विभाग नववा : ई-अंशुमान
औरंगाबाद वि भा ग - हैद्राबाद संस्थानचा वायव्येकडील विभाग. यांतील महत्त्वाचीं गांवें:- औरंगाबाद, जालना, कादिराबाद, नांदेड, अंबा, परळी, औरंगजेब मलिकंबर व कुतुबशाहींतला शेवटचा अबूल हसन यांचीं थडगीं येथें [रौझा] आहेत. क्षे. फ. ६१७२ चौ. मै. या प्रांताची लो. सं. (१९११) २९७६५४१ आहे.
मर्यादा व साधारण वर्णन.- उत्तरेस बालघाट किंवा उंचवट्याचे प्रदेश” व दक्षिणेस पायघाट “किंवा सखल प्रदेश” असे या जिल्ह्याचे दोन भाग आहेत. उत्तर भागांतील डोंगर हे वर्हाडांतील बालाघाटाचेच भाग आहेत. महादेवाचे डोंगर, सर्पनाथाचे डोंगर, गोवाताला किंवा अजिंठ्याचे डोंगर आणि सात माळ्याचे डोंगर ह्याहि दुसर्या रांगा आहेत. अजिंठा व वेरूळ येथील प्रसिद्ध लेणीं बासाल्ट नांवाचे खडक खोदून केलेलीं आहेत. ह्या जिल्ह्यांतील मुख्य नदी गोदावरी ही सरहद्दीवरून १२७ मैलपर्यंत वहाते. या जिल्ह्यातील हवा साधारणपणें निरोगी आहे. परंतु पावसाळ्यात व हिवाळ्यात मलेरियाचा आजार सुरू असतो. वेरूळच्या आग्नेय दिशेला हें सर्वांत रमणीय ठिकाण आहे.
जि ल्हा:- या जिल्ह्यांचील पावसाचें सरासरी वार्षिक मान २५ इंच आहे. दक्षिणेच्या इतिहासांत हा जिल्हा बराच महत्त्वाचा आहे. ख्रिस्ती शकापूर्वी या जिल्ह्यातील पैठण हें ठिकाण फार महत्त्वाचें होतें. दुसरा पुलुमायी ह्या आंध्र राजाची तेथें राजधानी होती असें टॉलेमी यानें लिहिलें आहे. तिसर्या शतकांत आध्रसत्ता मोडकळीस आली. व त्यानंतर तीन शतकांनीं हा प्रदेश चालुक्यांच्या अंमलाखालीं गेला सातव्या शतकांत दुसरा पुलकेशि हा राजा राज्य करीत असतां ह्युएनत्संग हा अजिंठ्याचीं लेणीं पहाण्याकरितां गेला होता. इ. स. ७६० च्या सुमारास राष्ट्रकूटांनीं चालुक्यांनां जिंकून आपलें राज्य स्थापिलें. त्यांच्यापैकीं पहिला कृष्णराजा यानें वेरूळ येथें खडक खोदून कैलास हें देवालय तयार केलें. नंतर ९७३ त चालुक्यांनीं आपलें राज्य परत मिळविलें. यादव किंवा सेऊण हे त्यांचे मांडलिक होते. यानंतर मध्यंतरीं बरेच राजे होऊन गेले; परंतु ११८७ त भिल्लम यानें देवगिरी येथें प्रथम स्वतंत्र राज्य स्थापिलें. नंतर त्याचा नातू सिंघण यानें आपलें राज्य उत्तरेस खानदेश व दक्षिणेस म्हैसूरपर्यंत वाढविलें. त्यानें गुजराथवरहि स्वारी केली होती. १२९४ त अल्लाउद्दीनानें दक्षिणेवर स्वारी केली व यादव कुळांतील शेवटचा राजा रामचंद्र याचा पराभव करून त्यापासून पुष्कळशी लूट आणि खंडणीचें अभिवचन मिळविलें. पुढें रामचंद्रानें खंडणीचें अभिवचन न पाळिल्यामुळें अल्लाउद्दीनानें मलिक काफूर यास १३०७ मध्यें दक्षिणेवर पाठविलें. रामचंद्रानें त्यास शरण जाऊन खंडणी देण्याचें कबूल केलें; परंतु त्याच्या मागून येणार्या राजांनीं हा करार न पाळल्यामुळें दक्षिणेवर मुसलमानांच्या वारंवार स्वार्या होऊं लागल्या. शेवटीं १३१८ त हरपाळ मारला जाऊन यादवांच्या सत्तेचा शेवट झाला. १३४७ पासून १४९९ पर्यंत या जिल्ह्याचा समावेश ब्राह्मणी राज्यांत व पुढें अहमदनगरच्या राज्यांत झाला. १६०० त चांदबिबीचा खून होऊन मोंगलांनीं अहमदनगर घेतलें अहमदनगरचा वजीर मलिक अंबर यानें मोगलांशीं पुष्कळ लढाया केल्या व अखेर १६१० त खडकी येथें आपली राजधानी स्थापन केली. त्याच्या मरणानंतर औरंगाबाद व अहमदनगर हे जिल्हे मोगलांनीं आपल्या राज्यास जोडले. औरंगझेबानें खडकी नांव बदलून औरंगाबाद नांव ठेविलें. अठराव्या शतकाच्या आरंभीं हैद्राबाद संस्थानची स्थापना झाल्यावर औरंगाबदचा समावेश त्यांत झाला.
