विभाग नववा : ई-अंशुमान
अंगद (१) - वालीपासून, त्याची स्त्री तारा हिच्या ठायीं झालेला पुत्र. हा रामचंद्राच्या साहायार्थ बृहस्पतीच्या अंशानें जन्मला होता म्हणून भाषण करण्यांत हा परम चतुर असे. वाली मरण पावला, त्याकालीं हा वयानें विशेष मोठा नव्हता, म्हणून त्यानें रामास याच्या संरक्षणाविषयीं अतिशय अगत्यानें सांगितलें होतें; त्यावरून रामानें, किष्किंधेच्या राज्यासनावर सुग्र्रीवास स्थापिलें असतां, यास युवराजाचा अधिकार देवविला होता.
पुढें अल्प काळानें रामचंद्रानें सुग्रीवाकडून चारी दिशांस सोताशुद्धीसाठीं वानर पाठविले, त्यांत मारूती इत्यादि वानरांत यास प्रमुख करून दक्षिण दिशेस पाठविलें होते. तिकडे हा गेला असतां, एक मास अतिक्रांत झाला तरी यास सीतेचा शोध लागेना, म्हणून त्यानें प्राणत्यागाचा निश्चय केला. इतक्यांत संपत्ति नामक पक्षिराजाची भेट होऊन सीता लंकेत असल्याचा यास शोध लागला; त्यावरून यानें मरणापासून निवृत्त होऊन मारूतीस लंकेस पाठवलें, व तो सीताशुद्धि करून आल्यावर हा रामाकडे किष्किंधेस परत आला. नंतर सकल वानरांसहित रामचंद्र लंकेस गेल्यावर युद्ध आंरभण्यापूर्वी हा रामाकडून रावणाकडे शिष्टाई करण्यासाठीं गेला होता. परंतु याच्या हितोपदेशाचा रावणानें अनादर केल्यामुळें हा परत येतांच, उभयपक्षीं युद्धाची सिद्धता होऊन त्यास आरंभ झाला; त्या प्रसंगीं यानें विकट, कंपन, प्रजंघ इत्यादि अनेक महान् महान् राक्षसांस मारून, रामाला उत्तम सहाय्य केलें होतें. रावणाचा वध करून रामचंद्र अयोध्येस गेल्यावर अक्रा सहस्त्र वर्षें त्यानें राज्य करून निजधामास जाण्याचें मनांत आणिलें असतां, त्या समागमें सुग्रीव गेला तेव्हां हाच किकिंष्धेंचा राजा झाला होता.
(२) सूर्यवंशी दशरथपुत्र जो लक्ष्मण, त्यापासून उर्मिलेस झालेल्या दोन पुत्रांतील जेष्ठ. यानें स्थापिलेल्या नगरींचें नांव अंगादिया असें होतें, व तेथेंच हा राज्य करीत असे.
(३) भारती युद्धांतील दुर्योधनपक्षीय राजा. हा त्याच युद्धात मरण पावला होता [भारत, द्रोणपर्व अध्याय २५.]