विभाग नववा : ई-अंशुमान
औतें - शेतकीच्या कामास उपयोगी पडणार्या हत्यारांनां औतें म्हणतात. थोड्या मजुरींत फार काम होण्यास चांगल्या औतांची फार जरूरी असते. यूरोप, अमेरिका वगैरे देशांप्रमाणें हरएक कामीं लागू पडणारीं अशीं अनेक सोयिस्कर औतें आपल्या इकडे नाहींत. परिस्थितिनुरूप उत्तम लागूं पडावें म्हणून एकाच जातीच्या औतांत अनेक प्रकार असावे. विशेष परिश्रम न पडतां काम उत्तम व्हावें व तें करतांना करणारास आनंद व हुरूप यावा अशीं औतें असणें फार जरूर आहे. औत (नांगर) वापरण्याची चाल आपणाकडे वेदकालापासूनची आहे. ऋग्वेदांत लांगल व सीरा हे शब्द आढळतात. सीरा (नांगर) ओढण्यास बैलांचा उपयोग करीत असत.
कुणब्यानें औतांची निवड करतांना जमीनीची जात, लागवडीचें आकारमान, पिकाची जात, लागवडीचें धोरण व उत्पन्नाची त्वरितता इतक्या गोष्टींकडे लक्ष दिलें पाहिजे. खडकाळ अगर चिकण जमीनीवर वापरण्याचें औत रेताड व भुसभुशीत जमिनीस नालायक होय.
मळ्यास लागणार्या औतांत जनावरांनीं चालणारीं नांगर, कुळव, दंताळें, मैंद, पेटारीं हीं औतें असून हातानें उपयोगांत येणारीं कुदळ, फावडें, टिकाव, पहार हीं होत. लागवडीस व लागवडीनंतर उपयोगांत येणारीं करवडी, कोळपें, पाभर, खुरपीं वगैरे होत. गाडी, टोपल्या हीं स्थलांतरासाठीं उपयोगांत येणारीं औतें व कोयता, विळा, कोयती, कुर्हाड हीं कापणीचीं औतें होत.
यांतील मुख्य औत नांगर हें होय जमीन फोडून खालचा थर वर आणणें हें त्याचें कार्य असतें. नांगरलेल्या जमीनींतील ढेकळें फोडण्याचें काम मैंदानें करतात. यानंतर दंताळ्याचा उपयोग करावयाचा असून त्यानें जमीन मोकळी होते. कुळवाचेंहि हेंच काम असतें. लागवडींत उगवलेलें गवत काढून रान मोकळें करण्यास कोळप्यांचा उपयोग होतो. खुरप्याच्या योगानें हातानें भांगलण करतात. बीं पेरण्याच्या औतास पाभर म्हणतात. यासहि दंतालयाप्रमाणें दांते असून त्यांत पोकळ वेळूच्या नळ्या बसविलेल्या असतात. त्या सर्व नळ्यांचीं तोंडें एकत्र करून त्यांवर एक लाकडी पेटी अथवा चाढें बसविलेलें असतें. तींत बीं टाकलें म्हणजे तें नेमकें दात्यांनीं पडलेल्या चरांत जाऊन पडतें.
आपल्याकडील शेतीच्या कामीं हल्लीं उपयोगांत येणारीं हीं सर्व औतें अगदीं जुन्या पद्दतीचीं असून त्यांच्यांत पुष्कळ सुधारणा होणें जरूर आहे. तसेंच कांहीं नवीन म्हणजे पिकावरील कीड धुवून काढण्याचे पंप, कापणीचीं हातयंत्रें वगैरे औतें प्रचारांत येणें जरूर आहे. वाफेनें चालणारे अगर मोटारनांगर व नांगराखेरीज इतर लोखंडी औतें यांचा उपयोग मोठमोठ्या जमीनींवरच होण्यासारखा असल्यामुळें जेथें जमीनीचे लहान लहान तुकडे गरीब शेतकर्यांच्या ताब्यांत असतात तेथें त्यांचा मुळींच उपयोग न होतां त्यांतील सुधारणांचा खरा फायदा लोकांस मिळत नाहीं. या बाबतींत लोखंडी नांगरानें मात्र चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. यासाठीं त्यांचा थोडा पूर्वेतिहास लिहिल्यास उपयुक्त होईल.
