विभाग नववा : ई-अंशुमान
अंकलेश्वर ता लु का- मुंबई इलाखा. भाडोच जिल्ह्याचा दक्षिणेकडील तालुका. उ. अ. २१० २५' ते २१० ४३' पू.रे. ७२० ३५' ते ७३० ८'. क्षेत्रफळ २९४ चौरसमैल. लोकसंख्या (१९११) ६८९३१. या तालुक्यांत १ मोठें गांव व १०४ खेडीं आहेत. इ. स. १९०३-४ मध्यें एकंदर उत्पन्न ५.९ लाख रूपये होतें. या तालुक्यांत पाणीपुरवठा चांगला आहे.
गां व - मुंबई इलाखा. भडोच जिल्ह्यांतील त्याच तालुक्याचें मुख्य ठिकाण. उ.अ.२१० ३८' व पू. रें. ७२० ५९'. भाडोचच्या दक्षिणेस सहा मैलावर बी. बी. सी. आय. रेलवेचें हें एक स्टेशन आहे. लोकसंख्या १९२१ सालीं ११२६२ इतकी होती. व्यापाराचा मुख्य जिन्नस कापूस असून रूई काढण्याचे कांही कारखाने आहेत. या ठिकाणीं पूवीं कागद तयार करीत असत परंतु हल्लीं तो धंदा बसला आहे. इ. स. १८७६ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. इ. स.१९०३.४ सालीं तिचें उत्पन्न २३,६०० रूपये होतें. [ इं.गॅ.५.३८६.]
अंकलेश्वरासंबंधीं ऐतिहासिक उल्लेख पुढीलप्रमाणें आढळतात :- गुर्जरराजा दुसरा दद्द (इ. स.६२९-६४२) यानें ब्राम्हणांनां गांवें इनाम दिल्याबद्दलचे जे ताम्रपट सांपडले आहेत त्यांत अकूरेश्वर किंवा अंकुलेश्वर म्हणून जें गांवाचे नांव येतें तें अंकूलेश्वराचेंच प्राचीन नांव असावें असें डॉ. बुल्हर म्हणतात (इं. अॅ.५ ११३; १३. १९३;मुं.गॅ.पु.१.भ २ पा. ३१४.) अकूलेश्वराचा महाल इंग्रजास दिला नाहीं फक्त त्याबद्दल पाऊणलाख रूपये करार केले आहेत. परंतु सरकारचा कमाविसदार न बसूं देतां इंग्रज आपला कमाविसदार ठेवतात हें कराराविरूद्ध आहे. निदान महालाचा वसूल पावणेदोन लक्ष असल्यामुळें राहिलेले एक लक्ष सरकारांत दरसाल भरण्याविषयीं जनरलास बोलावें वगैरेबद्दलचीं, शके १६९७ अश्विनपासून १६९८ च्या वैशाखापर्यंतचीं लक्ष्मण आपाजी यांस पाठविलेलीं ७। ८ तक्रारवजा पत्रें रा. खं १२ ले ९९ ते १५४ पर्यंत मधून मधून आहेत.
श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना यांना लिहिण्यांत आलेल्या शके १७०१ मार्गशीर्षमधील पत्रात जलचर नर्मदा उतरून अंकलेश्वरी पोहोंचले वगैरे माहिती देऊन मदत मागविली आहे. असा उल्लेख रा. खं १० ते २४९ मध्यें आहे.
अंकलेश्वरास पूर्वी बंदर होतें तें मोंगलांनीं मोडलें, तेव्हां नवीन बंदर करण्याचा विचार आहे; पण भडोचकर रागावतील वगैरे वाटाघटा रा. खं. १० ले ३३४ मध्यें शके १७११ पौष वद्य १० च्या पत्रांत आहे.