वेरूळ, औरंगाबाद व अजिंठा येथील बुद्ध, जैन व ब्राह्मण पद्धतीच्या कारागिरीचीं लेणीं प्रसिद्ध आहेत. १९११ त या जिल्ह्याची लो. सं. ८६९७८७ होती. शें. ८५ लोक हिंदू व शें. १२ मुसुलमान आहेत. शे. ७९ लोक मराठी भाषा बोलतात.
शेतकी:- येथील जमिनीचे तीन प्रकार आहेत:-(१) रिंगर, किंवा काळी कापसाची जमीन; (२) मसबू किंवा तांबूस जमीन व (३) मिळवा. किंवा पहिल्या दोहोंच्या मिश्रणानें झालेली जमीन. ज्वारी, बाजरी व गहूं हीं मुख्य पिकें होत. कडधान्यें, तांदूळ, कापूस गळिताचीं धान्यें वगैरे जिन्नसहि होतात.
गोदावरी खोर्यांतील (गंगथडी) घोड्यांची काटकपणाबद्दल पूर्वीं प्रसिद्धि होती.
या जिल्ह्यांत रयतवारी पद्धत सुरू आहे. येथील जमाबंदीची मुदत ३० वर्षें आहे. “जिराईत जमिनीवर सरासरी सारा एकरी एक रू. चौदा आणे व बागाईतीवर ५ रू. असतो.
व्यापार:- चांदीचीं भांडीं, कशिद्याचें काम, किनखाप, मश्रु व हिम्लू वगैरे जरतारी कामाबद्दल औरंगाबाद प्रसिद्ध आहे. पैठण व जालना येथें रेशमी व सुती लुगडी, पैठण्या, पितांबर होतात. कागदीपुरा येथें पुष्कळ प्रकारचे कागद होतात. कापूस, धान्य, रेशमी व सुती कापड, कातडीं, तंबाखू, गूळ, तांबें व पितळेचीं भांडीं वगैरे जिन्नस या जिल्ह्यांतून बाहेर जातात; व तांदूळ, मीठ, विलायती कापड, साखर, केरोसीन तेल, कच्चें रेशीम वगैरे जिन्नस बाहेरून येतात. व्यापाराचीं मुख्य ठाणीं औरंगाबाद, जलना व पैठण हीं होत. हैद्राबाद गोदावरी व्हॅली रेल्वेचा फांटा या जिल्ह्यांतून पूर्वपश्चिम गेलेला आहे.
राज्यव्यवस्था:- या जिल्ह्याचे ३ पोटविभाग आहेत. पहिल्या पोटविभागांत जालना, सिलोद, अंबर व भोकर्दन हे तालुके; दुसर्यांत गंगापूर, वैजापूर, पैठण, आणि कणाद तालुके; व तिसर्यांत औरंगाबाद आणि खुल्दाबाद हे तालुके आहेत. प्रत्येक भागावर एक एक तालुकदार असतो. प्रत्येक तालुक्यावर तहशीलदार नेमलेले आहेत. पैकीं एक तालुकदार हा पहिल्या वर्गाचा म्याजिस्ट्रेट असतो. जिल्हान्यायाधिशाला नाझीम-ई-दिवाणी असें म्हणतात. पहिल्या वर्गाच्या तालुकदाराच्या गैरहजेरींत तो फौजदारी कामहि पहातो. औरंगाबाद येथें जिल्हाबोर्ड व इतर तालुक्यांत तालुकाबोर्ड आणि म्युनिसिपालिट्या आहेत.