लोखंडीं औतें किंवा नांगर हीं प्रथम महाराष्ट्रांत केव्हां आलीं याचा शोध करूं जातां असें आढळतें कीं, अगदीं मागें म्हणजे सुमारें सन १८४० सालच्या प्रसिद्ध झालेल्या ऑग्रिहॉर्टिकल्चरल सोसायटीच्या रिपोर्टांत लोखंडी नांगर किंवा औतें इकडे उपयोगांत आणावीं असा उल्लेख आहे. व तेव्हांपासूनच कोणत्यांना कोणत्या प्रकारचीं लोखंडी औतें इकडे आणण्यास सुरूवात झाली. सन १८८० सालीं सायन्स कॉलेजमध्यें असलेल्या शेतकी क्लासांत दुचाकी फिरत्या फाळाचे नांगर चालवून दाखविले जात होते असें त्या वेळचे विद्यार्थी व हल्लींचे शेतकी खात्यांतील पेन्शनर सांगतात; व याच वेळेपासून शेतकी खात्यानें निरनिराळ्या जातींचे नांगर व औतें आणून चालवून पाहण्याचा प्रयत्न जोरानें सुरू केला. त्यावेळीं शेतकी खातें नुकतेंच निघालें असल्यामुळें हैद्राबाद (सिंध), भडगांव (खानदेश) व पूना डेअरी अशा तीन ठिकाणीं सरकारी शेतें होतीं व त्याच ठिकाणीं सर्व प्रयोग होत असत. सन १८८५ ते १८९० सालापर्यंत स्टॉर्मंड मॅसे आणि कंपनी, रॅन्सम व सिम्स अँड हेड या तीन मेकरचे नांगर चालवून पाहण्याचे प्रयोग चालू होते. या नांगरांबरोबरच गवत कापण्याचें यंत्र, बी पेरण्याचें यंत्र, वाफेनें चालणारीं मळणीचीं यंत्रें, जीन्स वगैरे चालवून पाहिलीं जात होतीं. गवत कापण्याच्या यंत्रानें रोज ५० माणसांचें काम होतें व सीड-ड्रीलमधून एकदम सोळा ओळी उत्तम तर्हेनें पेरतां येतात असा उल्लेख आहे. सन १८९० सालीं मॉलिसन साहेब “सुपरिटेंडंट ऑफ फॉर्मस” म्हणून आले त्यांच्या वेळीं बरेच लोखंडी नांगर असून शिवाय तीन चार जातींचे जर्मन नांगर चालवून पाहण्याकरितां आले होते. परंतु ते चांगले ठरले नाहींत. या साहेबांनींच “प्लॅनेट जुनिअर हो” नांवाचीं बैलांनीं चालणारीं कोळपीं सुरू केलीं, व त्यांचा कापसाच्या पिकांत उपयोग केला जात असे. रॅन्सम सिम्स अँड हेड याच कंपनीचे नांगर चांगले म्हणून शेतकी खात्यानें ठरविलें होतें; व त्यासंबंधीं प्रथम सरकारी फार्मावर खात्री करून घेऊन बाहेर प्राप्यक्षिकें भरविलीं जात होतीं. इतकेंच नव्हे तर नांगर ठिकठिकाणीं चालवून दाखविण्याचे कामीं स्वतंत्र आफिसर म्हणून रा. जी. के. केळकर यांची नेमणूक झाली होती व हें काम ते दोन वर्षेंपर्यंत करीत होते. कारण त्या वेळपर्यंत लोखंडी नांगर चांगला किंवा वाईट, त्यांपैकी कोणत्या जातीचा चांगला हें प्रयोग करून ठरत होतें. १९०० सालापासून रॅन्सम सिम्स अँड जोफ्रस कंपनीचेच नांगर चांगले म्हणून त्यांचाच प्रसार करणें शेतकी खात्यानें सुरूं केलें. पुढें १९०४ सालापासून प्रोफेसर नाईट यांची नेमणूक झाली. कारण या वेळपर्यंत शेतकी खात्याची बरीच वाढ होऊन दोन तीन नवीन शेतें निघालीं व कांहीं अधिकारी नेमले गेले. नाईट साहेबांनीं रॅन्सम नांगरांच्या जोडीला अमेरिकेहून अर्लिगन कंपनीचे नांगर आणवले व कांहीं दिवस दोन्ही नांगरांचा प्रसार सुरू होता. परंतु त्या वेळचे शेतकी खात्याचे डायरेक्टर किटिंग साहेब यांनां अर्लिगन नांगराचा प्रसार होणें पसंत न पडल्यामुळें रॅन्सम नांगराच्या प्रसारास तेव्हांपासून फार उत्तेजन मिळालें, व त्या कंपनीचे एटी २, बीटी २, सीटी २, डीटी २, अशा हलक्या व भारी नांगरांचा प्रसार फार होऊं लागला.
पुढें रॅन्सम नांगरांच्या धर्तीवर किर्लोस्कर कंपनीनें नांगर काढले व विलायती नांगरांच्या धोरणानें किंमती ठेवल्या. त्या वेळीं शेतकी खात्याच्या प्रदर्शनाचे ठिकाणीं व मुद्दाम प्रात्यक्षिकें भरवून लोखंडी नांगरांच्या उपयुक्ततेबद्दल लोकांची खात्री पटत चालली होती. अर्थातच लोखंडी नांगरांचा खफ फार होऊं लागला.
लोखंडी नांगर तयार करण्याचे कारखाने महाराष्ट्रांत हल्लीं बरेच आहेत. किर्लोस्कर कंपनी (किर्लोस्कर वाडी) पोतदारांचा कारखाना (इचलकरंजी), सातारा इंडस्ट्रियल वर्कस हे कारखाने प्रसिद्ध आहेत. परदेशी नांगरहि बरेच बाजारांत आहेत.