विभाग नववा : ई-अंशुमान
औसले सर विल्यम - (१७६९-१८४२) हा आयरिश प्राच्यविद्याकोविद मनामाउथशायर येथें जन्मला. याचें प्राथमिक शिक्षण घरींच झालें. त्यानंतर १७८७ मध्यें पॅरिस येथें फ्रेंच भाषा शिकण्याकरितां त्याला धाडण्यांत आलें. या ठिकाणीं असतांना त्याला पर्शियन भाषेची गोडी लागली. १७८८ मध्यें घोडेस्वारांच्या आठव्या तुकडीचा तो अंमलदार झाला. पण त्याची इच्छा पर्शियन शिकण्याची असल्याकारणानें आपल्या नोकरीला रामराम ठोकून तो लीडन येथें १७९४ सालीं पर्शियन भाषेचा अभ्यास करण्याकरितां गेला. १७९५ मध्यें त्यानें ‘पर्शियन मिस्लेनीज’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १७९७-९९ याच्या दरम्यान ‘ओरिएंटल कलेक्शनस’ हा ग्रंथ त्यानें प्रकाशित केला. १७९९ मध्यें ‘एपिटोम ऑफ दि एन्शन्ट हिस्टरी ऑफ पर्शिया; १८०० सालीं ‘दि ओरिएंटल जीऑग्रफी ऑफ इब्न हौकेल; १८०१ मध्यें ‘बखत्यारनामा’ चें भाषांतर व ऑबझर्व्हेशन्स ऑन सम मेडल्स अँड जेम्स’ असे ग्रंथ त्यानें प्रसिद्ध केले. १७९७ सालीं त्याला डब्लिन विश्वविद्यालयानें एलएल. डी. ची पदवी अर्पण केली. १८०० मध्यें त्याला नाइटहूडचा किताब मिळाला. १८१० मध्यें त्याच्या भावाला पर्शिया येथें वकील या नात्यानें इंग्लंडनें पाठविल्यामुळें त्याचा खासगी चिटणीस या नात्यानें वुइल्यम हा पर्शिया गेला. १८१३ मध्यें तो इंग्लंडला परत गेला १८१९-१८२३ या अवधींत त्यानें ‘ट्रॅव्हल्स इन व्हेरियस कंट्रीज ऑफ दि ईस्ट, एस्पेशलीं पर्शिया इन १८१०-१८११,१८१२’ हा ग्रंथ तीन भागांत प्रसिद्ध केला. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मासिकांत त्यानें पुष्कळदां लेख लिहिले. तो १८४२ मध्यें बोलोन येथें वारला.