विभाग नववा : ई-अंशुमान
अंकचक्र - कालगणनेंतील 'अंकचक्र' मद्रास इलाख्यांतील गंजम जिल्ह्यांत ओको किंवा अंक नांवाच्या चांद्र संवत्साचकंनुसार वर्ष मानितात. वर्षारंभ भाद्रपद शुद्ध १२ ला होतो. हें चक्र ५९ वर्षांचें असतें. पण वर्षागणनेंत एक वैशिष्ट्य असें आहे कीं, ६ हें वर्ष आणि ६ किंवा ० ज्याच्या शेवटीं आहे असें कोणतेहिं वर्ष गणनेंत धरीत नाहींत. उदाहरणार्थ, ५ या वर्षामागून ७ असें वर्ष मोजतात; असें करण्याचें कारण, कांहीं विशिष्ट संख्यांबद्दलची बरी वाईट कल्पना कदाचित असूं शकेल. या अंकचक्र-कालगणनेचा उगम अद्याप आढळला नाहीं; तथापि १२ व्या यातकांत व पुढें या देशांत व ओरिसा येथें राज्य करणारे जे गंग राजे त्यांच्यासंबंधीच्या इतिहासांतून हिच्या उपयोगाबद्दलची माहिती मिळण्याचा संभव आहे. शिवाय ओरिसामध्यें वहिवाटींत असलेल्या विलायती आणि अमली शकांतसुद्धां वर्षारंभ भाद्रपद शुल्क १२ पासून धरितात. यांवरून ७ व्या शतकांतील पहिला गंग राजा जो राजसिंह-इंद्रवर्मन याच्या राज्यभिषेकाचा हा दिवस असला पाहिजे असें दिसतें; व त्या दिवसाच्या स्मरणार्थ हे शक चालू केले असले पाहिजेत.