टापूंत जें लष्कर होतें त्याच्यावर त्याला अंमलदार नेमण्यांत आलें. याशिवाय अयोध्येच्या कमिशनरचें काम त्याच्याचकडे सोंपविण्यांत आलें. हें साल १८५७ होतें. बंडाच्या धामधुमीला नुकतेंच तोंड फुटलें होतें. बंडखोरांच्या मार्यापुढें टिकाव धरणें अशक्य झाल्यामुळें हॅवेलॉक सेनापतीला कानपूर येथें आश्रय घ्यावा लागला होता. औट्रम हा आपल्या सैन्यानिशीं कानपूर येथें हॅवेलॉकच्या मदतीला आला. त्यानें लगेच हॅवेलॉकला लखनौ येथील फौजेच्या मदतीला पाठवलें व त्याच्याबरोबर स्वयंसेवक या नात्यानें तो गेला. मंगलवार व अलमबाग येथील हल्ल्यांत त्यानें चागलेंच शौर्य गाजविलें व शत्रूंचा धुवा उडविला. त्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉस देण्यांत आला. लखनौच्या दुसर्या वेढ्यांच्या प्रसंगी गोमती नदीच्या बाजूच्या बंडवाल्यांच्या सैन्यावर त्याला पाठवण्यांत आलें. या हल्ल्यांतहि त्यानें जय संपादन करून बंडवाल्याचा कायमचा बंदोबस्त केला. लखनौ इंग्लिशांच्या ताब्यांत आलें. औट्रम याला लेफ्टनंट जनरल करण्यांत आलें. १८५८ मध्यें पार्लमेंटमध्यें त्याचे जाहीररीत्या आभार मानले. व त्याला बॅरोनेट करण्यांत येऊन एक हजार पौंडांचा सालिना तनखाहि देण्यांत आला. पुढें त्याची प्रकृति नादुरूस्त झाल्यामुळें तो १८६० मध्यें इंग्लंडास परत गेला. त्यानें केलेल्या शौर्याबद्दल त्याचें अभिनंदन करण्यासाठीं इंग्लिशांनीं एक टूम काढिली व त्याप्रमाणें त्याल एक मानपत्र अर्पण करण्यांत येऊन, लंडन व कलकत्ता येथें त्याचा पुतळा उभा करण्याचें ठरलें. तो १८६३ च्या मार्च महिन्यांत मरण पावला. त्याचें शव वेस्ट मिन्स्टरमध्यें पुरण्यांत आलें व त्याच्या थडग्यावर ‘बायार्ड ऑफ इंडिया’ हे अर्थपूर्ण शब्द कोरण्यांत आले.
[संदर्भग्रंथ:- सर एफ्. जे गोल्डस्मि-जेम्स औट्रम ए बायॉग्रफी २ भाग (१८८०); एल. जे ट्राटर-दि बायार्ड ऑफ इंडिया (१९०३)].