विभाग नववा : ई-अंशुमान
अंगरखा - अंगरखा किंवा अंगरखा हा संयुक्त शब्द अंग आणि राखणें या दोन शब्दापासून बनला असून अंग राखणारा (कपडा) याअर्थी मराठींत योजतात. सर्व सामान्य कपड्यांना हा लावीत नसून फक्त एका विशिष्ट तर्हेच्या पुरूषांच्या अंगांत घालण्याच्या कपड्याला हें नांव रूढ आहे. गुंडीदार, कंठीदार, निमकंठीदार व प्यालेदार असे चार प्रकारचे निरनिराळ्या धाटणीचे अंगरखे होते पण हल्ली ते वापरण्यांत प्रचारांत नाहींत. याला अंगा असेंहि एक नांव आहे; पण सामान्यत: लहान मुलांच्या अंगरख्यालाच अंगा म्हणण्याची चाल पडली आहे. पेशवार्इंत अंगरखे चिटाचे करीत असें दिसतें; कारण अंगरख्याकरितां चिटांची मागणी कागदोपत्रीं आढळते.
भारतेतिहाससंशोधक मंडळामध्यें नानाफडणिसांचा एक जुना अंगरखा संगृहित केलेला आहे. हा अंगरखा पांढर्या तलम मलमलीचा असून त्याच्या कमरेखाली घोळ फार मोठा म्हणजे संमारें १३॥ वार (२७ हात) आहे. त्यास उभे नऊ जोड जोडले असून हा एवढा मोठा घेर कमरेजवळ एका वारांत मिळवून घेतला आहे. अंगरख्यास आठ बंद व गळ्याखालीं बारीक गुंडी आहे. या अंगरख्यावरून हा घालणार्या शरीराचा आकार अजमावतां येतो.