विभाग नववा : ई-अंशुमान
औदीच्या ब्राह्मण - उत्तरे (उदीची) कडून हे गुजराथेंत आले म्हणून यांनां औदीच्या असें नांव पडलें. १९११ च्या खानेसुमारींत मुंबई इलाख्यांत एकंदर ८३१८० औदीच्या आढळले, पैकीं उत्तर भागांत १६८४३ व गुजराथेंतील संस्थानी भागांत ६२१२७ होते. एकंदर औदीच्या ब्राह्मणांतले अजमासे निम्मे तर एकट्या बडोदें संस्थानांत आहेत. यांच्या आगमनासंबंधीं एक अशी कथा सांगतात कीं अनहिलवाडचा राजा मूलराव (इ. स. ९६१-९६) यानें यज्ञसंमारंभाकरितां या ब्राह्मणांनां उत्तरेकडून बोलविलें व समारंभ पार पडल्यावर त्यानीं आपल्या राज्यांत रहावें म्हणून कांहीं जमिनी इनाम देऊ केल्या. ज्या एक हजार ब्राह्मणांनीं ताबडतोब या देणगीचा स्वीकार केला, त्यांनां ‘सहस्त्र औदीच्या’ व ज्यांनीं आपली एक टोळी बनवून प्रथम इनामें घेण्याचें नाकारलें त्यांनां ‘टोळकिया औदीच्या अशीं नांवें पडलीं. टोळकियांची संख्या बडोदें संस्थानांत चार हजारांपेक्षां जास्त नाहीं सहस्त्रे हे टोळकियांपेक्षां उच्च दर्जाचे गणले जात असून त्यांच्यांत पुन्हां सिहोरा व सिद्धपुरिया असे भेद आहेत (सिहोरा भावनगर संस्थानांत व सिद्धपूर बडोदे संस्थानांत एक शहर आहे).
औदीच्या ब्राह्मम बहुधा भिक्षेवर रहातात; कांहीं थोडे शेतकरी; आचारी किंवा उपाध्ये म्हणून आहेत. हलक्या जातींच्या लोकांची भिक्षुकी केल्यामुळें यांच्यांत अनेक पोटवर्ग निर्माण झाले आहेत. उदा. दर्जीगोर (शिंप्याकडे काम करणारे), हजामगोर (हजामाकडे काम करणारे), कोळीगोर, गोचीगोर, इत्यादि. हुक्का ओढणारे, विधवांचा पुनर्विवाह लागणारे आणि शेतावर शिजविलेलें अन्न घेऊन जाणारे औदीच्या हलक्या प्रतीचे समजून त्यांच्याशीं इतर ब्राह्मण व्यवहार करीत नाहींत. तथापि या औदिच्यांच्या मुली काठेवाडांतल्या हालावाडा औदीच्यांच्या घरीं पडल्या तरी चालतात. हालावाडा औदीच्यांच्या घरीं पडल्या तरी चालतात. हालावाडा औदीच्यांच्या मुली धांगध्रा औदीच्यांच्या घरीं, व धांगध्रा औदीच्यांच्या मुली अति उच्च दर्जाचे म्हणून गणले जाणारे जे विरमगांव, अहमदाबाद व सिद्ध पुरी औदीच्या यांच्या घरीं बिनतक्रार पडतात. सिद्धपुरिया औदीच्याला आपली मुलगी देणें हें मोठें मानाचें लक्षण मानिलें जातें कारण तो सर्वश्रेष्ठ ब्राह्मण होय. तेव्हां सिद्धपुरिया नवर्याला फार मागणी असते व त्यामुळें बहुपत्नीत्वाची चाल त्या जातीमध्यें आली, जातींतील लोकांच्या स्थलांतरामुळें रोधवाल, नापाल, बोरसाद आणि हलसोला अशा ब्राह्मण जाती बनल्या असून, कोलिगोर, राजगोर, कायातिया, क्रियागोर, व्यास आणि तारगाला या जाती औदीच्यांनीं हलकीं कामें पत्करल्यावरून बनल्या आहेत. १९११ च्या खानेसुमारींत औदीच्या ब्राह्मणांपैकीं दर हजारीं १४८ पुरूष व त्यापैकीं शेंकडा २७ स्त्रिया भिक्षा, तनुविक्रय, गुन्हेगारी वगैरे धंद्यांत असतात असें दिलें आहे. हें धंद्याचें सदर ब्राह्मणांमध्यें फक्त याच वर्गांत दाखल केलें आहे. यांची लग्नरीति पुढें वर्णन केल्याप्रमाणें असते.
ल ग्न वि धि.- यांच्यामध्यें वधूवरांच्या वयाची इयत्ता ठरलेली नाहीं. वाग्दान करण्याकरितां वरपक्षाची मंडळी कन्यापित्याच्या घरीं जाते. तेथें यथाशास्त्र वाग्दानविधि झाल्यावर दोन्ही पक्षाची मंडळी परस्परांस सवाशेर बत्तासे देतात. ‘विवाह’ म्हणजे वाग्दान हें तोंडी ठरावानें करण्यांत येतें. त्यानंतर गणपतिपूजन होऊन व्याही परस्परांस पांच पांच सुपार्या देतात. कन्यापिता वराच्या हातीं एक रूपया, सुपारी व नारळ देऊन त्याचा उजवा पाय धुवून त्याची पूजा करितो. वाग्दान झाल्यापासून पुढें लग्न होईपर्यंत सणावारांच्या दिवशीं वरपिता वधूला कांहीं वस्त्र खेळण्याच्या वस्तू, व खाऊ पाठवितो. लग्नदिवशीं दोन्हीकडे ग्रहशांति होऊन वधुवरांस हळद लावितात. वरप्रस्थान आणि ‘कलवो’ श्रीगौड ब्राह्मणांच्या चालीप्रमाणेंच आहे. ‘कलवो’ येऊन गेल्यावर वरपक्षाकडून वधूला घालावयाचे अलंकार वगैरे पाठवितात. लग्नमुहूर्त नजीक येतांच नवरामुलगा स्नान करून जानवसघराहून वधूगृहीं जातो तेथें त्याची भावी सासू सामोरी येऊन त्यास घरांत घेऊन जाते नंतर लग्नाचीं यथाशास्त्र सर्व कर्में मंडपांत बहुल्यावरच होतात. (अलोनीकृत लग्नविधि व सोहाळे पहा.)
यांच्यामध्यें शैक्षणिक स्थिति चांगली नाहीं. यांच्या स्त्रियांचें प्रमाण अनेक हलख्या जातींतील स्त्रियांपेक्षां अधिक आहे.
[ मुं. गॅ. सेन्सस रिपोर्ट १९११, पु. १६ (बडोदे), व पु. ६ (मुंबई). ]