विभाग नववा : ई-अंशुमान
अंकोला तालुका :- मुंबई इलाखा उत्तर कानडा जिल्ह्यांतील पश्चिमेकडील तालुका. उ. अ.१४० ३४' ते १४० ५३' व पु.रे.७४० १५' ते ७४० ४०'. क्षेत्रफळ ३७५ चौरस मैल. या तालुक्यांत ९० खेडीं आहेत. लोकसंख्या सुमारें चाळीस हजार. इसवी सन १९०३-४ सालीं जमीन महसूल ८९००० रू. इतर कर ६००० रू. अंकोला हें तालुक्यांचें मुख्य ठिकाण आहे. हा भाग कुमटा तालुक्यांत पूर्वीं मोडत असे; परंतु इ. स. १८८० पासून हा स्वतंत्र तालुका करण्यांत आाला. पावसाची सरासरी येथें १३२ इंच आहे.
अंकोला नदी नावा चालविण्याइतकी मोठी असून अंकोला गांवापर्यंत नावा येतात. अंकोलाच्या बेलिकेरि, अंकोला, गंगावली आणि ताद्री या चार बंदरांतला व्यापार १८८१-८२ सालीं २८२६९ पौंडांचा असून, १५०७३ पौंडांचीं आयात व १३१९६ पौंडांची निर्गत होती. बांबू, तांदूळ, शिंगे, मासे, मीठ, सागवान हे निर्गतीचे जिन्नस व तांदूळ, गहूं, सूत, मासे हे आयातीचे जिन्नस होत.
गां व - हें अंकोला तालुक्याचें मुख्य ठिकाण कारवारच्या आग्नेयीस सुमारें १५ मैलांवर आहे. या ठिकाणीं एक पडका किल्ला आहे. समुद्रकिनार्यापासून गांव दोन मैल आंत आहे. येथें दर्याव्यापार चांगला चालतो. शेणवी, कोकणी, वैश्य, नाडोर, हाल आणि करेवक्कल, कलावंत, ख्रिस्ती, मुसुलमान वगैरे लोक येथें आहेत.
अंकोला किल्ला फार जुना आहे असें सांगतात. किल्ल्याभोंवतीं खोल खंदक आहे व वर तट आहेत. किल्ल्यांत कोटेश्वरांचे देवस्थान आहे.
१५१० सालापासून अंकोलाचा इतिहासांत उल्लेख आढळतो. अंकोला येथें पोर्तुगीजांचा व्यापार असे. १६७६ च्या फेब्रुवारी महिन्यांत शिवाजीनें याचा अर्धवट नाश केला असें फ्रायर लिहितो. पुढें हें गांव ओसाड पडलें. १७२० मध्यें मोंगलांनीं मराठ्यांनां जें स्वराज्य दिलें त्यांतील सोळा जिल्ह्यांपैकीं अंकोला हा एक होता. १७३० ते अंकोल्यापासून रत्नागिरींतींल सालासीपर्यंतचा कोंकणचा भाग कोल्हापूरच्या राज्यांत घेतला गेला. १७६३ ते हैदरनें येथील किल्ला पाडला. पुढें टिपूनें १७९९ मध्यें यावर आपलें सैन्य ठेविलें. १८७२ साली अंकोल्यास २८३५ वस्ती (पैकीं २६०४ हिंदु, २०१ मुसलमान आणि ३० ख्रिश्चन) होती; १८७९ मध्यें सुमारें २००० लोक, पैकीं ब्राह्मण व मुसलमान प्रामुख्यानें दिसत होते. गांवापासून मैलांवर असलेल्या खाडीत होड्या चालत असल्यानें येथें थोडासा व्यापार चालतो.