विभाग नववा : ई-अंशुमान
अंगडशाहा - शीखांचा एक गुरू हा इ. स. १५०४ सालीं जन्मला. तो नानकाप्रमाणेंच खत्री जातीचा असून नानकामागून १५३९ सालीं तो शीखांचा गुरू झाला. नानकानेच आपल्या स्वत:च्या मुलांनां वगळून अंगडाला आपला वारस केलें होतें. याविषयीं अशीं एक कथा आहे कीं, आपल्या अनुयायांसह गुरू नानक प्रवास करीत असतां, त्यानें रस्त्याच्या कडेला पडलेलें एका माणसरचें प्रेत पाहिलें. तेव्हां नानक म्हणला कीं, ज्याअर्थी तुमचा माझ्यावर विश्वास आहे त्याअर्थी तुम्ही हें अन्न (प्रेत) खावें. अंगडाशिवाय सर्वजण याला करचले. पण अंगडानें खालीं बसून त्या प्रताला खाण्याकरितां विवस्त्र करण्यास सुरूवात केली. तोंच तें प्रेत अंतर्धान पावून त्या जागीं त्याला पवित्र अन्नाचें ताट आढळून आलें लागलीच गुरू नानकानें अंगडला अलिंगन देऊन म्हंटलें कीं, तूं माझीच प्रतिमा असून माझे तेज तुझया ठिकाणीं राहील. त्या वेळेपासून शीख लोक गुरू नानकाचा अंश त्याच्या मागून गादीवर आलेल्या प्रत्येक गुरूंत असतो असें मानीत आले आहेत.
गुरू अंगडाच्या कार्याची फारशी माहिती मिळत नाहीं. त्यानें गुरूमुखी लिपि शोधून काढिली व 'ग्रथसाहेब' विस्तृत केला असें म्हणतात. त्याची राहणी अतिशय साधी असे. दोर विणून तो उदरनिर्वाह करी. इ. स. १५५२ मध्सें हा दिवंगत झाला अमरदासाला आपल्यामागें यानें गुरू निवडलें होतें.