विभाग नववा : ई-अंशुमान
अंगठी - कोणत्याहि पदार्थाचे निरनिराळ्या उपयोगांकरितां व निरनिराळ्या आकारांचें केलेलें वेटोळें असा याचा कलाव्यवहारांत अर्थ आहे. विशेषत: चांदी, सोनें किंवा इतर मौल्यवान पदार्थ यांच्या अलंकारार्थ अंगठ्या बनवितात. अंगठी हा शब्द वाटोळ्या आकाराच्या पुष्कळ वस्तूंनां लागत असला तरी त्याचा एक विशिष्ट अर्थ बोटांत घालण्याचें वळें असा जो आहे त्याविषयीं पुढील विवेचन समजावें.
अंगठीत दोन भाग असतात. एक कोंदणाचा किंवा ज्यावर कांहीं चिन्ह काढतात तो वरचा भाग; व दुसरा बोटाभोंवती येणारा कडीसारखा भाग. अंगठी घालून आपल्या बोटांनां शोभा आणण्याची आवड स्वाभाविक सर्व काळीं सर्व ठिकाणीं दिसून येते. ज्या काळीं लेखनकला फार थोड्यांनांच अवगत होती त्या काळीं आत्मविशिष्ट चिन्हें अंगठ्यांवर खोदून महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्यांचा शिक्का मारीत व असे शिक्के लेखांचा खरेपणा सिद्ध करण्यास उपयोगी पडत. जेव्हां एखादां राजपुरूष आपला अधिकार कोणला अर्पण करी तेव्हां तो आपल्या शिक्क्याची अंगठी त्याच्या हवालीं करीत असे. सुमात्रांतील बत्ता लोक अद्याप विशिष्ट प्रकारच्या अंगठ्या परवान्याप्रमाणें वापरतात. परवान्यादाखल अंगठीचा केलेला उपयोग आपण पुष्कळ कथानकातून वाचतों.
अं ग ठी चा उ प यो ग - हा भरतखंडांत ऋग्वेदकालापासून आढळतो. ऋगवेदांत खादि असा शब्द अंगठी या अर्थी आलेला आढळतो. सायणाचार्यांनीं या शब्दाचा अर्थ कटक म्हणजे कडें असा केला आहे. पण एका ठिकाणीं [ द्यावी न स्तृभिश्वितयन्त खादिना: ऋ. २,३४,२] खादियुक्त मरूत् हे आकाश ज्याप्रमाणें नक्षत्रांनीं प्रकाशित दिसतें त्याप्रमाणें प्रकाशतात असें मरूतांचें वर्णन आलें आहे. येथें सायणांनीं खादिन: याचा अर्थ शत्रूंनां खाणारे किंवा कटकयुक्त असा केला आहे. त्यापेक्षां नक्षत्रांशीं जुळेल असा रत्नयुक्त अंगठ्या घतलेले असा अर्थ घेणें जास्त चांगले. खादि म्हणजे हस्तभूषण हा अर्थ सायणासहि मान्य आहे. तथापि त्यांनीं काहीं ठिकाणीं हस्तत्राणकटक, खाणारा असे निरनिराळे अर्थ केले आहेत मरूतांनां 'हिरण्यखादय:' असें शांखायन श्रौतसूत्रांतहि (३,५,१३,८,२३,६) म्हंटले आहे. सेंटपीटर्सर्वग कोशांत व आपटे यांच्या संस्कृत कोशात खादि याचा अर्थ अंगठी असाच दिला आहे.
धार्मिक विधीच्या वेळीं दर्भाचें पवित्रक हातांत घालण्याची पद्धति सूत्रांत आढळत नाहीं. ती स्मार्त असून सूत्रकालानंतरची आहे. पवित्रकास मारावयाची गांठ इंग्रजी आठ या आकड्यांप्रमाणें असते.