शहर.- हैद्राबाद संस्थानांत औरंगाबाद हें त्या विभागाचें, जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. लो. सं. (१९११) ३४९०१. १६१० त मलिकंबर यानें खडकी जवळ एक गांव बसवून त्याचें नांव फत्तेनगर असें ठेविलें. तो १६२६ मध्यें निवर्तल्यावर, अहमदनगरच्या राजांची सत्ता कमी होऊन १६३७ त त्यांचें राज्य मोंगलांच्या दक्षिणच्या सुभ्यामध्यें सामील झालें. इ. स. १६३५ व १६५३ या वर्षी औरंगझेब त्या प्रांताचा सुभेदार असतां तो खडकी येथें रहात असे व तेव्हांपासून त्यानें या गांवास औरंगाबाद असें नांव दिलें. औरंगझेबाच्या मरणानंतर पहिला निजाम असफजाह हा औरंगाबादेस येऊन स्वतंत्र झाला व पुढें त्यानें हैद्राबाद ही आपली राजधानी केली.
या शहराच्या उत्तरेस व दक्षिणेस सिचेल आणि सातारा या डोंगरांच्या रांगा आहेत. औरंगझेबाच्या वेळीं या शहराची लो. सं. २,००,००० होती असें म्हणतात. जुन्या शहराच्या पूर्वेस हल्लींचें शहर वसलेलें आहे व पश्चिमेस कोमनदीपलीकडे लष्करी छावणी आहे.
१८५३ त येथें अरब लोक व हैद्राबादची एक लष्करी तुकडी यांच्यामध्यें चांगली चकचक होऊन अरबांचा पराभव झाला. १८५७ त येथील सैन्यांत थोडीशी अस्वस्थता उत्पन्न होऊन छावणीवर हल्ला होण्याचा बेत दिसत होता. परंतु पुण्याहून इंग्रज सैन्याची मदत आल्यावर तेथील सैन्याला बिनहत्यारी कवाइतीकरितां बोलावून त्यांतील पुढार्यांनां पकडण्यांत आलें व पुढें त्यांची चवकशी लष्करी कोर्टापुढें होऊन २१ शिपायांनां बंदुकीनें व दोघांनां तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारण्यांत आलें.
सुभेदार, नाझीम-ई-सुभा, (पहिल्या वर्गाचा तालुकदार) वगैरे सरकारी कामगार येथें रहातात. हें व्यापाराचें मुख्य ठिकाण असून येथें रेशमी व जरीचें काम होतें. शहारांतील पाणी पुरवण्याच्या सोयी मलिकंबर व औरंगझेब यांच्या वेळीं तयार केलेल्या आहेत. व जरी त्या आतां थोड्या बहुत मोडकळीस आल्या आहेत तरी लोकांचें काम अद्याप त्यांवर भागतें. या शहरामध्यें व त्याच्या आसपास पुष्कळ पाहाण्यालायक स्थळें आहेत. त्यामध्यें मकबरा म्हणजे औरंगझेबाच्या बायकोचें (दिलरसबानूचें थडगें,) मलिकंबरनें बांधलेली जुमा मशीद, बोरमाल्लावळचा निजामाचा जुना राजवाडा व किल्ला आर्क म्हणजे औरंगझेबाचा राजवाडा हीं मुख्य आहेत. उत्तरेस २ मैलांवर औरंगाबादचीं लेणीं आहेत. शहारमध्यें १ औद्योगिक शाळा, १ कलाशिक्षणालय व ३ हायस्कुलें आहेत. पुष्कळसे सरकी काढण्याचे व कापूस दाबण्याचें कारखाने व कापडाच्या दोन गिरण्या आहेत. औरंगाबदासंबंधीं ऐति. उ. सांपडतात ते:-रा. खंड १ ले. ४८; खं. ६, ले. १; खं. ७ खंड १० ले. ५८९;खं. १८ ले. ५ येथें पाहावयास मिळतील.