विभाग नववा : ई-अंशुमान
अँकोना - इटली हें याच नांवाच्या प्रांताच्या राजधानीचें शहर असून धर्माध्यक्षाचें राहण्याचें ठिकाण आहे. हें बंदर बोलोनाहून ब्रिंडिसीला जाणार्या रेल्वे सडकेवर आहे. या शहराची लोकसंख्या १९०१ सालीं ५६८३५ होती. कोळसा, इमारतीचें लांकूड, धातु आणि ताग इतका माल परदेशाहून या बंदरांत येतो. या बंदराहून परगांवास जाणारा महत्त्वाचा माल म्हटला म्हणजे डांबर आणि कालशिअम कार्बाइड हा होय. साखर शुद्ध करण्याचें आणि जहाज तयार करण्याचें काम या बंदरीं लहान प्रमाणावर चालू आहे. येथें पूर्वी एक मोठें व्हीनसचें मंदीर होतें. तेथें हल्लीं एक ख्रिस्त मंदिर आहे. नकशीचें व कोरीव काम केलेल्या पुष्कळ इमारती आहेत. शहराच्या पूर्वेस मोठें बंदर आहे. येथें ग्रीक व्यापार्यांनीं एक जांभळ्या रंगाचा कारखाना घातला होता. येथील लोक ग्रीक भाषा बोलत असत. रोमचें राष्ट्र अस्तित्त्वांत होतें तेव्हां सुद्धां येथील लोक स्वत:चें नाणें वापरीत असत.
ख्रिस्ती शकाच्या १७८ वर्षापूर्वीं इलिरियन युद्धामध्यें आरमारचें ठिकाण म्हणून हें बंदर प्रसिद्ध होतें, पुढें सीझरनें तें आपल्या ताब्यांत घेतलें. येथें रोमन वसाहत केव्हां झाली तें कळत नाहीं. रोमन साम्राज्याचा र्हास झाल्यानंतर गॉथ्स,लाँबर्डस आणि सॅरॅसेन्स या लोकांनीं या बंदरावर हल्ला करून तें काबीज केलें; परंतु तें पुन्हां स्वतंत्र झालें. पुढें हें बंदर पोपच्या आधिपत्याखालीं अर्धवट प्रजासत्ताक होतें. परंतु इ. स.१५३२ मध्यें गॉन्झॅगोनें तें सातव्या क्लेमन्टकरितां आपल्या ताब्यांत घेतलें. इ. स. १७९७ पासून पुढें तें फ्रेंचांच्या ताब्यांत गेलें. यापुढें एक महत्वाचा किल्ला म्हणून अंकोनाचें नांव इतिहासांत येतें.