अंगठीला प्रचलित संस्कृत प्रतिशब्द अंगुली (री)यक, ऊर्मिका, मुद्रा इ. होत. अतिप्राचीन काळींहि अंगठ्यावर नांवे खोदून त्यांचा प्रसंग पडल्यास खुणेकरितां उपयोग करीत. रामायणांत रामानें मारूतीजवळ तो सीताशुद्धीला निघाण्याच्या वेळीं आपल्या नांवाची अंगठी तिच्या खुणेकरितां म्हणून दिली असें वर्णन आहे. (ददौ तस्य तत: प्रीत: स्वनामाडकोपशोभितम् । अंगुलीयमभिज्ञानं राजा पुत्र्या: परंतप: ॥ किष्किधाकांड सर्ग ४४ श्लो.१२) कालिदासाचें ''अभिज्ञान शकुंतलम्'' नाटक या खुणेच्या अंगठीवरच रचिलें आहे. (अभिज्ञानेन स्मृता शकुंतला अभिज्ञान शकुंतला; तामधिकृत्य नाटकं ।) राजा दुष्यंताला शकुंतलेचा आपल्याशीं झालेल्या विवाहीची अंगठीच्या अभिज्ञानानें आठवण होते. तेव्हां नांवाच्या अंगठ्या प्राचीन आहेत यांत शंका नाहीं. तसेंच शिक्का मारण्याच्या अंगठ्या-मुद्रा याहि हिंदुस्थानांत नवीन नाहींत. राजाच्या अधिकारचिन्हांत राजमुद्रा महत्त्वाची असे; प्रत्येक राजशासनावर ही मुद्रा उठवावी लागे; त्याशिवाय शासनाला किंमत येत नसे. ही मुद्रा फार जपावी लागे. नंदअमात्य जो राक्षस त्याची मुद्रिका दुसर्याच्या हातीं पडल्याबरोबर त्याचे सर्व बेत फाले. या मुद्रांचा परवान्यासारखाहि उपयोग होत असे. 'अग्रहीतमुद्र: कटकानिष्का:मासि' । मु.राक्षस.५).
अंगठ्यात, विशेषत: विशिष्ट प्रकारांनीं केलेल्या अंगठ्यांत जादू असते अशी सर्वसाधरण समजूत असल्यानें शरीरविभूषण हाच केवळ हेतु अंगठी घलण्यांत नसतो. उदाहरणार्थ नवग्रहांच्या अंगठ्या. यांत प्रत्येक ग्रहाला प्रिय असा एक रंग असतो, तेव्हा त्या रंगाचा खडा अंगठीत बसवून ती नेहमीं धारण केल्यानें वापरणार्याला त्या ग्रहाची पीडा होत नाहीं असा समज फार रूढ आहे. हिरा, पाच, मोती, माणिक, नीळ, पुष्पराग, गोमेद, पोंवळें व मार्जारनेत्री (लसण्या) हीं नवग्रहरत्नें होत. दंतकथांतून आपण नेहेमीं भारलेल्या अंगठ्यांविषयीं वाचतों. श्राद्धकर्माच्या वेळीं दर्भाच्या अंगठ्या (पवित्रकें) ज्या घालाव्या लागतात त्याचा हेतु दुरितनिवारण हाच असावा. सोन्याचीं पवित्रकें-विशिष्ट आकाराचींहि-घालण्याची जुन्या लोकांत चाल आहे. सोन्याचें पवित्रक असलें म्हणजे दर्भाचें घालावें लागत नाहीं.
