विभाग नववा : ई-अंशुमान
और्व - वारूणी भृगूंच्या सात पुत्रांतील पहिला जो च्यवन त्याचा पुत्र. त्याला कोणी ऊर्व ऋषीचा पुत्र असेंहि म्हणतात. हा मातेच्या ऊरूचा (मांडीचा) भेद करून निघाला म्हणून यास और्व हें नांव पडलें. हा मोठा झाल्यावर यास असें कळलें कीं, हैहय कुलोत्पन्न राजांनीं आपल्या कुलांतील स्त्रियांस व पुरूषांस द्रव्यनिमित्त बहुत पीडा दिली होती. यास्तव त्यांचा नाश करण्यास यानें मोठें उग्र तप आरंभिलें. त्यापासून परम भयंकर अग्नि उत्पन्न होऊन तो त्या क्षत्रियांस जाळूं लागला. तेव्हां क्षत्रिय याच्या पितरांस शरण आले असावेत, म्हणून पितरांनीं येऊन याचा कोपानल याकडून समुद्रांत टाकविला. (भार. आ. १७९-१८१)