विभाग नववा : ई-अंशुमान
अंगुत्तर निकाय - तीन पिटकांपैकीं दुसरें सुत्तपिटक. यांतील पांच निकायांतील हें चौथें आहे. याच्यांत ९५५७ सुत्तें (सूत्रें) आहेत. असें बौद्ध ग्रंथांत सांगितलें आहे. पण सुत्तें मोजण्याची अर्वाचीन रीत वेगळी आहे. तीप्रमाणें दोन पासून हजारपर्यंत तीं भरतील. सुत्तांचा विस्तार एका ओळीपासून तीनचार पानांपर्यंत वेगवेगळा आढळतो. त्यांतून बौद्ध संप्रदायांतील नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि स्वाध्यायपद्धति विवेचली आहे. थोडक्यांत साररूपानें सिद्धांत मांडण्याची पद्धत ज्या वेळीं फारसे ग्रंथ अस्तित्वांत नव्हते. त्या वेंळीं स्मरणांत राहण्याला सोपें जावें म्हणून अंगिकारलेली असे. अंगत्तुर निकायांत प्रथम एकसंख्यांक त्यानंतर द्विसंख्यांक मग त्रयी अशा क्रमानें निर्वोणला पांचण्यास आवश्यक अशा अकरा गुणापर्यंत मांडणी केलेली आढळते. फक्त त्यांची यादी देऊन काम भागविलें आहे. हीं सुत्रें अध्यापकानें स्पष्ट करून सांगावयाचीं असतात. अशा सूत्र भाष्यांचा नमुना इ. स. पांचव्या शतकांत बुद्ध घोषानें पालींत लिहिलेल्या ''मनोरथपूरणी'' मध्यें पहावयास सांपडतो. बुद्धाच्या निर्वाणानंतर थोड्याच दिवसांनीं उत्तर हिंदुस्थानांत हा संग्रह तयार झाला असावा. तथापि त्याचा नक्की काळ सांगणें कठीण जाईल. [प्रस्तावनाखंड विभाग ४ पहा.]