मोहोरेची अंगठी घालण्याची चाल फार जुनी दिसते. गरीब बायकांच्या हातांत सुद्धां ही अंगठी साधारणपणें असते. सुनमुखाच्या वेळच्या दागिन्यांत मोहोरेची अंगठी नसली तर जुन्या बायकांनां बरें वाटत नाहीं. ही अंगठी विधवा बायकासुद्धां मोठ्या हौसेनें वापरतात. ज्याप्रमाणें मोहोरांच्या अंगठ्या श्रीमंत लोक घालतात त्याप्रमाणें गरीब लोक चवल्या बसविलेल्या अंगठ्या घलतांना आढळतात. अलीकडे पुतळ्यांच्या माळाप्रमाणेंच मोहोरच्या अंगठ्या मागें पडून रोल्डगोल्डच्या नवीन नवीन आकृतीच्या अंगठ्या घालण्याकडे प्रवृत्ति वाढत आहे. कांहीं कलावंतिणी आरशाच्या अंगठ्या बोटांत घालतात. यासारख्याच मोठ्या आकाराच्या अंगठ्या सिलोनमधील बडे लोक वापरतात. उत्तरहिंदुस्थानांत मिन्याच्या अंगठ्या फार सुंदर असतात. जयपुरी अंगठ्या फार प्रसिद्ध आहेत. सुवासिक अंगठ्या, देवदर्शनी अंगठ्या, इष्ट कामना पुरविणार्या अंगठ्या वगैरे ज्या बाजारांत दिसतात त्यांचा विशेष खप नाहीं तरी अंगठी हें माध्यम करण्याची सुंदर कल्पना यांत व्यक्त होते. पश्चिमेकडेंहि अंगठीचा उपयोग फार प्राचीन कालापासून आढळतो.
इ जि प्शि य न अं ग ठ्या - प्राचीन इजिप्तमधील थडग्यांतून सांपडलेल्या अंगठ्या साहाजिकच सर्वांत जुन्या असणार. १८ व्या ते २० व्या घराण्याच्या काळच्या अंगठ्या अत्युत्कृष्ट आहेत; त्या शुद्ध सोन्याच्या व साध्या धारणीच्या असून फार जड व बोजड दिसतात. त्यांच्या लांबोळ्या मखपृष्टावर बहुधा मालकाचें नांव व पदव्या खोल खोदलेल्या असतात. इजिप्तमधील गरीब लोक कमी मौल्यवान अंगठ्या वापरीत; त्या चांदी, ब्राँझ (पंचलोह) कांच, किंवा गारगोटीची चकाकी आणलेली व निरनिराळ्या ताम्रजन्य रंगांनीं भडक, हिरवी किंवा निळी केलेली माती यांपासून बनविलेल्या असत. कांहीं आंगठ्यांवर, माती ओली असतांना उठविलेले चित्रलिपींतील लेख आढळतात. संशोधिलेल्या अंगठ्यांपैकीं कांहीं हस्तीदंत, अबर व गोमेदासारखे कठीण दगड यांच्या केलेल्या आहेत. १२ व्या व पुढील घराण्यांच्या काळीं इजिप्तमध्यें जी एक निराळ्याच आकाराची अंगठी करीत तिला वरच्या बाजूस शेणकिड्याची आकृति (स्कॅरब हा किडा इजिप्शियन लोक फार पवित्र मानीत व तो ख्रिस्त्यांच्या क्रॉसप्रमाणें सर्वत्र काढीत). बसवून त्यांतून एक फिरती कडी बोटांत घालण्यासाठीं ओवलेली असे.
न ळ कं डी- प्राचीन बाबिलोन व असुर्या देशांत बोटांतल्या अंगठ्या उपयोगांत नसाव्यातसें दिसतें. तेथे शिक्के वेगळ्याच प्रकारचे म्हणजे स्फटिक किंवा कठीण दगड वर्तुळस्तंभाकृति कापून व आरपार भोंक पाडून करीत. व या नळकांड्यांतून दोरा ओवून तीं हातांत पोचींसारखीं बांधीत.
क्री ट न आ णि मा य सी नी अ न - या काळीं एक अंगठीची विशिष्ट पद्धत म्हणजे वरचा भाग सपाट व रूंद असून त्यावर सोन्यांत केलेली कोरीव नक्षी असे. वरच्या या भागाचा खालच्या वेळ्याशीं अर्थाअर्थीं संबंध नसे. खडे बसविलेल्या अंगठ्या फार क्वचितच असत.
फि नि शि य न - या तर्हेची अंगठी मूळ शेणकिडा (स्कॅरब) बरोबर वागविण्यासाठी केलेली असे. हा किडा बहुधा एखाद्या करंडकांत ठेवलेला असून हा करंडक आंत बाहेर फिरता केलेला असे. अशाकरितां कीं शिक्का मारण्यांचे कारण संपले कीं एरवीं त्याचें तोंड आंतल्या बाजूस वळवावें. शिक्का मारण्याला जोर यावा म्हणून खालचें वळे भक्कम करीत.
