विभाग नववा : ई-अंशुमान
अंगारा - अंगारा हा शब्द म्हणजे विस्तव, निखारा या शब्दापासून उप्तन्न झाला असावा. भस्म अथवा चूल अगर एखाद्या पवित्र ठिकाणच्या राखेचा हल्लीं अंगार्यासाठीं उपयोग करतात. एखाद्या मनुष्यास कांहीं भूतबाधा वगैरे झाली असल्यास देवर्षिपणाचा धंदा करणारे लोक बाधा झालेल्यास कांही मंत्र पठन करून त्यानें मंत्रित केलेली राख लावितात त्याला अंगारा असें म्हणतात. ही अंगारा लावण्याची चाल पुराणग्रंथांतहि आढळून येते. मात्र तेथें अंगारा असा उल्लेख नसून त्याला भस्म असें म्हटलें आहे. हें भस्म म्हणजे तीन अग्नींची उपासना करणार्या अग्निहोत्र्याच्या अग्निकुंडांतील भस्म होय. पद्मपुराण अध्याय १०६ यांत एका मृत ब्राह्मणास अरूंधतीनें अग्निहोत्र्याच्या अग्निकुंडांतील भस्म मृत्युंजय मंत्रानें मंत्रित करून लाविलें असतां तो ब्राह्मण जिवंत झाल्याची कथा आली आहे. व त्यापुढील १०७ या अध्यायांत एका राक्षसानें गिळिलेल्यांनां वीरभद्रानें अशाच प्रकारचें भस्म लावून जीवंत केल्याचा उल्लेख आहे. गुरूचरित्रांत अशीं उदाहरणें बरींच आहेत. भस्म धारण केलें असतां एक प्रकारची अदभुत शक्ती अंगीं येत असल्याची कल्पना शिवकवचांत आढळते. रामरक्षा, शिवकवच वगैरे स्तोत्रें नित्य सायंकाळीं पठण करून मंत्रित केलेला अंगारा लहान मुलांनां लावण्याची चाल महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणीं आढळते. एखाद्या सुंदर बालकास एकाएकी ज्वर वगैरे आल्यास त्याला दृष्ट झाली असेल म्हणून द्दष्टीचा अंगारा लावणार्या कांहीं आजीबाई आढळतात. अंगारा हा राखेचाच केला जात नसून क्वचित प्रसंगी दुसर्याहि पदार्थांचा केला जातो. कोकणस्थ ब्राह्मणांत बोडण भरणें हा एक कुलाचार आहे. त्या प्रसंगीं बोडण म्हणून कालविलेल्या अन्नाचा अंगारा लावण्याची चाल आहे. बाळंतिणीच्या पांचव्या व साहाव्या दिवशी हिंग दुधांत कालवून त्याचा अंगारा करतात. वैरागी, गोसावी वगैरे लोक भिक्षा मागण्यासाठीं घरीं आले असतां घरांतील लहान मुलांनां अंगारा लावून त्याच्या योगानें त्यांनां भरून आपल्या मागें घेऊन जातात, अशी समजूत कांही जुन्या भाबड्या लोकांत आढळून येते.