ग्री क - प्राचीन काळांतील ग्रीक अंगठींत वरील भाग सोन्याची खोदीव नक्षी काढण्याकरितां विशिष्ट प्रकारें चपटा केलेला असे. ख्रि. पू.४ थ्या,५व्या शतकांत हें खोदकाम फार स्वैर व सुंदर असल्याचें आढळतें. दुसर्या कांहीं ज्या अंगठ्या दिसतात त्या फिनिशियन तर्हेच्या फिरत्या स्कॅरब अंगठ्या होत.
ग्रीक लोकांत शिक्क्याच्या अंगठ्या वापरण्याचा बराच प्रचार होता. स्पार्टामध्यें पूर्वी एका काळीं कोणीहि लोखंडाहून जास्त मौल्यवान् अशा कोणत्याहि पदार्थाची शिक्क्याची अंगठी करूं नये असा एक कायदा होता; पण हेलेनिक जगांत दुसरीकडे कोठेंहि असा धरबंध घातलेला ऐकिवांत नाहीं. स्रिमेरियन बॉसफोरसमधील एट्रूरिया व कर्च येथल्या कांहीं थडग्यांतून उत्कृष्ट ग्रीक कलाकौशल्याच्या सुरेख सोन्याच्या आंगठ्या सापडलेल्या आहेत.
ए ट्रू स्क न - एट्रुस्कन लोक स्कॅरब बसविलेल्या फिरत्या सोन्याच्या अंगठ्या फार करून वापरीत. ही चाल त्यांनीं इजिप्शियनांपासून घेतलेली दिसते. कारण एट्रुस्कन थडग्यांतून काढलेल्या कांहीं आंगठ्यांवर सुवाच्य चित्रलिपी व खरे इजिप्शियन स्कॅरब आहेत. एट्रुस्कन अंगठ्या शिक्क्याच्या असून त्यांवरील गोमेदासारख्या दगडावर स्कॅरब कोरलेले असत. त्यांवरील हें खोदकाम ग्रीककला व इजिप्शियन कला यांमधील दुवा म्हणतां येईल. आणखी एट्रुस्कन अंगठीचा नमुना म्हणजे अंगठीचा वरचा भाग नक्षीदार सोन्याचा किंवा कोंदणांत बसविलेल्या भरगच्ची दगडाचा असे. या प्रकारांत वरील भाग आंत बाहेर फिरता नसे. एकंदरीत एट्रुस्कन अंगठ्या आकारानें फार मोठ्या व अतिशय परिश्रमानें घडविलेल्या दिसतात.
रो म न - रोमन लोक या बाबतींत फार साधें वाटतात. त्यांच्या प्रजासत्ताक राज्यांत बहुतेक नागरिक लोखंडी अंगठ्या घालीत; गुलामांनां तर यासुद्धां वापरूं देत नसत. परप्रांतीय वकिलांनां प्रथम सोन्याच्या अंगठ्या वापरण्याचा अधिकार मिळाला; नंतर सेनेटर, कॉन्सल व इतर संस्थानांतील बडे अधिकार यांना हा मान मिळाला. आगस्टन युगांत जुनाट अंगठ्यांचा मोठा संग्रह करण्यांत आला. अशा अंगठ्या रोमच्या देवस्थानांनां नजर म्हणून त्या काळीं देण्यांत येत.
साम्राज्यकाळीं अंगठ्या वापरण्यासंबंधांत निरनिराळे कायदे अस्तित्वांत होते. टायबेरियसनें जे स्वतंत्र कुळांत जन्मलेले नसत त्यांनां सोन्याच्या अंगठ्या वापरण्यासाठीं मोठ्या संपत्तीची अट घातली; सेव्हरसनें हा अधिकार सर्व रोमन शिपायांनां देऊन टाकला; व पुढें हा अधिकार सर्व स्वतंत्र नागरिकांनां मिळाला; मात्र स्वतंत्र झालेल्या गुलामांनां चांदीच्या व सामान्य गुलामांनां लांखंडी अंगठ्या वापराव्या लागत. जस्टीनियनच्या कारकीर्दीत हेहि नियंत्रण काढून टाकण्यांत आलें.
रोमन काळांतील अंगठ्यांतून नक्षी केवळ वरील भागापुरतीच न राहतां खालील वळ्याच्या भागावरहि होऊं लागली. वळे (अंगठीचा खालचा भाग) वाटोळें न राहतां कधी कधीं कोनदार किंवा बहुकोणी दिसूं लागलें. ३ र्या व ४ थ्या ख्रिस्ती शतकांतल्या रोमन अंगठ्या ख्रिस्तचिन्हांकित आढळतात.
के ल्टि क - यूरोपखंडांत अनेक ठिकाणीं पुरातन केल्टिक वंशजांच्या थडग्यांत पुष्कळशा सोन्याच्या अंगठ्या सांपडतात. त्या बहुधा शुद्ध सोन्याच्या असून कमीजास्त आंवळ बसण्याकरितां वळ्यामध्यें एक फट पाडलेली असे. एका प्रकारच्या रस्सीसारखी केलेली सोन्याची तार किंवा सुशोभित दिसेल अशा तर्हेनें वळविलेली सोन्याची कांब यांच्याच बहुतेक अंगठ्या करण्यांत येत. कांहीं अगदीं साध्या फट पाडलेल्या अंगठ्याचा नाण्यांऐवजीं उपयोग करीत. सबंध यूरोपिय मध्ययुगांत शिक्क्याच्या अंगठ्या धर्म, व्यापार, कायदा, खासगी व्यवहार इत्यादी बाबतींत फार महत्त्वाच्या होऊन राहिल्या होत्या.
बि श पी - नवीन बिशपला धर्मदंडाबरोबर पूर्वी एक अंगठीहि देत असत. ही अंगठी इतर शिक्क्याच्या अंगठ्यांहून वेगळी दिसत नाही. १२ व्या शतकापासून पुढें या बिशपी अंगठीचा लग्नाच्या अंगठीशीं गुढ संबंध लावण्यांत आला. बिशपबरोबर त्याची अंगठीहि पुरण्याची चाल असल्यानें त्या वेळच्या पुष्कळ अंगठ्या उपलब्ध आहेत. अशा कित्येक अंगठ्यांतून जुनीं कोंदणांत बसविलेलीं रत्नें आहेत व त्यांवरींल सोन्याच्या नक्षीला तींतील पाखंडी आकृति ख्रिस्ती बनविण्यासाठीं कांहीं अक्षरांची जोड देत; तर कांही रत्नें शोभिवंत दिसण्यासाठीं निरर्थक चिन्हीत केलेलीं दिसतात. साधारणपणें बिशपी अंगठी लाल, नीलमणि यांसारख्या दगडानें खचली असून खड्याला पैलू पाडीत नसल्यानें ती फार सुरेख दिसे; ती उजव्या हाताच्या तर्जनींत हातमोज्यावरून घालीत. तिच्या वळ्याचा आकार मोठा असे. १५ व्या व १६ शतकांतील बिशप उजव्या हातांत तीन चार अंगठ्या व शिवाय प्रत्येक हातमोज्याच्या पाठीवर एक मोठे रत्न धारण करीत.
पोप धारण करतो ती ''कोळ्याची अंगठी'' (रिंग ऑफ दि फिशरमन्) चित्रित असते. तीवर होडींत बसलेला सेंट पिटर पाण्याबाहेर जाळें काढीत आहे अशा अर्थांचें चित्र असते. १५ व्या शतकापासून पोपच्या आज्ञापत्रावर शिक्का मारण्यासाठीं या अंगठीचा उपयोग करण्यांत येत आहे. पोप वारल्यानंतर ही अंगठी फोडून टाकण्यांत येते. नव्या निवडलेल्या पोपला नावांची जागा रिकामी सोडलेली एक नवी अंगठी देण्यांत येते व त्यांचे नवें धारण केलेलें नांव जाहीर झाल्यानंतर मग तीवर तें खोंदण्यांत येतें.
१५ व्या ते १७ व्या शतकांतल्या कर्डिनलांच्या अंगठ्या ज्या संशोधिल्या गेल्या आहेत त्या आंगठ्यांत घालण्याच्या मोठ्या अंगठ्या दिसतात. या मुलामा दिलेल्या ब्राँन्झच्या बनविलेल्या अंगठ्यांतून स्फटिकाचा किंवा कांचेचा पातळ तुकडा बसवून तयार केलेल्या असतात वर्तुळभागावर तत्कालिन पोपचें नांव व अधिकारचिन्ह असतें; मुखपृष्ठावर मात्र काहिंच काढलेलें नसतें. हिची किंमत कमी असली तरी दिसण्यांत ही चांगली भव्य दिसते.
वा ड़ नि श्च या च्या व ल ग्ना च्या अं गं ठ्या - वाड़निश्चयदर्शक अंगठी देण्याची चाल जुनी रोमनी आहे. लग्नाचा करार पाळला जाईल याबद्दल केवळ एक हडप म्हणून ही अंगठी असावी. प्लिनीच्या वेळेपर्यंत ही अंगठी साधी लोखंडाची असे; पण २ र्या शतकापासून सोन्याची अंगठी देण्याची चाल पडलेली दिसते. याप्रमाणें ही चाल प्रथम व्यावहारक होती व नंतर ती धार्मिक विधींत अंतर्भूत होऊन, ११ व्या शतकापासून पुढें अंगठीसंबंधीं आशिवर्चन लग्नविधींत रूढ झालें.
दुहेरी (जेमेल) अंगठ्यांत एकमेकांनां जोडलेलीं दोन वळीं असून तीं एकत्र किंवा एकएकटीं वापरलीं जात. १६ व्या व १७ व्या शतकांत अशा अंगठ्या रूढ असून वाड़निश्चयाच्या अंगठ्या म्हणून त्यांचा बराच खप असे.
सू च क वा क्यें धा र ण क र णा र्या अं ग ठ्या - (पोझिरिंग्स) वरील शतकांतच अशा काव्यमय अंगठ्या फार प्रचारात होत्या. ''माझ्यावर प्रेम करा व मला सोडूं नका'' (लव्ह मी अँन्ड लीव्ह मी नॉट) ही अक्षरें कोरलेली अंगठी शेक्सपियरच्या ''मर्चंट ऑफ व्हेनिस'' नाटकांत (अं.४ प्र.१) आपण पाहतों. मंगलदायक शब्द किंवा वचनें खोदलेल्या अंगठ्या फार प्रचीन काळापासून व्यवहारांत असाव्यातसें दिसते. ग्रीक रोमनी अंगठ्यावर अशां खोदणी आाढळते. मध्ययुगांतील अंगठ्यांवर गूढविद्येंतील सामर्थ्यवान् मंत्र खोदले जात. १७ व्या शतकांत या ''पोझी'' अंगठ्या लग्नाच्या अंगठ्या म्हणून सररहा उपयोगांत असलेल्या दिसतात; व त्यावर ''प्रेम कर व आज्ञांकित रहा'';''ईश्वराला स्मर व माझ्यावर प्रेम कर'';''ज्या प्रेमानें मी ऋणी आहे त्याचें दर्शक कोणतेंहि दान नाहीं'' ''स्वर्गांतून देव आपलें प्रेम वृद्धिंगत करो'' इत्यादि अर्थाचीं वचनें लिहिलेलीं असत.
याच शतकांत मृताचें नांव व मृत्युदिन लिहिलेल्या अंगठ्या आठवणीकरितां वापरत असत. मध्ययुगांत झटके बंद करणार्या अंगठ्यांचें खूळ पसरलें होतें. या अंगठ्या राजानें भारावयाच्या असत; व त्याकरितां एक विधि केला जाई. ''दशक'' अंगठ्या विशेषत: १५ व्या शतकांत जास्त रूढ झाल्या होत्या. दशक हें नांव अंगठीच्या वर्तुळावर दहा गेंद बसविल्यावरून पडलें; हे गेंद माळेंतील मण्यांप्रमाणें ईश्वरस्मरणाकरितां योजीत.
व्या पा री अं ग ठ्या - १५ व्या व १६ व्या शतकांतील व्यापारी व इतर लोक शिक्क्याच्या अंगठ्यावर आपली व्यापारी खूण खोदून घेत. या अंगठ्या शिक्का मारण्याकरितांच वापरीत असें नव्हे तर तगाद्याच्या वेळीं मागणीची सत्यता पटण्याकरितां विश्वासू मनुष्याबरोबर पुष्कळदा या पाठविण्यांत येत. याच काळीं खासगी गृहस्थ आपल्या नावांतील आद्याक्षरें अंगठीवर कोरून घेत व या अक्षरांभोवतीं फुलांची सुंदर सांखळी काढवीत. तसेंच कांहीं सोन्याच्या अंगठ्यांवर कुलचिन्हें शोभिवंत नक्षीमध्यें काढलेलीं असत.
वि षा री अं ग ठ्या - ''क्लासिकल'' या अभिजातयुगांत वरील भाग पोकळ असलेल्या (कोंदणाच्या) विषारी अंगठ्यांचा उपयोग करीत. अशाच एका अंगठीनें हानिबॉलनें स्वत:ला मारून घेतलें. डेमॉस्थेनीझजवळ अशीच एक अंगठी होती. कॅससनें ज्यूपिटरच्या सिंहासनाखलची सुवर्णसंपत्ति चोरल्यानंतर भावी हालअपेष्टांनां भिऊन, अंगठीवरील हिरकणी चावली व तात्काळ मेला असें प्लिनी लिहितो. मध्ययुगांत एखाद्याचा खून करण्याची जी एक सोपी युक्ति योजीत ती अशी: अंगठीवरील रत्नखचित कोंदणांत एक पोकळ कांटा लपविलेला असे व हा कांटा आंतील विषयंचयाशीं जोडलेला असे. शत्रुशीं हस्तादोलन करतांना या काठ्यानें एक ओरखडा काढिला कीं कांठ्याच्या द्वारें विष शत्रूच्या अंगांत शिरून तो मृत्युपंथाला लागे. विषारी सर्पदंशावरून ही कल्पना सुचली असावी.
हि ब्रू अं ग ठ्या : - ज्यू लोकांच्या लग्नांत वापरल्या जाणार्या अंगठ्या व विशेष परिश्रमपूर्वक केलेल्या असत. यांचे १६ व्या १७ व्या शतकांतील सुंदर नमुने आपणांस पाहावयास मिळतात. त्यांत मुखपृष्ठाच्या जागीं यरूशलेमच्या देवळाची आकृति, उंच चांदई छप्पर व कधी कधीं वार्याची दिशा दाखविणारें यंत्र असलेली सोन्यांत किंवा इतर हिणकस धातूंत मोठ्या काळजीपूर्वक रेखाटलेली द्दष्टीस पडते.
आं ग ठ्या च्या अं ग ठ्या : - या आंगठ्यांत घालावयाच्या अंगठ्या १४ व्या व १७ व्या शतकापर्यंत पुष्कळ वापरल्या जात ''माझ्या तरूणपणीं कोणात्याहि अल्डरमनच्या आंगठ्याच्या अंगठीतून निसटून जाण्याइतका मी बारीक होतो,'' अशी फालस्टाफ प्रौढी मारतो (शेक्सपियर-हेन्री ४ था. भा.१.अं.२.प्र.४).
[संदर्भ ग्रंथ:- ऋग्वेद, शांखायन श्रौतसूत्र व इतर सूत्रग्रंथ, स्मृति. कुमारस्वामी आर्ट्स अँड क्रॅफ्टस इन इंडिया. किंग-अँटिक जेम्स अँड रिग्स, १८७२. मार्शल कॅटलॉग ऑफ फायनर रिंग्स इन् दि ब्रिटिश म्यूझियम १९०७. अर्किऑलॉजिकल जर्नल-वाटरटनचे लेख; एन्सायक्लोपीडीया ऑफ रिलिजन अँड एथिक्स-रेगॅरिला,चार्म्स अँड अॅफम्युलेट इ. लेख].